महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने अनेक कार्यक्रम राज्यात झाले. त्यात काही कामाचे होते, काही बिनकामाचे होते. हनुमान चालिसावरून मुद्दाम पेटवलेला वादही आता शमला आहे. त्याचे फोलपण आता सगळ्यांच्याच लक्षात आले आहे. तो वाद केवळ विक्रांत प्रकरणातले पैसे कुठे गेले हे दडपण्यासाठीच झाला होता, असे अनेक राजकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे. या सार्‍या गोंधळाच्या पार्श्‍वभूमीवर एक गोष्ट फार चांगली झाली. मात्र, त्याकडे अनेकांचे लक्ष गेले नाही. ते म्हणजे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांच्या संदर्भातली एक परिषद मुंबईत झाली. त्यात कोकणाला अधिक प्राधान्य देण्यात आले होते. झेप उद्योगिनी आणि वी एमएसएमई या संस्थांच्या पुढाकाराने ही परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये देशातल्या सूक्ष्म आणि लघु उद्योगांची व्याप्ती वाढवून आत्मनिर्भर भारतासाठी काम करण्याचं आवाहन यावेळी केंद्रीय सूक्ष्म, लघु उद्योग मंत्री नारायण राणे यांनी केले.
देशात गेल्या काही वर्षांपासून आणि त्यातही चिनी वस्तूंची आयात वाढल्यापासून देशांतर्गत लघुउद्योगांची काहीशी पीछेहाट झाली होती. कोरोना काळानंतर जेव्हा आता उद्योग पुन्हा जोमाने सुरू होत आहेत त्यावेळी अशा प्रकारच्या कार्यक्रमांची आवश्यकता निर्माण झाली आहे. अशा महत्त्वाच्या गोष्टीला सकारात्मक प्रतिसाद दिल्याबद्दल नारायण राणे यांचे अभिनंदन केले पाहिजे. सध्याच्या केंद्रीय मंत्रिमंडळात आपापल्या विभागाची पूर्ण माहिती आणि काही विशेष करण्याची इच्छा असलेल्या मंत्र्यांमध्ये नारायण राणे यांचा समावेश होतो. त्याचबरोबर ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले असल्यामुळे राज्याची गरज त्यासाठी करायच्या उपाययोजनांची माहितीही त्यांना आहे. त्यामुळे या क्षेत्रात राज्याला त्यांचा अधिकाधिक फायदा करून घेता येईल. त्यांचे आणि सध्याच्या राज्य सरकारचे संबंध हे फार चांगले नसले तरी काही कामे ही राज्यासाठी करायचीच असतात, याची जाणीव त्यांना आहे. सरकारे येतात-जातात मात्र आपल्या माणसांसाठी केलेली कामे ही दीर्घकाळ समाजाच्या स्मरणात राहतात. तशा प्रकारे या राज्यातल्या तरुणांना अधिकाधिक उद्यमशील बनवण्याचा प्रयत्न त्यांनी अधिक जोमाने करावा, अशी अपेक्षा आहे. आज मराठी तरुणाला चांगल्या आणि सर्जनात्मक अशा मार्गदर्शनाची गरज आहे. देशात अनेक मोठ्या उद्योगांना पूरक लघुउद्योगांची आवश्यकता असते. त्याची माहिती मराठी तरुणांपर्यंत पोहोचली पाहिजे. एकाच प्रकारच्या उद्योगांमध्ये मराठी तरुण मोठ्या प्रमाणात येतात. त्यापेक्षा बाजाराची गरज ओळखून पूरक व्यवसायांमध्ये जर त्यांनी पाय रोवले तर त्याचा फायदा त्यांना त्याचबरोबर राज्याला होऊ शकतो. यासाठी राज्य सरकारनेही पुढाकार घेऊन आपल्या केंद्रीय मंत्र्यांचा अधिकाधिक फायदा कसा करून घेता येईल ते पाहिले पाहिजे.
आज राज्यातले अनेक उद्योग त्यातही जे जीवनावश्यक आहेत ते मोठ्या प्रमाणावर परप्रांतीयांवर अवलंबून आहेत. त्यातही काही काही ठिकाणी तर मराठी तरुणांना शिरकाव करणेही कठीण होते. त्यासाठी प्रस्थापित उद्योगांबरोबर चर्चा करून त्यांची गरज देशांतर्गत उत्पादनांनी कशी भागवता येईल, याचा विचार करायला हवा. आज लोकांची क्रयशक्ती वाढलेली आहे. सुशिक्षित तरुणांना पुरतील इतके नोकर्‍यांचे प्रमाण नाही. त्यामुळे त्यांना योग्य त्या पद्धतीने उद्योगात आणले पाहिजे. त्यातल्या काही जणांकडे कौशल्य आहे तर काही जणांकडे व्यवस्थापन आहे. त्याचा मेळ घालून नियोजनबद्ध आखणी केल्यास आपल्या राज्याला त्याचा फायदा होऊ शकतो. मराठी माणूस हा मोठं भांडवल गुंतवून मोठे उद्योग निर्माण करू शकतो, त्याची सुरुवात अशा प्रकारच्या उद्योगांपासून झाली पाहिजे. कोकणातल्या उद्योगांकडे पाहण्याची दृष्टीही आता अधिक विस्तारली पाहिजे. पर्यटन या मुख्य उद्योगाबरोबरच त्यासाठी पूरक असे उद्योग आले पाहिजेत. कोकणात हॉटेल सुरू करायला मराठी तरुण हा पुढे येतो. त्याचप्रमाणे त्या हॉटेलसाठी लागणार्‍या इतर वस्तूंच्या निर्मितीचाही विचार करायला हवा. त्यातही ते उत्पादन दर्जेदार व्हावे यासाठीही प्रयत्न करायला हवा. अशा उद्योगांचे मार्गदर्शन हे राणे यांच्या मंत्रालयाने महाराष्ट्रात करायला हवे असे वाटते. शेतीवर आधारित व्यवसाय हे आपल्याकडे मोठ्या प्रमाणात होत असतात. त्याचबरोबर आपल्याकडे इतर उत्पादनेही तयार झाली पाहिजेत. कोकणात काजू प्रक्रिया उद्योग मोठ्या प्रमाणात आहेत. त्याचबरोबर या प्रक्रिया उद्योगाला लागणार्‍या विविध यंत्रसामग्री किंवा या यंत्रांच्या सुट्या भागाचेही उत्पादन व्हायला हवे. हे सगळ्याच व्यवसायात व्हायला हवे. मध्यंतरी दापोलीच्या अगदी लहान खेडे असलेल्या साकळोलीमध्ये होतो त्यावेळी तिथे एकाचा बॉलपेनच्या रिफिल तयार करण्याचा उद्योग होता. त्यांना मुंबईत मोठे मार्केट आहे. त्या ठिकाणी ते आपला माल नेतात. अशा प्रकारचे उद्योग मोठ्या प्रमाणात यायला हवेत. लघुउद्योग आणि ग्रामोद्योग यातला फरकही तरुणांना समजावून सांगितला गेला पाहिजे. कोकणात नारळ मोठ्या प्रमाणात होतात. आंबे होतात. आंबे काढण्यासाठी तयार करण्यात आलेली एक विशिष्ट अशी काठी असते. त्यामध्ये अधिक विचार करून नवीन उत्पादने आली पाहिजेत. वाहनांसाठी लागणारे सुटे भाग, ज्याला आपण हार्डवेअर म्हणतो अशा प्रकारची अगदी लहान लहान उत्पादने आली पाहिजेत. त्याचे योग्य मार्गदर्शन मिळायला हवे. त्याचप्रमाणे एकाच प्रकारचे उद्योग न येता त्यातही संतुलन यायला हवे. आज कोकणात अनेक काजू प्रक्रिया उद्योग आले. उत्साहाने काही जणांनी ते सुरू केले त्यानंतर ते बंदही झाले. असे होऊ नये म्हणून सूक्ष्म, लघु उद्योग मंत्रालयाने जर त्याचा ठराविक उद्योगांचे एक मार्गदर्शन शिबिर वा कायम मार्गदर्शन मिळणारे केंद्र निर्माण केले तर त्याचा फायदा होऊ शकतो. ते जिल्हानिहाय जरी झाले नाही तरी विभाग निहाय तरी करता येईल. त्याची प्रसिद्धीही योग्य पद्धतीने व्हायला हवी. त्यासाठी समाजमाध्यमांचा व इतर माध्यमांचाही वापर करता येईल. मराठी तरुणांनीही नको त्या प्रसिद्धीला बळी न पडता व आपली डोकी न भडकवता जर अशा निर्मितीमध्ये आपले मन रमवले तर त्याचा फायदा सगळ्यांनाच होणार आहे हे निश्चित.
-राजेश शिरभाते

Bhagwat Udavant

Recent Posts

तलवारीचा धाक दाखवून दहशत माजवणाऱ्यास नाशिकरोड पोलिसांनी ठोकल्या बेड्या

तलवारीचा धाक दाखवून दहशत माजवणाऱ्यास नाशिकरोड पोलिसांनी ठोकल्या बेड्या नाशिकरोड : प्रतिनिधी तलवारीचा धाक दाखवत…

4 hours ago

विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज : सुवर्णा चव्हाण

आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज : सुवर्णा चव्हाण मनमाड : आमिन शेख आगामी होणाऱ्या…

4 hours ago

नाशिक जिल्हा परिषदेतील वित्त विभागाच्या दोघा अधिकाऱ्यांना लाच घेताना पकडले

नाशिक: प्रतिनिधी वेतन पडताळणी करून ती मंजूर करून देण्याच्या मोबदल्यात अकरा हजार रुपयांची लाच घेताना …

14 hours ago

राहुल आहेर यांची निवडणूक रिंगणातून माघार केदा आहेर यांच्या उमेदवारीसाठी शिफारस

राहुल आहेर यांची निवडणूक रिंगणातून माघार केदा आहेर यांच्या उमेदवारीसाठी शिफारस काजी सांगवी : वार्ताहर…

1 day ago

बाळ अदलाबदल प्रकरणी मोठी कारवाई, 8 डॉक्टर,1 परिचारिका निलंबित

नाशिक:प्रतिनिधी जिल्हा शासकीय रुग्णालयात काल झालेल्या बाळ अदलाबदल प्रकरणी आरोग्य विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे.…

1 day ago

आयुक्तालय हद्दीत पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

आयुक्तालय हद्दीत पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या सातपूर: प्रतिनिधी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस अधिकार्‍यांच्या…

2 days ago