परंपरेने त्र्यंबकराजाच्या पालखीचे सीमोल्लंघन

न्या. भन्सालींच्या हस्ते गर्भगृहात महापूजा, शमीवृक्षाचे पूजन

त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी
त्र्यंबकेश्वर येथे दसरा पारंपरिक पद्धतीने साजरा झाला.
त्र्यंबकेश्वर मंदिर ट्रस्टचे चेअरमन न्या. सचिन भन्साली यांनी सकाळी गर्भगृहात महापूजा केली. ट्रस्ट कार्यालयाच्या इमारतीत संस्थानच्या ताब्यात असलेली ऐतहासिक शस्त्रांचे पूजन करण्यात आले. यामध्ये ढाल, तलवार, भाले, तोफा यांचा समावेश आहे. दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास त्र्यंबकराजाची पालखी पूर्वपरंपरेने सीमोल्लंघनासाठी संस्थानी पद्धतीने मिरविण्यात आली.
पालखीसोबत गडदवणे येथील देवी मंदिराचे पुजारी व पूर्वापार मानकरी घराण्याचे वंशज दोरे कुटुंबीय अबदागिरी घेऊन उपस्थित राहिले. त्यांनी फुल, नारळ यांसह मुखवट्याची पूजा केली. पालखी प्रथम कुशावर्तावर आली.त्यानंतर मेनरोडने नाशिक-त्र्यंबक रस्त्यावर असलेल्या शासकीय विश्रामगृहाच्या जवळ आली.
प्रभाकरराव त्र्यंबकराव धारणे आणि परिवाराने माजी नगराध्यक्ष त्र्यंबकराव धारणे यांच्या स्मरणार्थ देवस्थानला दिलेल्या दोन गुंठे जागेत शमीवृक्षाच्या पूजनासाठी नेण्यात आली. येथे मंडप देऊन सज्जता करण्यात आली होती. या ठिकाणी पारंपरिक पद्धतीने सीमोल्लंघन झाले. तसेच शमीवृक्षाचे पूजन झाले. संस्थानाची पूजा विश्वस्त स्वप्नील शेलार, प्रदीप तुंगार, डॉ. सत्यप्रिय शुक्ल यांच्यासह मंगेश धारणे यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी माजी नगराध्यक्षा तृप्ती धारणे, पंकज धारणे, पराग धारणे यांनी पालखीचे औक्षण केले. पालखीसोबत गिरीश जोशी, मंगेश दिघे यांच्यासह राज तुंगार आणि पुजारी उपस्थित
होते. शमीवृक्षाचे पूजन झाल्यानंतर देवस्थान ट्रस्टने उपस्थितांना प्रसाद स्वरूपातील दूध वाटप केले. पालखीचे दृश्य नयन मनोहरी होते. पालखी ग्रामदेवता महादेवी मंदिराच्या मार्गे परत मंदिरात आली. त्यावेळी गर्भगृहात नित्य प्रदोष पुष्प पूजक उल्हास आराधी यांची पूजा सुरू होती.सीमोल्लंघन करून आलेला भगवान त्र्यंबकराजाचा पंचमुखी सुवर्ण मुखवटा गर्भगृहात नेऊन शिवपिंडीला स्पर्श करून बाहेर आणला. दसर्‍यानिमित्ताने पोशाख पूजा करण्यात आली.

देवस्थान ट्रस्टला दोन गुंठे जागा

त्र्यंबकराजाच्या पालखीचे सीमोल्लंघनप्रसंगी शमीवृक्षाची पूजा करण्यासाठी प्रभाकरराव त्र्यंबकराव धारणे यांनी माजी नगराध्यक्ष स्वर्गीय त्र्यंबकराव धारणे यांच्या स्मरणार्थ देवस्थान ट्रस्टला दोन गुंठे जागा कायमस्वरूपी दिली आहे. या जागेत मागच्या 13 वर्षांपासून पालखी ठेवण्यात येते. येथे शमीवृक्षाची पूजा करून त्याची पाने लुटली जातात.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *