सिंहस्थात राहणार अखंडित वीजपुरवठा

मनपाचे नियोजन; गोदापार्क भागात नवीन वीज उपकेंद्र

नाशिक : प्रतिनिधी
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात कोट्यवधी भाविक येणार असून, या काळात भाविकांना अखंडित वीजपुरवठा करावा लागणार आहे. त्यानुसार महापालिकेने गोदा पार्क परिसरात नवीन 33/11 केव्ही जीआयएस वीज उपकेंद्र उभारण्याचा प्रस्ताव मनपाने तयार
केला आहे.
मनपाच्या नगररचना विभागाने या जागेबाबत अभिप्राय देताना मंजूर विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीनुसार खुल्या जागेत वीज उपकेंद्रासारख्या सार्वजनिक उपयुक्ततेच्या सुविधा उभारण्यास परवानगी देता येत असल्याचे स्पष्ट केले आहे. संबंधित भूखंडधारकांची संमती आवश्यक असल्याने महापालिकेने यासंदर्भात सार्वजनिक हरकती मागविल्या होत्या. 25 एप्रिल 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहीर नोटिशीनंतर 1 मेपर्यंत एकही हरकत प्राप्त झाली नसल्याची नोंद प्रशासनाने केली आहे. सिंहस्थाच्या पायाभूत सुविधांमध्ये या उपकेंद्राला महत्त्वाचा घटक मानले जात आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळा काळात भाविकांना अखंडित वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी नाशिक महापालिकेच्या या उपकेंद्रासाठी नाशिक शहर-1 मधील सर्व्हे क्रमांक 11 येथील 600 चौरस मीटर जागा महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीला उपलब्ध करून देण्यात येणार आहे. महावितरणच्या नाशिक मंडळाने ही जागा उपलब्ध करून देण्याची मागणी महापालिकेकडे केली होती. प्रस्तावानुसार नवीन उपकेंद्र कार्यान्वित झाल्यानंतर रविवार कारंजा आणि अशोकस्तंभ परिसरातील अतिभारीत वीजवाहिन्यांवरील ताण कमी होणार आहे.

Uninterrupted power supply during Simhastha.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *