सिन्नर : भरत घोटेकर
ग्रामीण भागात दुष्काळाचे सावट आणि आर्थिक अडचणींमुळे दिवाळीच्या उत्साहावर काहीसे विरजण पडले असताना सिन्नरच्या औद्योगिक नगरीत मात्र सणाचा उत्साह ओसंडून वाहू लागला आहे. माळेगाव, मुसळगाव आणि गोंदे औद्योगिक वसाहतींमधील विविध कारखान्यांनी कामगारांना भरघोस बोनसचे वाटप केल्याने त्यांच्या हातात मोठी रक्कम आली आहे. बोनस आणि मासिक पगार मिळाल्याने कामगारांनी दिवाळीच्या खरेदीसाठी सिन्नरच्या बाजारपेठेकडे धाव घेतली असून, बाजारपेठेत खरेदीचा उत्साह वाढला आहे. औद्योगिक क्षेत्रातील या आर्थिक उलाढालीमुळे सिन्नरच्या बाजारपेठेला दिवाळीपूर्वीच चांगली झळाळी मिळाली आहे.
दिवाळी हा आनंद, उत्साह आणि खरेदीचा सण मानला जातो. या काळात प्रत्येक कुटुंबाकडून कपडे, दागिने, मिठाई, फराळाचे साहित्य, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, घरगुती उपकरणे तसेच सजावटीच्या साहित्याची खरेदी केली जाते. मात्र, यंदा दुष्काळी परिस्थिती आणि शेतीतील आर्थिक अडचणींमुळे ग्रामीण बाजारपेठेवर काही प्रमाणात परिणाम झाला आहे. अशा परिस्थितीत औद्योगिक वसाहतींमधील कामगारांना मिळालेल्या बोनसने बाजारपेठेला मोठा आधार मिळाला आहे. कामगारांकडून दिवाळीच्या खरेदीला वेग आल्याने व्यापारीवर्गातही समाधानाचे वातावरण आहे. दरम्यान, माळेगाव, मुसळगाव आणि गोंदे औद्योगिक वसाहतींमधील विविध कंपन्यांमध्ये सीटूच्या माध्यमातून व्यवस्थापनाशी चर्चा करून कामगारांना त्यांच्या हक्काचा बोनस मिळवून देण्यात आला. दिवाळीच्या पूर्वसंध्येला बोनसची रक्कम हातात पडल्याने कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांचा सणाचा आनंद द्विगुणित झाला आहे. वर्षभर घाम गाळून उत्पादन प्रक्रियेत योगदान देणार्या कामगारांना बोनसच्या माध्यमातून त्यांच्या श्रमाचे आर्थिक बळ
मिळाले आहे.
शेतीवर अवलंबून असलेल्या ग्रामीण अर्थव्यवस्थेत आर्थिक चणचण जाणवत असताना औद्योगिक कामगारांच्या हातात आलेल्या बोनसच्या पैशांमुळे सिन्नरच्या बाजारपेठेत आर्थिक उलाढालीला चालना मिळाली आहे. त्यामुळे यंदाच्या दिवाळीत औद्योगिक नगरीतील बोनस हा केवळ कामगारांसाठी आनंदाचा विषय ठरला नसून, स्थानिक व्यापारीवर्गासाठीही आशादायी ठरत आहे.
असा मिळाला कंपनीनिहाय बोनस
जे. के. मैनी 36 हजार रुपये, बेलोटा 46 ते 51 हजार रुपये, सूर्या कोटिंग 40 ते 50 हजार रुपये, मार्को केबल 32 ते 50 हजार रुपये, मदन उद्योग 15 ते 20 हजार रुपये, फूड्स अँड इन्स 10 हजार रुपये, गलवी इंजिनिअरिंग 35 ते 42 हजार रुपये, एचयूएल 31 हजार 500 ते 34 हजार रुपये, एफडीसी 28 हजार रुपये, सिप्रा इंजिनिअरिंग 38 ते 46 हजार रुपये, हेम्पल पेंट 29 हजार रुपये आणि एव्हलॉन कॉस्मेटिक 20 ते 40 हजार रुपये. या बोनससाठी सीटूच्या माध्यमातून कॉ. डॉ. डी. एल. कराड, कॉ. सीताराम ठोंबरे, कॉ. संतोष काकडे, कॉ. हरिभाऊ तांबे आणि कॉ. संतोष कुलकर्णी यांनी विविध कंपन्यांच्या व्यवस्थापनाशी चर्चा करून पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांमुळे कामगारांना दिवाळीपूर्वी बोनस मिळण्याचा मार्ग मोकळा झाला.
Various factories in the Malegaon, Musalgaon, and Gonde industrial estates have distributed substantial bonuses to their workers.