वर्धापनदिन विशेष

व्हिजन २०२२ – माझ्या नजरेतून

भाग १
डॉ. संजय धुर्जड
सालाबादप्रमाणे – स्वातंत्र्य दिनानिमित्त
२०२२ अर्ध्याच्या वर उलटून गेला आहे. आता काही महिन्यांनी हे साल ही संपेल. असेच ७५ वर्षे देखील संपलीत. त्याच्या पूर्वीही अनेक दशके आणि शतके संपली. मराठीत एक शब्दप्रयोग होत असतो, “सालाबादप्रमाणे”. याचा अर्थ असा की कैक वर्षांपासूनची एखादी परंपरा एखादया विशिष्ट पद्धतीने पार पाडली जाते, किव्हा एखादे कार्य दर वर्षी सिद्धीस नेले जाते, अशा आशयाच्या संदर्भात या शब्दाचा प्रयोग केला जातो. असे होणे म्हणजे आपल्या भावी पिढीसाठी खुप काही देऊन जाणार आहे, कारण याच “सालाबादप्रमाणे” होणाऱ्या कार्यक्रमामुळे आपली संस्कृती, सणवार, सोहळे पिढ्यांपिढ्या पुढे चालत आलेले आहे. युवकांना चांगले विचार, चांगले संस्कार, चांगल्या रूढी परंपरा, चांगली संस्कृती माहीत करून घेण्यासाठी मदत होते. एकविसाव्या शतकाच्या सुरवातीपासून आपले जग आणि विशेषतः आपला देश खूप झपाट्याने बदलायला लागला आहे, आणि बदल बदल घडण्याचा वेगही विद्युत गतीचा झाला आहे. बघा ना, २०१४ पूर्वीचा भारत आणि आजचा भारत, तसेच कोविड पूर्वीचा भारत आणि आजचा भारत किती बदलला आहे. यामुळे “सालाबादप्रमाणे” या शब्दाचा फारसा वापर होईल असे वाटत नाही. या वर्षी आपण “आझादी का अमृत महोत्सव” साजरा करतोय. १५ ऑगस्ट ला “सालाबादप्रमाणे” ध्वजारोहण आणि स्वातंत्र्याचा उत्सव साजरा होणार, हे निश्चित. परंतु, या वळणावर प्रत्येकाला आत्मपरीक्षण, आत्मविश्लेषण तसेच स्वतःला जाब विचारणे गरजेचे वाटते. मी असे का म्हणतोय, तर वाचा…
“सालाबादप्रमाणे” १४ ऑगस्टला स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला महामहिम राष्ट्रपतींकडून देशाला संदेश देण्यात येईल. १५ ऑगस्टला सकाळी लाल किल्ल्यावरून मा. पंतप्रधान साहेब देशाला उद्देशून भाषण करतील. तद्नंतर दिल्लीतील राजपथावर सैनिकी तसेच सांस्कृतिक कवायती आणि प्रदर्शने बघायला मिळतील. असे गेली ७५ वर्षे आपण बघतोय. तसं नव्हे, आपल्या प्रत्येकाला देशाचा स्वाभिमान आहेच, देशासाठी प्रणाहूती देणाऱ्यांचा सन्मान आहे, प्रोटोकॉल आहे, हे झालेच पाहिजे. परंतु, ज्या सहजतेने, निष्क्रियतेने आणि बोथट भावनेने हे सर्व बघत आलेलो आहोत, त्याच प्रकारे आपण या देशात घडणाऱ्या अत्याचारी आणि भ्रष्टाचारी गोष्टी बघत आलो आहोत, आणि “सालाबादप्रमाणे” पुढे येणाऱ्या काळातही बघत राहू, असे माझे ठाम मत आहे. कागदावर आपला देश भलेही खूप बळकट आणि प्रगत (प्रगतिशील) वाटत असेल, पण सत्यता काही वेगळीच आहे, हे मी तुम्हाला वेगळे सांगायला नको. आपण सुज्ञ आहात, रोज टीव्ही आणि पेपर मधून कळत असेल, की आपण कुठे आहोत आणि कुठे चाललो आहोत. जर, तुम्ही माझ्या मताशी सहमत नसाल, तर एकतर तुम्ही खोटं बोलत आहात, किव्हा खरं काय ते तुम्हाला माहीत नाही आणि माहीत करूनही घ्यायचं नाही. काही घटना सांगतो, त्यावरून तुम्ही समजून घ्या, एव्हढंच. बाकी आपण समजदार आहातच.
काल मी व्हाट्सअप्प वर एक व्हीडिओ बघितला. एका सत्य परिस्थिती बद्दलचा वृत्तांत होता. आपल्याच, नाशिक जिल्ह्यातील पेठ तालुक्यातील एका गावातील चित्रीकरण होते. सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सर्वच नद्यांना पूर आलेला आहे. तिकडेही आलेला आहे. दोन गावांच्या मधून वाहणाऱ्या नदीला लोक पार करत होते. पुलावरून नाहीवतर चक्क, पाण्यातून चालत जात होते. आठ दहा पुरुष मंडळी होती. तुम्ही म्हणाल यात काय नवल आहे ? बरोबर आहे आपले म्हणणे. यात बिलकुल नवल नाही. नवल या गोष्टीचं आहे की त्या पुरुषांच्या अंगाखांद्यावर ५ – ७ वर्षांची लेकरं होती. तीही, शाळेचा गणवेश परिधान केलेली. दुसरी नवलाची बाब म्हणजे, काही बालकांना स्वयंपाकाच्या मोठ्या पातेल्याची नाव करून त्यात बसवून तरंगत आणि त्याच्या मागे पोहून एका किनाऱ्यावरून दुसऱ्या किनाऱ्यावर घेऊन जातांनाचे चित्रकरण होते. याचा अर्थ, ती सर्व मुलं एका शाळेचे विद्यार्थी आहे. वृत्तांतात सांगितल्यानुसार, नदीच्या पलीकडल्या गावात शाळेत जाण्यासाठी पालकांना आपल्या भावी पिढीला असे डोक्यावर, पाण्यातून चालत किव्हा पातेल्याच्या होडीला पोहून पार करावे लागत आहे. मला तर तो व्हीडिओ बघतांना पाण्याचा प्रवाह बघून विचार आला, की जर हे पातेलं त्यांच्या हातून निसटलं तर काय होईल. नुसता विचारच मनाला सुन्न करून गेला. आणि दुसऱ्या क्षणाला विचार आला, की खरंच आपण आपण स्वतंत्र झालो आहोत का ? आणि जर झालो आहोत तर खरंच ७५ वर्षांत आपण काय मिळवलं आहे ? आपण या देशाचे नागरिक म्हणून देशाला काय दिलं आहे ? प्रत्येक गावात एक प्राथमिक शाळा, एक प्राथमिक आरोग्य केंद्र, एक प्राथमिक गरज असलेली पेयजन्य शुद्ध पाणी पुरवठा योजना, सार्वजनिक शौचालय पुरवू शकलो नाही. जिथे गावागावात, चौकाचौकात मंदिरं आहेत तिथे हे मानवतेचे मंदिरं का नाही बंधू शकलो? असा प्रश्न आज आपण स्वतःला विचारावा अशी वेळ आलेली आहे. नक्की विचार करा.
दर पाच “सालाबादप्रमाणे” आपल्याकडे स्थानिक, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील निवडणुका होतात. “सालाबादप्रमाणे” आपल्याकडे नेतेमंडळी मत मागण्यासाठी येतात. आपणही निवडणुकीत भाग घेतो आणि मतदान करतो. मतदान कसे करतो, हे काही वेगळे सांगायला नको. आणि मग आपण आपले प्रतिनिधी निवडून देतो. आपल्या आवडीचा नि निवडीचा प्रतिनिधी निवडून येईलच याची खात्री देता येत नाही. ही लोकशाही आहे, यात सर्वाधिक मते मिळवणारा उमेदवार निवडून येतो. त्याला आपण आपला प्रतिनिधी मानतो. तो पुढील पाच वर्षात आपल्यासाठी किती आणि स्वतःसाठी किती कामं करतो, हे ही आपण बघितलेलं आहे. तरी, पुन्हा पाच वर्षानंतर तो पुन्हा मत मागण्यासाठी येतो, तेव्हा आपण त्याला जाब विचारत नाही. जाब सोडा, साधे समस्यांचे प्रश्नही करत नाही. असेच, दर पाच “सालाबादप्रमाणे” ते येतात, मते घेतात, निवडून येतात आणि कारभार करतात. काही पंचवार्षिक नंतर त्यांचे अपत्य येतात आणि तेही निवडवून येतात. निवडून आल्यानंतर पुढे काय करतील याचा नेम नाही. अमुक एक पक्षाचा उमेदवार म्हणून निवडून दिल्यानंतर, तो त्या पक्षाशी एकनिष्ठ राहील याची गॅरंटी नाही. आज इकडे तर उद्या भलतीकडेच उडी मारतो. त्याला त्याच्या पक्षाशी काही घेणेदेणे नसते आणि त्याच्या नेत्याचीही काही पडलेली नसते. जर तो त्यांचा हाऊ शकत नाही, तर तो तुमचा काय होणार आहे, हे न उमगण्याइतके मूर्ख झालो आहोत का आपण ? नकीच नाही. सर्व कळते, पण आपण हतबल झालो आहोत. काही करु शकत नाही, कारण आपल्या हाती काही उरलेलंच नाही. किंबहुना, आपल्या हाती काही उरवूच दिले नाही. फक्त टीव्ही समोर बसून तमाशा बघणे, पेपरमध्ये वाचून त्या कोलांट्याउड्या बद्दल तर्कवितर्क बांधणे, एव्हढंच काय ते आपण करू शकतो. मग विचार येतो की, का याच्यासाठीच आपल्या स्वातंत्र्यसैनिकांनी आणि त्यावेळच्या नागरिकांनी लोकशाहीचा हट्ट केला होता ? गेल्या ७५ वर्षांत दशकागणिक राजकारणाची पातळी घसरायला लागली आहे. बरं, या पैकी कुणीही धुतल्या तांदळाचा नाही. सर्वच बरबटलेले आहेत. प्रमाण कमी अधिक आहे, एव्हढाच काय तो फरक आहे.
देशासाठी आणि जनतेसाठी व्हिजन वगैरे काही नाही. दिखाव्यापुरते निवडणुकीच्या वेळी पक्षाच्या वचननाम्याचे गाजर जनतेच्या पुढे ठेवतात. मोठमोठाल्या सभेतून बेंबीच्या देठापासून आणि घसा खरडून आश्वासनांची खैरात वाटत फिरतात. त्यांच्या मागे त्यांचे लाडके कार्यकर्ते झेंडे घेऊन मिरवतात, आणि भोळी जनता मात्र हताशपणे हे सर्व बघत राहते. एकदा का मतदान झाले की तुम्ही कोण आणि आम्ही कोण. ना नेते जनतेला ओळखत ना जनता नेत्याला. जनतेचे काय हाल होताय, याच्याशी काहीएक घेणे नाही. आपल्या राज्यात बघितलंच की तुम्ही, दोन महिन्यांपासून सरकार नावाची गोष्टच अस्तित्वात नाही. जनतेची कामं करण्यापेक्षा एकमेकांचेच काम करण्यासाठीच सर्व नेते कामाला लागले आहे. सगळंच रामभरोसे चालू आहे. अडीच वर्षांपूर्वीही अशीच अवस्था होती. जनता वाऱ्यावर. जी कामं झाली ती झाली. ठरवून झाली नाही. राज्यात असे, आणि राष्ट्रीय पातळीवर थोडे वेगळे आहे. प्रत्येक व्यक्तीला मूलभूत सुविधा पुरविणे हे सरकारची जबाबदारी आहे. अन्न, वस्त्र, निवारा या व्यतिरिक्त नोकरी, शिक्षण, आरोग्य, न्याय, संरक्षण आणि माहिती मिळणे हा प्रत्येक नागरिकाचा हक्क आणि अधिकार आहे. तसेच प्रत्येक नागरिकाने जबाबदारी घेत कायदा, सुव्यवस्था आणि नियम पाळावे. देश आणि देशवासीयांबद्दल प्रेम, आदर, सद्भाव असावा, कामात शिस्त, प्रामाणिकपणा असावा हे नागरिकांकडून अपेक्षित आहे. असे म्हणतात की, जसा राजा, तशी प्रजा. राजामध्येच हे गुण नाहीत तर जनतेत कुठून राहणार. असे सर्वकाही आहे, तरीही आपल्याला स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र.
Devyani Sonar

Recent Posts

लासलगावी कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा आक्रमक ; कांद्याचे लिलाव पाडले बंद

लासलगावी कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा आक्रमक ; कांद्याचे लिलाव पाडले बंद लासलगाव:-समीर पठाण केंद्र सरकारने…

19 hours ago

नाशिक मविप्र मॅरेथॉन-२०२५’चा विजेता ठरला मुंबईचा डॉ. कार्तिक करकेरा

नाशिक मविप्र मॅरेथॉन-२०२५'चा विजेता ठरला मुंबईचा डॉ. कार्तिक करकेरा मागीलवर्षीच्या स्पर्धेतील विक्रम मोडीत, फूल मॅरेथॉनचे…

2 days ago

ऐकावे ते नवलच! 36 वर्षाच्या विवाहितेचा पंधरा वर्षाच्या मुलाला घेऊन पोबारा

ऐकावे ते नवलच! 36 वर्षाच्या विवाहितेचा पंधरा वर्षाच्या मुलाला घेऊन पोबारा सिडको :  विशेष प्रतिनिधी असे…

4 days ago

म्हणे, शिरवाडेच्या पुलावर भूत दिसले!

शिरवाडे ते धामोरी दरम्यानच्या पुलावर भूत निघाल्याची अफवा नागरिकांत भीतीचे वातावरण लासलगाव:-समीर पठाण धामोरी ते…

5 days ago

सातपूरला अतिक्रमणे हटवली

सातपूर : प्रतिनिधी नाशिक महानगरपालिका सातपूर विभागीय कार्यालय हद्दीतील राष्ट्रीय मुक्त फेरीवाला (हॉकर्स )झोन क्र…

6 days ago

शिक्षकाकडून विद्यार्थ्याला जबर मारहाण

शिक्षकाकडून विद्यार्थ्याला जबर मारहाण नाशिक: केवळ वही हरवली म्हणून इयत्ता तिसरीत शिकणाऱ्या विद्यार्थी आयुष् समाधान…

6 days ago