भीती दाखवून महिलांना जाळ्यात अडकवायचा

भोंदूबाबा अशोक खरात याचे कारनामे

नाशिक : प्रतिनिधी
संपूर्ण राज्यात गाजत असलेल्या खरात प्रकरणात अशोक खरात याने महिलांना अंधश्रद्धेबरोबरच भीती दाखवत फसवणूक केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.
भोंदूबाबा अशोक खरात याच्यावर अनेक महिलांनी फसवणुकीचे आणि लैंगिक शोषण केल्याचे आरोप केले होते. तो स्वतःला दैवी शक्ती प्राप्त असलेला व्यक्ती म्हणवून घेत असे. मात्र, पोलिसांच्या कचाट्यात सापडल्यानंतर त्याने या सर्व कृत्यांची कबुली दिली आहे. अशोक खरात सध्या पोलीस कोठडीत आहे. यावेळी अशोक खरातने चमत्कार करून नव्हे, तर हातचलाखी करत महिलांना धमकावल्याचे कबूल केले आहे.
अशोक खरातने चौकशीदरम्यान कबूल केले आहे की, तो कोणतेही चमत्कार करत नव्हता. उलट विज्ञानातील साध्या ट्रिक आणि हातचलाखीचा वापर करून तो लोकांना गंडवत होता. तसेच महिलांना आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी तो प्रथम त्यांच्या मनात भीती निर्माण करायचा. यानंतर समोरच्या व्यक्तीच्या चेहर्‍यावरील हावभाव आणि त्यांच्या बोलण्यातून त्यांच्या समस्या ओळखून, त्यांना हवे तेच उत्तर देऊन तो त्यांचा विश्वास संपादन करायचा. यासोबतच लिंबातून रक्त काढणे, अग्नी प्रज्वलित करणे यांसारख्या विज्ञानावर आधारित हातचलाखीच्या गोष्टींना त्याने दैवी शक्ती असल्याचे भासवले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मी लोकांच्या मानसिकतेचा अभ्यास केला होता. लोकांना चमत्काराची हौस असते. मी फक्त त्यांना तेच दाखवले. मी महिलांना धमकावण्यासाठी कोणत्याही मंत्रतंत्राचा वापर केला नाही. मी त्यांच्या वैयक्तिक माहितीचा आणि भीतीचा वापर केला, असे अशोक खरातने मान्य केले आहे.
त्याच्या या उत्तरांमुळे पोलीसही अवाक् झाले आहेत. अशोक खरातच्या या कबुलीमुळे समाजातील सुशिक्षित वर्गाच्या मानसिकतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विज्ञानाचा वापर फसवणुकीसाठी करणार्‍या अशा भोंदूबाबाने आणखी किती जणांना लुबाडले आहे, याचा शोध आता पोलीस घेत आहेत. तसेच या प्रकरणातील पीडित महिलांनी पुढे येऊन तक्रार करावी, असे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे. नाशिक पोलिसांनी या प्रकरणात खरातचे साहित्य जप्त केले आहे. त्यात अनेक रासायनिक पदार्थ आणि विज्ञानाच्या खेळाशी संबंधित वस्तू सापडल्याची चर्चा आहे. महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानवीय अनिष्ट व अघोरी प्रथा आणि जादूटोणा प्रतिबंधक व उच्चाटन कायद्यानुसार त्याच्यावर कडक कारवाई करण्याची तयारी पोलिसांनी केली आहे.

To trap women by showing fear

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *