अनिश्चितता

अमेरिका-इस्रायलने 28 फेब्रुवारी 2026 रोजी इराणवर जोरदार हवाई हल्ले केले. या हल्ल्यांत इराणचे सर्वोच्च धार्मिक नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्यासह अनेक नेते मारले गेले. खामेनी मारले गेल्यानंतरही इराणने माघार घेतली नाही. निम्म्याहून अधिक जगाला इंधनपुरवठा करण्याचा मार्ग असलेली होर्मुझ सामुद्रधुनी इराणने बंद करून कोंडी निर्माण केली. सामुद्रधुनीतून सुरक्षित इंधन वाहतूक व्हावी म्हणून अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काही युरोपियन देशांना जहाजे तैनात करण्याचे आवाहन केले; परंतु त्यांना दाद मिळाली नाही. शेवटी ट्रम्प यांना इराणशी तात्पुरता समझोता करणे भाग पडले. दि. 8 एप्रिल 2026 रोजी अमेरिका आणि इराण यांच्यात पहिला तात्पुरता युद्धविराम झाला आणि त्यानंतर 17 जून 2026 रोजी दोन्ही देशांमध्ये युद्ध संपुष्टात आणण्यासाठी एका सामंजस्य करारावर स्वाक्षर्‍या झाल्या. हाच करार (युद्धविराम) संपुष्टात आल्याची घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केल्याने पश्चिम आशियात पुन्हा युद्ध सुरू झाले असून, अमेरिकेने इराणवर हल्ले सुरू केले आहेत. इराणने प्रत्युत्तर म्हणून अमेरिकन लष्करी तळ असलेल्या शेजारील देशांवर हल्ले सुरू केले असून, होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद केल्याने तणाव आणखी वाढला आहे. त्यामुळे जागतिक अर्थव्यवस्था पुन्हा मंदावण्याची चिन्हे दिसू लागली आहेत, सोन्याचे भाव वाढू लागले आहेत, शेअर बाजारांत मंदी येऊ लागली आहे आणि खनिज तेलाचे आंतरराष्ट्रीय दर पुन्हा वाढू लागले आहेत. होर्मुझच्या सामुद्रधुनीत पुन्हा एकदा युद्धाचे ढग दाटून आले आहेत. ट्रम्प यांच्या भूमिकेने आणि इराणच्या आक्रमक उत्तराने पश्चिम आशियात पुन्हा एकदा
अनिश्चितता निर्माण झाली आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीतील मार्गावर व्यापारी जहाजांवर पुन्हा हल्ले झाले. होर्मुझमधून जाणार्‍या जहाजांच्या सुरक्षेची जबाबदारी ज्या कलमानुसार इराणकडे देण्यात आली होती, त्या कलमाचे अमेरिकेनेच उल्लंघन केल्याचा इराणचा आरोप आहे. या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीनंतर अमेरिकेने दक्षिण इराणमधील लष्करी तळांवर आणि बंदरांवर विमानांतून बॉम्बवर्षाव सुरू केला आहे. अमेरिकेचे हे हल्ले केवळ प्रतीकात्मक नाहीत; अमेरिकेने इराणचे सवार्ंत मोठे बंदर असलेल्या बंदर अब्बासला लक्ष्य केले आहे, जे इराणच्या नौदलाचे आणि इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सचे मुख्य केंद्र आहे. इराणच्या किनारपट्टीवरील शहरांमध्ये झालेल्या हल्ल्यांनी इराणच्या लष्करी पायाभूत सुविधांना मोठा तडाखा दिला आहे. इराणने केवळ शब्दांनी उत्तर दिले नाही, तर कुवेत आणि बहरीनसारख्या अमेरिकन तळ असलेल्या देशांवर क्षेपणास्त्रे आणि ड्रोन डागून आपली ताकदही दाखवून दिली. गेल्या दोन दिवसांत हल्ले-प्रतिहल्ले सुरू आहेत. होर्मुझच्या सामुद्रधुनीत व्यापारी जहाजांवर झालेल्या
हल्ल्यांनंतर अमेरिकेने इराणच्या पाच प्रांतांवर एकाच वेळी हल्ले सुरू केले आणि इराणने अमेरिकेच्या या लष्करी हल्ल्यांना प्रत्युत्तर दिले. अमेरिकेला पाठिंबा देणार्‍या कोणत्याही देशाविरुद्ध प्रत्युत्तर देण्याचा इशाराही इराणने आधीच दिला होता. पाच प्रांतांवर झालेल्या हल्ल्यांचा बदला म्हणून इराणने कुवेत, बहरीन आणि जॉर्डनला लक्ष्य केले. या देशांतील अमेरिकन लष्करी तळांवर क्षेपणास्त्रेे आणि ड्रोन्स डागण्यात आली. इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सने (आयआरजीसी) अमेरिकेला प्रत्युत्तर म्हणून कुवेत, बहरीन आणि जॉर्डनमध्ये अनेक ठिकाणी हल्ले केल्याचा दावा केला. इराणने जॉर्डनच्या प्रिन्स हसन एअरबेसवरील इंधन टाक्या आणि क्षेपणास्त्र डेपोंना लक्ष्य केले, तर बहरीनमध्ये अमेरिकेच्या ड्रोन कमांड सेंटरवर स्फोट झाला. अमेरिकेने हल्ले थांबवले नाहीत, तर त्यांचे तळ उद्ध्वस्त करू, असा इशाराही इराणने दिला. इराणकडून अनेक क्षेपणास्त्रेे डागण्यात आल्याचा दावा जॉर्डनने केला, तसेच इराणची चार क्षेपणास्त्रे
पाडल्याचाही दावा जॉर्डनने केला. आमची हवाई संरक्षण यंत्रणा शत्रूच्या
क्षेपणास्त्रांंचा मुकाबला करत असल्याचे कुवेतने म्हटले आहे. हवाई संरक्षण यंत्रणेने अनेक क्षेपणास्त्रे पाडल्याचा दावाही कुवेतने केला. दुसरीकडे, अमेरिकी सैन्याने इराणच्या सुमारे 140 लष्करी लक्ष्यांवर हल्ला केला. युद्धविराम संपल्याची घोषणा ट्रम्प यांनी केल्यानंतर इराणने अमेरिकेशी संलग्न असलेल्या ठिकाणांवर आणि देशांवर हल्ले केले. पश्चिम आशियात अमेरिकेला पाठिंबा देणारे कुवेत, बहरीन, जॉर्डन, संयुक्त अरब अमिराती यांसारखे देश इराणच्या रडारवर आहेत. अमेरिकेने पुन्हा हल्ले केल्यानंतर इस्रायल शांत असला, तरी पुढे काय होणार, हा प्रश्न जगासमोर आहे. अमेरिकेकडून लष्करी कारवाया वाढविल्यास परिस्थिती आणखी चिघळण्याची शक्यता आहे. ट्रम्प यांनी आधीच फिनिश द जॉब, असा इशारा दिलेला आहे. त्यामुळे अमेरिका आता इराणच्या अंतर्गत भागांना लक्ष्य करू शकते. अमेरिकेचा नौदलाचा ताफा आपल्या मित्रराष्ट्रांसह व्यापारी जहाजांना संरक्षण देण्यासाठी होर्मुझमध्ये तैनात होऊ शकतो. 7 जुलैलाच अमेरिकेने इराणला तेलाच्या निर्यातीत दिलेली तात्पुरती सवलत रद्द केली असून, आता इराणकडून तेल खरेदी करणार्‍या आशियाई देशांवर दुय्यम निर्बंध लादण्याची तयारी अमेरिका करत आहे. इराणची आंतरराष्ट्रीय बँकांमधील खाती गोठवून इराणची आर्थिक कोंडी करण्याचाही अमेरिकेचा प्रयत्न आहे. सध्या सर्वच बाबतीत अनिश्चितता असली, तरी पडद्यामागे पाकिस्तानच्या मध्यस्थीने अमेरिकन मुत्सद्दी इराणच्या संपर्कात असल्याचे म्हटले जाते. लष्करी दबाव कायम ठेवून इराणला वाटाघाटींच्या टेबलावर आणणे आणि त्यांच्याकडून युरेनियम संवर्धनावर पूर्ण बंदी, होर्मुझमध्ये कायमस्वरूपी शांततेची हमी आणि क्षेपणास्त्र कार्यक्रमावर मर्यादा घालून घेणे, हाच अमेरिकेचा अंतिम हेतू आहे. त्याचवेळी अणुप्रसारबंदी करारातून बाहेर पडणे आणि स्वतःचे अणुधोरण बदलणे, अशा काही पर्यायांवर इराणच्या संसदेत चर्चा सुरू असल्याचे सांगितले जात आहे. इराण आणि अमेरिका या दोन्ही देशांना शांततेची गरज होती. म्हणूनच त्यांनी तात्पुरत्या युद्धविरामावर सहमती दर्शवली होती. आता अनिश्चिततेच्या या परिस्थितीत दोन्ही देश पुन्हा एकत्र बोलणी करण्यास राजी होतील का, हा प्रश्नच आहे.

Uncertainty

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *