शहराला वळसा घालण्याची वेळ!

वाहनधारक त्रस्त; खोदलेल्या रस्त्यांमुळे कसरत

नाशिक : प्रतिनिधी
शहराच्या विविध भागांत सध्या रस्ते खोदून ठेवल्यामुळे वाहनधारकांना शहराच्या कोणत्याही विभागांत जाण्यासाठी वळसा घालून जावे लागत आहे. त्यामुळे बर्‍याचदा हा प्रवास पुण्याहून पुणतांबे, असा ठरत आहे.
पुढील वर्षी होणार्‍या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये विकासकामांना कमालीचा वेग आला आहे. जलवाहिनी टाकण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू असल्याने खोदकाम केले जात आहे. द्वारका येथे वाहतुकीचे नियमन होण्यासाठी भुयारी मार्ग बनविण्यात येत आहे. हे काम पुढील वर्षापर्यंत चालणार आहे. गॅसची पाइपलाइन टाकण्याचे कामही सुरू आहे.
काही भागांत रस्ते काँक्रीटीकरणाच्या कामांना सुरुवात झाली आहे. त्यामुळे संपूर्ण शहरभर फक्त रस्ते खोदाई सुरू असल्याने धुळीचादेखील सामना करण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. रस्ते खोदकामामुळे वाहतूकही वळविण्यात आली आहे. राज्य परिवहन महामंडळाची बससेवा आता निमाणीतून मार्गस्थ केली जात आहे. त्यामुळे नागरिकांना ये-जा करणे अवघड होत आहे.
द्वारका येथील भुयारी मार्गामुळे आता काठे गल्ली ते द्वारकापर्यंतची वाहतूक बंद करण्यात आली आहे. शरणपूर रोड भागातही रस्त्याचे काँक्रीटीकरण केले जात असल्याने येथील वाहतूकही वळविण्यात आली आहे. गंगापूररोडला जोडणार्‍या रस्त्यावरूनही एकेरी वाहतूक सुरू आहे. वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून काही मार्गांवर वाहतूक एकेरी केली असली, तरी वाहनधारक शिस्तीचे पालन करत नसल्याने वाहतूक कोंडीत भर पडत आहे.

रुग्णवाहिकांकडून रुग्णाचा जीव धोक्यात

शहरातील अनेक एकेरी मार्गांंवर सर्रास वाहनधारक वाहने चालवत असल्याचे चित्र आहे. रेडक्रॉस सिग्नल येथून रविवार कारंजाकडे जाणारा मार्ग एकेरी असला, तरी दोन्ही बाजूने वाहतूक सर्रासपणे सुरू आहे. विशेष म्हणजे, अनेक रुग्णवाहिकादेखील वाहतुकीचे नियम तोडून सुसाट धावत असतात. गेल्या आठवड्यात मुंबई नाका भागात उलट्या दिशेने येणार्‍या रुग्णवाहिकेमुळे एका कारला धडक बसली होती. नो एन्ट्रीत रुग्णवाहिका चालवून स्वत:बरोबरच रुग्णाचाही जीव धोक्यात घालण्याचे प्रकार सर्रास घडत आहेत. त्यामुळे नो एन्ट्रीच्या ठिकाणी वाहतूक पोलीस नियुक्त करण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे.

रिक्षाचालकांकडून सर्रास नियमांचे उल्लंघन

शहरातील वाहतुकीला एकीकडे शिस्त लावण्याचे काम पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्याकडून होत असताना रिक्षाचालक मात्र वाहतुकीचे नियम फाट्यावर मारत आहेत. गेल्या काही दिवसांपासून तर सर्रासपणे फ्रंटसीट वाहतूक सुसाट सुरू आहे. विशेष म्हणजे, ठिकठिकाणी वाहतूक पोलीस तैनात असले, तरी त्यांच्या डोळ्यासमोरून फ्रंटसीट वाहतूक होत आहे. तरी वाहतूक पोलीस केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याचे चित्र आहे.

Time to take a tour of the city!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *