डफांचा गजर, लयबद्ध पदन्यासाने शहर दुमदुमले; भैरवनाथ मंदिर परिसरात धार्मिक विधी
सिन्नर : प्रतिनिधी
मंगळवारच्या चंद्रग्रहणामुळे एक दिवस पुढे ढकलण्यात आलेला सिन्नर शहराचा ऐतिहासिक ‘वीरांचा पाडवा’ बुधवारी (दि.4) सायंकाळी पारंपरिक उत्साहात साजरा करण्यात आला. बदललेल्या तिथीची नोंद घेत नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या परंपरेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
बुधवारी सायंकाळी 5 वाजता गावठा परिसरातून मिरवणुकीला प्रारंभ झाला. डफांच्या गजरात आणि वीरांच्या घोषणांनी गावठा व लोंढे गल्ली परिसर दुमदुमून गेला. आबालवृद्धांनी पारंपरिक वीरांचा पोशाख परिधान करून डफांच्या तालावर आणि टाळांच्या नादात लयबद्ध पदन्यास सादर केला. वीरांच्या जोशपूर्ण हालचाली आणि तालबद्ध पदन्यास पाहून उपस्थित बघ्यांचे डोळे दीपून गेले. नागरिकांनी ठिकठिकाणी मिरवणुकीचे स्वागत करत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
मिरवणूक भैरवनाथ मंदिर परिसरात पोहोचल्यानंतर मुख्य सोहळ्याला सुरुवात झाली. मंदिराच्या पटांगणात वीरांचे पूजन, आरती, तसेच इतर धार्मिक विधी पार पडले. यावेळी वातावरणात भक्तिभाव आणि परंपरेचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला. भैरवनाथ मंदिरासमोर वीरांचा पारंपरिक पदन्यास सादर करण्यात आला, ज्यामुळे संपूर्ण परिसर उत्साहाने दुमदुमून गेला. हा सोहळा यशस्वी पार पाडण्यासाठी गावठा विभाग, परंपरा आपली, गावठा पंच मंडळ, युवा मित्र परिवार (सिन्नर गावठा), तसेच भद्रकाली माता पंच मंडळ (लोंढे गल्ली) यांच्या पदाधिकार्यांनी विशेष परिश्रम घेतले. परंपरा, श्रद्धा आणि उत्साह यांचा संगम असलेला ‘वीरांचा पाडवा’ यंदाही सिन्नरकरांच्या
उत्स्फूर्त सहभागामुळे संस्मरणीय ठरला.
डसन डुकरीची अनोखी परंपरा
पाडव्यानिमित्त ‘डसन डुकरी’ने शहरभर फेरी काढत विविध ठिकाणी जाऊन नागरिकांना आशीर्वाद दिले. हातात शिराई आणि तुटके सूप घेऊन ही डसन डुकरी शहरभर फिरली. आशीर्वादाच्या बदल्यात घरोघरी रोख बिदागी देऊन डसन डुकरीचे स्वागत करण्यात आले. या अनोख्या परंपरेचे दर्शन घेण्यासाठी शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. गेल्या कित्येक वर्षांपासून सिन्नर शहरात वीरांच्या पाडव्यानिमित्त ‘डसन डुकरी’ची ही परंपरा जपली जात आहे. स्थानिक संस्कृतीचा एक वेगळा ठेवा म्हणून ती ओळखली जाते.
‘Veerchancha Padwa’ in full swing in Sinnar