सिटी सेंटर मॉल ते विशाल पेट्रोल पंप मार्गावर वाहतुकीचा खोळंबा

रस्त्याच्या कामामुळे वाहनचालकांची कोंडी

सिडको : प्रतिनिधी
शहरातील सुरू असलेली रस्त्यांची कामे आणि नवरात्रोत्सवानिमित्त रस्त्यांवर वाढलेली वर्दळ यामुळे वाहतुकीचा प्रश्न गंभीर बनला आहे. सिटी सेंटर मॉलपासून विशाल पेट्रोल पंपापर्यंतच्या मार्गावर वाहनांची गर्दी वाढल्याने वाहतुकीचा वेग मंदावला आहे. या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असल्याने प्रवाशांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. नाशिक शहरात विविध भागांत रस्तेदुरुस्ती आणि अन्य कामे सुरू आहेत. त्याचवेळी नवरात्रोत्सवामुळे नागरिकांची ये-जा वाढली आहे. काही मार्गांवरील वाहतुकीत करण्यात आलेल्या बदलांचाही परिणाम वाहतूक व्यवस्थेवर होत आहे. परिणामी प्रमुख रस्त्यांवर वाहनांचा ताण वाढताना दिसत आहे.
सिटी सेंटर मॉल ते विशाल पेट्रोलपंप यादरम्यान दुचाकी, चारचाकी आणि अन्य वाहनांची मोठी गर्दी होत आहे. वाहने संथगतीने पुढे सरकत असल्याने या मार्गावरून प्रवास करणार्‍या नागरिकांचा बराच वेळ वाहतूक कोंडीत जात आहे. कामावर जाणारे कर्मचारी तसेच इतर कामांसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांनाही याचा फटका बसत आहे.
सणासुदीच्या काळात वाहतुकीचे योग्य नियोजन करणे आवश्यक असताना, या मार्गावरील कोंडीमुळे वाहनचालकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. संबंधित यंत्रणांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

Traffic congestion on the route from City Center Mall to Vishal Petrol Pump

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *