देशासाठी निष्काम भावनेने कार्य करू इच्छिणाऱ्या व्यक्तींनाच मतदान करा

देशासाठी निष्काम भावनेने कार्य करू इच्छिणाऱ्या व्यक्तींनाच मतदान करा

महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरीजी महाराज यांची सहा लोकसभा मतदारसंघातील भूमिका जाहीर..

नाशिक : प्रतिनिधी
राजकारणात निस्वार्थ-त्याग-वैराग्यता आणि सेवा-समर्पण असा भाव असणे आता गरजेचे आहे.अशा विचारातूनच देशसेवा करण्याची संधी मिळणार आहे. त्यासाठीच जय बाबाजी भक्त परिवाराने राजकारणाच्या शुद्धीकरणाची मोहीम हाती घेतली आहे.मतदान सर्वश्रेष्ठ दान आहे.नागरिकांनी शंभर टक्के मतदान करावे.मतदान करतांना देश सेवेची निष्काम भावना असणाऱ्या व्यक्तींनाच मतदान करावे असे आवाहन निष्काम कर्मयोगी जगदगुरू जनार्दन स्वामी महाराज धर्म पिठाचे पिठाधिश्वर महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराज यांनी केले आहे.
अखिल भारतीय जय बाबाजी भक्त परिवार सात लोकसभा मतदार संघात निर्णायक भूमिकेत आहे.भक्त परिवाराचे प्रमुख असलेले श्री श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरीजी महाराज नाशिक लोकसभा निवडणुकीत स्वतः अपक्ष उमेदवारी करत असून प्रचारात त्यांनी जोरदार आघाडी घेतली आहे. इतर सहा लोकसभा मतदार संघात देखील लाखोंच्या संख्येने असलेला जय बाबाजी भक्त परिवार निर्णायक भूमिकेत आहे.या मतदार संघातील आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराज यांनी हनुमान वाडी येथील कुटीया परिसरात पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. जय बाबाजी भक्त परिवार गेल्या अनेक वर्षांपासून राजकारणाचे शुद्धीकरण ही मोहीम राबवत आहे. सध्याचे राजकारण म्हणजे चिंतेचा विषय झाला आहे.जनतेचा सेवक जनतेचा मालक बनू पहात आहे.आपला पिढीजात धंदा असल्यासारखे राजकीय नेते निवडणुकीला सामोरे जात आहे.आपल्या स्वार्थासाठी तरुणांना व्यसनाच्या आहारी लावले जात आहे.अनेक प्रकारचे प्रलोभन देऊन मतदात्यांना आकर्षित करण्याचा प्रयत्न होत आहे.हे कृत्य भारतीय लोकशाही मोडीत काढण्याचे षडयंत्र आहे. त्यामुळं देश सेवेचा निष्काम भाव संपुष्टात आणला जात आहे. निवडणुका चांगल्या मार्गाने देखील जिंकता येतात.हे आम्ही नाशिकच्या निवडणुकीच्या माध्यमातून जय बाबाजी भक्त परिवार सिद्ध करत आहे.त्यासाठी जनता जनार्दनाने देखील आता साथ द्यावी. राज्यभरातील ठिकठिकाणी असलेला जय बाबाजी भक्त परिवार राजकारणाच्या शुद्धीकरणाचे अखंड कार्य करत आहे. जय बाबाजी भक्त परिवार सात ठिकाणी निर्णायक भूमिकेत असून छत्रपती संभाजी नगर,धुळे,जळगांव,जालना दिंडोरी,शिर्डी आदी लोकसभा मतदार संघातील निवडणुकीत देखील निस्वार्थी व देशभक्त उमेदवारांना निवडून आणण्यासाठी सक्रिय सहभागी आहे. नागरिकांनी निवडणुकीत सदसद विवेक बुद्धीने भारत माते प्रति प्रेम भावना असणाऱ्या व्यक्तींनाच मतदान करावे. समाजहिताचे,धर्महिताचे, देशहिताचे कार्य करणाऱ्या व्यक्तींनाच मतदान करावे. भारतभुमिच्या सर्व तत्वांचं रक्षण करण्यास सहकार्य करणाऱ्या व्यक्तींनाच लोकसभेत पाठवावे हीच जय बाबाजी भक्त परिवाराची तळमळीची भूमिका असून तेव्हाच देव-देश-धर्म हिताच्या कार्याचा सुगंध सर्वत्र दरवळेल असेही यावेळी महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराज यांनी आपली भूमिका स्पष्ट करतांना सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *