लासलगाव:समीर पठाण
गेल्या एक महिन्यापूर्वी दीडशे ते दोनशे रुपये किलो दराने विकल्या जाणाऱ्या टोमॅटोच्या बाजारभावाची लाली उतरली असल्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांनी लासलगाव बाजार समितीच्या आवारातच टोमॅटो फेकून देत आपला संताप व्यक्त केला.सद्या टोमॅटोच्या २० किलोच्या क्रेट्सला पन्नास ते शंभर रुपयापर्यंत दर मिळत असल्याने टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांमध्ये प्रंचड रोष निर्माण झाला आहे.
गेल्या दीड महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने टँकरच्या साह्याने शेतकऱ्यांनी टोमॅटोला पाणी दिले,आजच्या दरामध्ये उत्पादन खर्च तर दूरच वाहतूक आणि मजुरी खर्चही निघणे मुश्किल झाले आहे.विविध संकटांचा सामना करत मेहनतीने पिकवलेल्या टोमॅटोला अवघा चार ते पाच रुपये किलो तर प्रति क्रेट ५० ते १०० रुपये दर मिळत असल्याने यातून उत्पादन व वाहतूक खर्चही वसूल होत नसल्याने टोमॅटो विक्रीसाठी आणूनही उत्पादन खर्च निघत नसल्याने वैतागलेल्या शेतकऱ्यांनी टोमॅटो बाजार समिती आवारात फेकुन देत निषेध व्यक्त केला.
गेल्या एक ते दीड महिन्यापासून पाऊस नसल्याने तसेच वातावरणातील होत असलेल्या बदलामुळे औषधाचा वाढणारा खर्च तसेच टोमॅटो पिकवण्यासाठी लागणारी मजुरी,वाहतुकीचा खर्च हे सर्व करूनही टोमॅटोला अपेक्षित असा भाव मिळत नसल्याने बळीराजा हताश झाला आहे.मोठ्या प्रमाणात आवक वाढल्याने टोमॅटोच्या दरात मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे.मागील महिन्यात याच टोमॅटो ला उच्चांकी दर मिळाल्याने यंदा अनेक शेतकऱ्यांनी टोमॅटोची मोठ्या प्रमाणात लागवड केली त्यामुळे बाजारात टोमॅटोची आवक वाढली.