पंचवटी : वार्ताहर
नाशिक प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून (आरटीओ ) बेशिस्त वाहन मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली असून एकूण ३५ हजार ८७७ वाहनांवर कारवाई करत सुमारे १० कोटी १३ लाखांचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती प्रभारी प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रदीप शिंदे यांनी दिली.
नाशिक प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली असून सन जानेवारी २०२१ ते ऑगस्ट २०२२ पर्यंत एकुण ३५ हजार ८७७ वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून रक्कम रूपये १० कोटी १३ लाख एवढा दंड वसुल करण्यात आला आहे. विहीत वेग मर्यादेपेक्षा वेगाने वाहन चालविणा-या वाहन धारकांवर राज्यामध्ये सर्वाधिक कारवाई प्रादेशिक परिवहन कार्यालय, नाशिकने केली आहे. त्यामध्ये सन २०२१- २०२२ मध्ये एकुण ( ४५९४ ) वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली आहे. तर सन २०२२-२०२३ मधील ( १ एप्रिल २०२२ ते ३० सप्टेंबर २०२२ ) या सहा महिन्यात सुमारे ११ हजार ५९१ वाहनधारकांवर कारवाई करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे विना हेल्मेट दुचाकी स्वारांवर राज्यामध्ये सर्वाधिक कारवाई नाशिक कार्यालयाकडून करण्यात आली आहे. सन २०२१-२२ मध्ये एकुण ३ हजार ६२७ दुचाकी स्वारांवर कारवाई करण्यात आलेली होती. तर २०२२ -२०२३ या वर्षातील ( १ एप्रिल २०२२ ते ३० सप्टेंबर २०२२ ) मध्ये एकुण ३०४७ दुचाकी चालकांवर
कारवाई करण्यात आली आहे . तसेच खाजगी बस व अवैध प्रवासी वाहतुकीच्या विरोधात केलेल्या मोहिमेमध्ये एप्रिल २०२१ ते सप्टेंबर २०२२ या कालावधीमध्ये ४ हजार १४३ वाहनांची तपासणी करण्यात आली असुन यातील ७५६ दोषी वाहनांकडून दंड व कर स्वरूपात एकुण २० लाख ४८ हजार ९२५ रूपये इतका महसूल वसूल करण्यात आला आहे.