राहुड घाटात तंबाखूने भरलेल्या ट्रकचे ‘अग्निकांड’

लाखोंचा ऐवज खाक; मुंबई-आग्रा महामार्गावर पहाटे थरार

चांदवड : वार्ताहर
मुंबई-आग्रा महामार्गावर वाहनांना आगी लागण्याचे सत्र सुरूच असून, गुरुवारी (दि. 20) पहाटेच्या सुमारास चांदवड तालुक्यातील राहुड घाटात तंबाखूची पाने वाहून नेणार्‍या एका अवजड ट्रकला अचानक आग लागल्याची घटना घडली. या भीषण आगीत ट्रक आणि त्यातील लाखो रुपयांचा माल जळून खाक झाला. आगीचे स्वरूप इतके भीषण होते की, तब्बल पाच ते सहा तासांच्या अथक प्रयत्नांनंतर ही आग आटोक्यात आली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र आर्थिक नुकसान मोठे झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थान पासिंगचा ट्रक (क्रमांक आर. जे. 11, डी. बी. 3201) मालेगाव कडून नाशिकच्या दिशेने तंबाखूची पाने घेऊन जात होता. गुरुवारी पहाटे 3.30 वाजेच्या सुमारास हा ट्रक राहुड घाटातील अवघड वळणावरील म्हसोबा मंदिराजवळ आला. यावेळी अचानक ट्रकमधून धूर निघू लागला आणि काही क्षणातच आगीने रौद्र रूप धारण केले. ट्रकमध्ये सुकलेली तंबाखूची पाने असल्याने आगीचा भडका वेगाने झाला आणि संपूर्ण ट्रक आगीच्या लोळात वेढला गेला.
पहाटेची वेळ आणि घाटातील अंधार यामुळे सुरुवातीला गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, घटनेची माहिती मिळताच महामार्गावरील सोमा टोल कंपनीचे कर्मचारी, ‘रूट पेट्रोलिंग’ टीमचे राहुल ठाकरे, शैलेश अहिरे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तसेच चांदवड नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाचा बंबही पाचारण करण्यात आला. आगीची तीव्रता पाहून एक बंब पुरेसा पडणार नाही हे लक्षात येताच अधिकचे पाण्याचे टँकर्स मागवण्यात आले.
अग्निशमन दलाच्या जवानांनी जीवाची बाजी लावून पाण्याचा मारा सुरू केला. मात्र, तंबाखूच्या पानांनी पेट घेतल्याने आग धुमसतच होती. अखेर सकाळ उजाडल्यानंतर सुमारे 5 ते 6 तासांच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतर आग पूर्णपणे विझवण्यात यश आले.

सुदैवाने चालकाचा जीव वाचला

मुंबई-आग्रा महामार्गावर वाहनांची मोठी वर्दळ असते. जळत्या ट्रकमुळे वाहतूक कोंडी होण्याची शक्यता होती. मात्र, चांदवडचे पोलीस निरीक्षक कैलास वाघ व त्यांच्या पथकाने घटनास्थळी दाखल होत वाहतूक एकतर्फी पद्धतीने सुरू ठेवली. पोलिसांच्या तत्परतेमुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली नाही. या घटनेत ट्रकचा सांगाडा झाला आहे. ट्रकने पेट घेतल्याचे लक्षात येताच चालकाने प्रसंगावधान राखत गाडी थांबवून खाली उडी मारली. त्यामुळे सुदैवाने या मोठ्या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, आगीचे तांडव इतके भयानक होते की, बघता बघता डोळ्यादेखत लाखोंचा माल जळून खाक झाला.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *