यंदाचा नोबेल शांतता पुरस्कार जाहीर झाल्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा तिळपापड झाला, तर त्यांचे मित्र इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांना संताप व्यक्त करण्यावाचून पर्याय राहिला नाही. फारशा चर्चेत नसलेल्या नवनीतम उर्फ नवी पिल्लई यांना हा पुरस्कार जाहीर झाला आणि त्यानंतरच त्या भारतीय वंशाच्या असल्याचे भारतीयांना कळले. एरवी भारतीय वंशाचे लोक कुठे, काय करतात, याची कल्पनाही नसते. दुबईस्थित फ्लायदुबई कंपनीच्या विमानाचा घातपात उधळून लावणारे कॅप्टन वैमानिक स्मित मच्छार भारतीय असल्याचेही नंतर समजले. ते पायलट असल्याची कल्पना केवळ त्यांच्या परिवाराला आणि मित्रमंडळींनाच असेल, तसेच पिल्लई यांच्याबाबतीतही म्हणता येईल. पुरस्कार जाहीर झाल्याने ट्रम्प यांना नाराजी लपवता आली नाही. त्यांनी नॉर्वेवरच टीका केली आणि पिल्लई यांच्यावरही टीका केली. आठ युद्धे संपवल्याने आपल्याला आठ नोबेल पुरस्कार मिळायला हवेत, असा हास्यास्पद दावाही त्यांनी केला. या आठ युद्धांमध्ये त्यांनी पुन्हा एकदा भारत-पाकिस्तान युद्धाचा उल्लेख केला आणि ऑपरेशन सिंदूरला ते युद्ध समजतात; परंतु ऑपरेशन सिंदूर भारताने त्यांच्या मध्यस्थीने थांबवले नव्हते. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्याशी ट्रम्प बोलले असतील, पण युद्ध थांबवून पाच कोटी लोकांचा जीव वाचवल्याचा त्यांचा दावा
फुसका आहे. नोबेल पुरस्कार न मिळाल्याने त्यांचा संताप झाला असला, तरी नॉर्वे काय करणार? या पुरस्काराच्या निवडीत सरकारचा हस्तक्षेप नसतो; पुरस्कार देणारी समिती स्वतंत्र असते. काही देशांत सरकार तटस्थ समितीत लुडबूड करते, तसे नॉर्वेचे सरकार करत नाही. याच वर्षी 28 फेब्रुवारी 2026 रोजी अमेरिका-इस्राईलने इराणवर हवाई हल्ले केले. त्यात इराणचे सर्वोच्च धार्मिक नेते अयातुल्ला अली खामेनी मारले गेले आणि 3,300 हून अधिक लोक मारले गेले. मिनाब शहरातील शाळेवर झालेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात 168 मुलांचा मृत्यू झाला. त्यात मुलींची संख्या मोठी आहे. अशा परिस्थितीत ट्रम्प यांना पुरस्कार मिळाला असता, तर पुरस्कार मोठा झाला असता की, ट्रम्प मोठे झाले असते? आंतरराष्ट्रीय कायदा आणि शांततेच्या प्रसारासाठी दिलेल्या योगदानाबद्दल पिल्लई यांना नोबेल मिळाले. जगभरात युद्धगुन्हे आणि नरसंहार करणार्या गुन्हेगारांना आंतरराष्ट्रीय कायद्याच्या कचाट्यात आणण्यासाठी त्यांनी आयुष्यभर मोठे योगदान दिले. गेल्या वर्षी ट्रम्प यांनी आपल्याला नोबेल मिळावे, अशी जाहीर अपेक्षा व्यक्त केली होती, पण व्हेनेझुएलाच्या मारिया कोरिना मचाडो यांना 2025 चा पुरस्कार जाहीर झाला आणि ट्रम्प यांचे स्वप्न भंगले. 79 वर्षीय ट्रम्प यांची या प्रतिष्ठित पुरस्कारावर दीर्घकाळापासून नजर आहे. पुरस्कार न मिळाला तर तो अमेरिकेचा अपमान ठरेल, असे त्यांनी त्यावेळी म्हटले होते आणि त्यासाठी नॉर्वेवर दबावही आणला होता. यावर्षी त्यांनी हा पुरस्कार मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त केली नव्हती. मात्र, गेल्या वर्षी नाही तर यावर्षी आपल्याला मिळेल, अशी सुप्त इच्छा त्यांची होती. किंबहुना तशी असेलच; परंतु यावर्षीही अपेक्षाभंग झाला. नोबेल पुरस्कार मागणी करून मिळत नाही किंवा कोणी मागणी केल्याने मिळत नाही, हे जगातील सर्वांत शक्तिशाली देशाच्या अध्यक्षांना कोणी समजावून सांगावे? पिल्लई यांना 2026 चा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर ट्रम्प यांनी त्यांच्यावरच टीका केली. एका अमेरिकन वकिलाची पोस्ट त्यांनी शेअर केली, ज्यात पिल्लई यांना अमेरिका आणि इस्राईलचा द्वेष करणारी महिला म्हटले आहे. नोबेल समितीने पिल्लई यांना हा पुरस्कार देऊन एकप्रकारे सन्मानाचा अपमान केल्याचेही त्यांनी सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून सूचित केले. पिल्लई यांनी संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार आयोगाच्या प्रमुख म्हणून काम केले आहे. त्यांच्या अध्यक्षतेखालील एका समितीने गाझापट्टीतील इस्रायली कारवायांना नरसंहार म्हटले होते. त्यामुळे ट्रम्प आणि इस्राईल प्रशासनाचा त्यांच्यावर मोठा राग आहे. पिल्लई यांनी ट्रम्प यांना चोख उत्तरही दिले. जर्मनीतील न्यूरेंबर्ग येथे पहिल्यांदा प्रतिक्रिया देताना 85 वर्षीय पिल्लई यांनी उपरोधिकपणे म्हटले, ’तुम्ही जर जास्त टाळ्या वाजवल्या, तर कदाचित मी हा पुरस्कार ट्रम्प यांच्यासोबत शेअर करेन.’ हा टोमणा मारण्यामागे एक खास कारण आहे. गेल्या वर्षी मारिया कोरिना मचाडो यांनी स्वतःचे नोबेल पदक ट्रम्प यांना देऊन टाकले होते. त्यामुळे मीपण माझे पदक ट्रम्प यांना देऊ का?, अशा उपरोधिक सुरात पिल्लई यांनी ही टिप्पणी केली. पिल्लई यांचे जागतिक स्तरावर कौतुक होत असताना, ट्रम्प आणि त्यांच्या मित्रपक्षांच्या गोटात मात्र या पुरस्कारामुळे शांतता पसरली आहे. पिल्लई यांचे विधान पाहता, ट्रम्प हे स्वतःच स्वतःचे हसे करून घेत आहेत. इस्रायली मित्र बेंजामिन नेतान्याहू आणि त्यांच्या प्रशासनानेही अत्यंत तीव्र आणि संतप्त प्रतिक्रिया दिली. नेतान्याहू यांच्या कार्यालयाने निवेदन जारी करून म्हटले, ’नोबेल पुरस्कार समितीने आपली नैतिक दिशा गमावली आहे.’ पिल्लई यांना पुरस्कार देण्याचा निर्णय चुकीचा व दिशाभूल करणारा असल्याचे त्यांनी म्हटले. नेतान्याहू यांनी पिल्लई यांना कट्टरपंथी संबोधले आणि एकमेव यहुदी देश असलेल्या इस्रायलविरुद्ध खोट्या कथा रचून आणि रक्तलांछन लावून आपली कारकीर्द घडवल्याचा आरोप केला. ’हा पुरस्कार न्याय दिल्याबद्दलचा सन्मान नाही, तर इस्रायलविरोधी द्वेष आणि पूर्वग्रहाला कायदेशीर मान्यता देण्यासाठी पुरस्काराचे केलेले क्रूर विद्रूपीकरण आहे,’ असे इस्रायलच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले. आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाचे अभियोक्ता करीम खान यांनी इस्रायलविरुद्ध उभा केलेला बनावट खटला पिल्लई यांनीच खोटी माहिती पुरवून कायदेशीर स्वरूप दिल्याचाही आरोप नेतान्याहू यांनी केला. पिल्लई युनोच्या इस्रायल-पॅलेस्टाइन स्वतंत्र चौकशी आयोगाच्या अध्यक्षा होत्या. त्यांच्या आयोगाने सप्टेंबर 2025 च्या अहवालात गाझामधील इस्रायली सैन्याच्या कारवाईला नरसंहार म्हटले आणि त्यासाठी थेट पंतप्रधान नेतान्याहू आणि त्यांचे प्रशासन जबाबदार असल्याचे नमूद केले. याच कारणामुळे नेतान्याहू आणि त्यांचे सरकार संतप्त झाले. नोबेल पुरस्कार जाहीर झाल्यानंतर कोणी कितीही टीका केली, नाराजी व्यक्त केली तरी काही फरक पडत नाही.
Unrest
न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…
मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…
डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…
वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…
नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…
महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…