रामपूरा येथे पोल्ट्री फार्म जमीनदोस्त
मालेगाव:प्रतिनिधी
मालेगाव तालुक्यातील काटवन परिसरात दुपारच्या सुमारास झालेल्या वादळी वाऱ्याने शेतकऱ्यांची मोठी धांधळ उडवली. ठिकठिकाणी झांडांच्या फांद्या तुटून पडल्यामुळे शेतशिवारातील नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागला आहे.दुपारी बारा वाजेनंतर तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. यामध्ये पावसाचे प्रमाण कमी असले तरी सोसाट्याच्या वाऱ्याने साध्या स्वरूपात तयार केलेल्या कांदाचाळी, तसेच बाहेर झाकलेला कांदा थोड्याफार प्रमाणात ओला झाला आहे.
काटवण परिसरात मान्सूनपूर्व मेघगर्जनेसह पाऊस व वादळी वाऱ्यामुळे येथील भटू मोतीराम खैरनार यांचा पाच हजार पक्षांचा पोल्ट्री सेड दुपारी साडेबाराच्या सुमारास जमीनदोस्त झाला यामुळे सदर शेतक-याचे पंधरा लाखांहून अधिकचे नुकसान झाले असून तातडीने तलाठी गोविंद तिडके घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला.
काटवन परिसरातील रामपुरा येथील युवा शेतकरी भटू मोतीराम खैरनार हे (गट क्रमांक ४६) मध्ये वडिलोपार्जित असलेल्या कोरडवाहू पाच एकर क्षेत्रात कुक्कुट पालन करून आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह करीत आहेत. याच पोल्ट्रीच्या एका बाजूस कुटुंबासहित त्यांनी संसार थाटला आहे. रविवार (ता.४) दुपारी साडेबाराच्या सुमारास अचानक धडकलेल्या मेघगर्जनेसह जोरदार वादळाने मात्र होत्याचे नव्हते केले. पाच हजार पक्षांचा पोल्ट्री सेड वादळात अलगद उडाल्याने श्री. खैरनार यांचा संसार उघडय़ावर आला लाखों रूपयांचे नुकसान झाले.
तसेच वरीष्ठ कार्यालयात याबाबत अहवाल सादर करण्यात येईल असे सांगितले. कजवाडे येथील ग्रामपंचायत सदस्य अमृत सोनवणे, सागर भामरे, नामदेव शिरसाट यादव सोनवणे, अनिल शिरसाट, बापू खैरणार, ज्ञानेश्वर शिरसाठ आदिंनी भेट देऊन खैरनार कुटुंबियांचे सांत्वन केले व प्रशासनाने सदर कुटुंबियाला तातडीने भरपाई द्यावी अशी मागणी केली आहे.