महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणजे पंढरपुरातील पांडुरंग, विठोबा. राज्यभरातील वारकरी लाडक्या विठुरायाला भेटण्यासाठी वर्षातून एकदा तरी पंढरीला जातात. ज्या भाविकांना पंढरपूला जाणे शक्य नाही, ते नाशिकरोडच्या विहितगावमधील प्रसिद्ध प्रति पंढरपूर मंदिरात जाऊन लीन होतात. येथील विठ्ठल मंदिराचा इतिहास अतिशय उत्कंठापूर्ण आहे.
साधारणतः सोळाव्या शतकातील ही गोष्ट आहे. राज्यभरातून वारकरी बांधव पंढरीनाथाच्या भेटीसाठी पंढरपूर येथे वारीला गेले होते. इतर वारकर्यांप्रमाणे पुणे जिल्ह्यातील कात्रज-मांडवगण येथील आईसाहेब देशमुखही एकाग्रचित्त होऊन कीर्तन ऐकत होत्या. मात्र, त्यांना अचानक कीर्तनकार सद्गुरूंमध्ये चक्क विठोबारायाची छबी दिसू लागली. प्रत्यक्षात भगवंतच कीर्तन करत असल्याचे त्यांच्या आध्यात्मिक मनाला वाटले. कीर्तन संपल्यानंतर आईसाहेबांनी या कीर्तनकारास भेटण्याचा अतोनात प्रयत्न केला. मात्र, गर्दी असल्याने त्यांची महाराजांसमवेत भेट झाली नाही. त्यांची भेट व्हावी याकरिता पांडुरंगाकडे प्रार्थनाही केली. त्यानंतर दुसर्या दिवशी सकाळी चंद्रभागेत स्नान करताना सुंदर अशी भगवान पांडुरंगाची मूर्ती त्यांच्या हाती लागली. हा पांडुरंगाचा चमत्कार पाहून आईसाहेब खूप आनंदी झाल्या. त्यांनी भगवंताचे मनोमन आभार मानले.
ज्या महाराजांमध्ये साक्षात विठ्ठलाचे दर्शन घडले, त्यांचे वर्णन करून, भेटणार्या प्रत्येक वारकरी, कीर्तनकाराकडे विचारपूस करू लागल्या. अशातच काही वारकर्यांकडून आईसाहेबांना समजले की, ते सद्गुरू नाशिकचे आहेत. सद्गुरूंच्या भेटीसाठी व्याकुळ झालेल्या आईसाहेबांनी चंद्रभागेत मिळालेली विठ्ठलमूर्ती घेऊन थेट पंचवटीतील रामकुंड गाठले. तेथे येणार्यांकडे महाराजांचे वर्णन करून त्यांची माहिती मिळविण्याचा प्रयत्न करू लागल्या. योगायोगाने विहितगावातील काही वारकरी रामकुंडावर आले असताना त्यांची आणि आईसाहेबांची भेट झाली. आईसाहेबांनी वर्णन केलेले सद्गुरू पळसे येथे वास्तव्यास असल्याची माहिती या वारकर्यांकडून मिळताच आईसाहेब त्यांच्यासमवेत विहितगाव येथे गेल्या. सोबत होती चंद्रभागेत मिळालेली पांडुरंगाची मूर्ती. त्यादिवशी योगायोगाने पळसेकर महाराजांचे कीर्तन विहितगाव येथे होते. विहितगाव मध्ये पूर्वीपासूनच वारकरी परंपरा असल्याने या ठिकाणी भजन व कीर्तन होत असे. विहितगावमध्ये त्यांनी ही मूर्ती ठेवली.
ज्यांच्या भेटीसाठी आईसाहेब पंढरपूरहून नाशिकला आल्या, त्या सद्गुरूंची भेट येथे झाली. पुढे आईसाहेबांनी त्यांनाच आपले सद्गुरू मानले आणि त्यांच्या शिष्य बनल्या. पळसेतच राहून पांडुरंगाची भक्ती करू लागल्या.
पंढरपूरला मिळालेली मूर्ती विहितगावातील मंदिरात ठेवली आहे, ती आपण पळसे येथे आणावी, असा विचार आईसाहेबांच्या मनात आला. त्या मूर्ती घेण्यासाठी येथे आल्या. मात्र, येथून विठ्ठलाची मूर्ती हलायलाच तयार नव्हती. उपस्थित वारकरीदेखील या चमत्काराने आश्चर्यचकित झाले. बराच वेळ प्रयत्न करूनही मूर्ती निघत नसल्यामुळे मूर्ती आहे त्याच जागी ठेवण्याचा निर्णय आईसाहेबांनी घेतला. तेथे मंदिर बांधण्यात आले आणि कालांतराने या मंदिराला प्रति पंढरपूर म्हटले जाऊ लागले. आईसाहेब नंतर पळसे येथे राहू लागल्या. पळसे गावातच त्यांचे सद्गुरू व आईसाहेबांची समाधी असल्याचे संत वाङ्मयाचे अभ्यासक डॉ. रामकृष्णदास लहवितकर महाराजांनी सांगितले. आईसाहेबांच्या सद्गुरूंच्या नावाबाबत मात्र स्पष्ट माहिती मिळत नाही. शालिग्राम जोशी यांनी आईसाहेब यांच्या जीवनावर स्वतंत्र काव्यात्मक प्रकरण लिहिले आहे. आईसाहेबांच्या पादुका सन 1661 मध्ये विहितगाव येथील मंदिरात ठेवण्यात आल्या आहेत. या विठ्ठल मंदिराची जेवढी
चर्चा होते, त्यामध्ये पळसेचे महत्त्वदेखील तेवढेच मोठे आहे. आईसाहेबांचा आणखी एक अनुभव असा की, नाशिकला कुंभमेळा असताना काही संन्यासी पळसे येथून जात होते. त्यांनी आईसाहेबांकडे तूप मागितले. त्यावेळी आपल्याकडे तूप नसल्याचे आईसाहेबांनी त्यांना सांगितले. मात्र, विहिरीतून पाणी काढण्यास गेल्या असता, त्यातून पाण्याऐवजी तूप निघाले, अशी आख्यायिका सांगितली जाते.
(शब्दांकन ः दिनेश हांडोरे)
आईसाहेबांच्या चरणीही भाविक होतात नतमस्तक
विहितगावला मंदिरात येणारा भाविक पांडुरंगाच्या मूर्तीबरोबरच आईसाहेबांच्या चरणीही नतमस्तक होत असतो. आईसाहेबांमुळे विहितगाव येथे प्रति पंढरपूर निर्माण झाले. काही वर्षांपूर्वी येथील विठ्ठलाची मूर्ती नव्याने स्थापित करण्यात आली. नाशिकरोड परिसरातील आजूबाजूच्या गावांमध्ये पूर्वीपासून वारकरी बांधवांची संख्या मोठी आहे. विहितगाव मंदिरात पंढरपूरच्या धर्तीवर गरुड खांबदेखील चांदीचा आहे. येथील मंदिरात गेल्यावर पंढरपूरला आल्याचीच अनुभूती मिळते. त्यामुळे दर पंधरा दिवसांनी येणार्या एकादशीला पंचक्रोशीतील भक्तांची मंदिरात मोठी गर्दी होते. आषाढी व कार्तिकी एकादशीला तर दर्शनासाठी मोठ्या रांगा लागतात. यावेळी मोठा उत्सव येथे साजरा होतो. या मंदिरात आल्यावर मनाला एक वेगळेच समाधान, शांतता लाभते. भाविकांचे, वारकर्यांचे श्रद्धास्थान असलेल्या या मंदिराची ख्याती दिवसेंदिवस वाढेल, यात शंका नाही.
बँकेची विशेष सर्वसाधारण सभा विविध विषयांवरून गाजली नाशिक : प्रतिनिधी नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची…
ग्रामीण भागात पुरुष अग्रेसर, शहरात मात्र अनास्था नाशिक ः प्रतिनिधी कुटुंबात एक किंवा दोन मुले…
शिंदे सेनेसह ठाकरे गट, मनसेचा पर्याय; नव्या समीकरणाकडे लागले लक्ष नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या…
मालेगावला संगमेश्वरमधील जमीन चुकीच्या पद्धतीने केली वर्ग एक मालेगाव : नीलेश शिंपी शहरातील संगमेश्वर येथील…
वाखारीत आज रिंगण सोहळा; वर्षानंतर संतांची गळाभेट, त्यानंतर नगर प्रवेश त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी आषाढवारीसाठी निघालेली…
मे महिन्यात 42 टक्क्यांची विक्रमी वाढ नाशिक : प्रतिनिधी नाशिकच्या ओझर विमानतळावरून प्रवास करणार्या प्रवाशांची…