शेतीसाठी आता दिवसा थ्री फेज वीजपुरवठा

खामखेडा, सावकी, पिळकोस येथील शेतकर्‍यांमध्ये समाधान

खामखेडा : प्रतिनिधी
देवळा तालुक्यातील खामखेडा येथील 33/11 केव्ही वीज उपकेंद्रातून खामखेडा, सावकी व पिळकोस या गावांतील शेतकर्‍यांसाठी शेतीसाठी दिवसा थ्री फेज वीजपुरवठा सुरू करण्यात आला आहे. मंगळवारी (दि. 3) सकाळी 8 वाजता ठेंगोडा विभागाचे सहाय्यक अभियंता घनश्याम कुंभार यांच्या हस्ते पूजन करून या उपक्रमाचा प्रारंभ केला.
खामखेडा (ता. देवळा) येथील 33/11 केव्ही वीज उपकेंद्राच्या माध्यमातून खामखेडा, सावकी व पिळकोस या तिन्ही गावांना वीजपुरवठा केला जातो. मात्र, यापूर्वी शेतीसाठी थ्री फेज वीजपुरवठ्याचे वेळापत्रक रात्रीचे असल्याने शेतकर्‍यांना अडचणींचा सामना करावा लागत होता. अंधारात व थंडीत शेतात जावे लागत होते. परिसरात बिबट्या व इतर वन्यप्राण्यांचा वावर लक्षात घेता रात्री शेती करणे शेतकर्‍यांसाठी जीवघेणे ठरत होते. गेल्या काही दिवसांत शेतशिवारात बिबट्याचे वारंवार दर्शन झाल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले. अंधाराचा फायदा घेत बिबट्याने शेळ्या, मेंढ्या व गुरांवर हल्ले केल्याच्या घटनाही घडल्या आहेत.
या पार्श्वभूमीवर शेतकर्‍यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने शेतीसाठी दिवसा थ्री फेज वीजपुरवठा सुरू करावा, अशी मागणी खामखेडा येथील सरपंच वैभव पवार व ग्रामपंचायतीचे सर्व सदस्यांनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सातत्याने महावितरणकडे केली होती. त्यांच्या पाठपुराव्याची दखल घेत महावितरण कळवण विभागाचे कार्यकारी अभियंता युवराज पाटील, देवळा विभागाचे उपकार्यकारी अभियंता दिनेश पवार व ठेंगोडा विभागाचे सहाय्यक अभियंता घनश्याम कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली थ्री फेज वीजपुरवठ्याचे काम पूर्ण करण्यात आले. मंगळवारी (दि. 3) सहाय्यक अभियंता घनश्याम कुंभार यांच्या हस्ते खामखेडा, सावकी व पिळकोस या तिन्ही गावांतील शेतकर्‍यांसाठी दिवसा थ्री फेज वीजपुरवठा सुरू केला. यामुळे शेतकर्‍यांना दिलासा मिळाला असून, शेतकर्‍यांनी समाधान व्यक्त केले आहे. शेतकर्‍यांची वर्षानुवर्षे रात्री वीज मिळण्याची समस्यांतून सुटका
झाली आहे.
शेतीसाठी दिवसा थ्री फेज वीजपुरवठा सुरू झाल्याने खामखेडा ग्रामपंचायतीतर्फे सहाय्यक अभियंता घनश्याम कुंभार, महावितरणच्या कर्मचार्‍यांचा सत्कार करून आभार मानण्यात आले. या उपक्रमाप्रसंगी खामखेडा येथील सरपंच वैभव पवार, उपसरपंच सुशीलाबाई शेवाळे, ग्रामपंचायत सदस्य श्रावण बोरसे, गणेश शेवाळे, हेमंत मोरे, बाळू शेवाळे, दिलीप शेवाळे, अनिल शेवाळे, शांताराम शेवाळे, रमेश शेवाळे, कारभारी मोरे, सुनील मोरे, साहेबराव शेवाळे, विद्याधर शेवाळे, वरिष्ठ तंत्रज्ञ जयवंत आहेर, योगेश देवरे, कर्मचारी समीर आहेर, सुभाष खंबाईत, संदीप पवार आदी उपस्थित होते.

दिवसा थ्री फेज वीजपुरवठ्याचे वेळापत्रक
खामखेडा  –  सकाळी 8.30 ते सायंकाळी 4.30
सावकी     –  सकाळी 8.00 ते सायंकाळी 4.00
पिळकोस –   सकाळी 8.00 ते सायंकाळी 4.00

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *