संपादकीय

युध्दग्रस्त भूकंपग्रस्त

 

 

पश्चिम आशिया म्हणजे आखातातील तुर्कस्तान म्हणजे तुर्की आणि सिरिया या देशांमध्ये सोमवारी एकापाठोपाठ एक भूकंपाचे धक्के बसल्याने पाच हजारापेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. मोठमोठ्या इमारती आणि घरांच्या ढिगाऱ्यांखाली हजारो लोक अडकून पडले असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती असून, हजारो लोक जखमी झाले आहेत. भारतासह सुमारे ७० देशांनी भूकंपग्रस्त तुर्कीत मदत आणि बचाव कार्यासाठी पथके पाठविली आहेत. सोमवारी तीन मोठे धक्के बसल्यानंतर मंगळवारी आणखी दोन धककेे बसल्याने तुर्कस्तान उद्ध्वस्त झाला असून, या देशाच्या १० प्रांतामध्ये आणीबाणी घोषित करण्यात आली आहे. युध्दग्रस्त सिरियातही भूकंपाचे धक्के जाणवले. सिरियात एका दशकाहून अधिक काळ गृहयुध्द सुरू असून, सिरिया व तुर्कस्तान या दोन्ही देशांना त्याची मोठी झळ पोहोचली असतानाच विनाशकारी भूकंपाचे धक्के बसल्याने आधीच विस्थापित झालेले नागरिक रस्त्यावर आले आहेत. तुर्कस्तानच्या सीमेलगत असलेला सिरियातील युध्दग्रस्त प्रदेश अन्न-धान्य आणि वैद्यकीय सुविधांच्या बाबतीत तुर्कस्तानवर अवलंबून आहे. दोन्ही देशांवर एकाचवेळी संकट आल्याने लोकांच्या जगण्यामरण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. सिरियात रशियाच्या पाठिंब्याचे समर्थित सरकार असून, बंडखोरांच्या ताब्यातील प्रदेश लष्कराने वेढला गेला आहे. तुर्कस्तानच्या सीमेलगत सीरियातील सुमारे ४० लाख निर्वासित आहेत. यातील बहुसंख्य नागरिक आधीच बॉम्बस्फोटांमुळे तकलादू झालेल्या इमारतींमध्ये राहात होते. भूकंपाच्या धक्क्याने या इमारती पत्त्यासारख्या कोसळल्या. युक्रेनविरुध्दच्या युध्दात अडकून पडलेल्या रशियातील सिरियातील नागरिकांना किती मदत होईल, असा प्रश्न आहे. तथापि, मोठ्या नैसर्गिक आपत्ती आल्यानंतर जगभरातील देश मदतीला धावून येतात. यावेळीही मदतीचा ओघ सुरू झाला आहे. यात भारत मागे नाही. अनेक देशांनी वैद्यकीय, आर्थिक मदत, शोध व बचाव पथके तुर्कस्तान, सीरियाच्या दिशेने रवाना केली आहेत. युरोपीय महासंघ व ‘नाटो’कडूनही भरीव मदत दिली जात आहे. तुर्कस्तानचे अध्यक्ष रेसेप तय्यिप एर्दोगन यांनी मदत करणार्‍या देशांचे आभार मानले आहेत. भूकंपामुळे झालेले मृत्यू आणि विध्वंस याबद्दल भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले. तुर्कस्तानच्या लोकांना शक्य ती सर्व मदत करण्यास भारत तयार असल्याचे त्यांनी जाहीर केले. भारताकडून दोन मदत आणि बचाव पथके तातडीने रवाना करण्यात आली असून, डॉक्टरांचे एक पथकही सोबत आहे. नैसर्गिक संकट अचानक उद्भवत असते. विनाशकारी संकट आले, तर सरकारी यंत्रणा गांगरून जाते. त्यात सिरियातील गृहयुध्द आणि त्याचा तुर्कस्तानवर पडणारा भार पाहता दोन्ही देशांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे.

 

भूकंपाची भविष्यवाणी?

 

भूकवचाखाली असलेल्या द्रवरुप पदार्थांमुळे जमिनीला जे हादरे बसतात त्याला भूकंप म्हणतात. भूकंपामुळे जमिनीच्या पोटात असणारे विविध स्तर मागेपुढे, खालीवर सरकून जमिनीला भेगा पडल्यामुळे भूकंप होतो. भूगर्भतज्ज्ञांच्या मते जगभरात दरवर्षी सुमारे ३० लाख भूकंप होतात. मात्र, हे आपल्या सहजासहजी जाणवत नाहीत कारण बऱ्याच ठिकाणच्या भूकंपाची तीव्रता कमी असते. बहुसंख्य भूकंप हे समुद्रात होतात. समुद्रातील भूकंपाची तीव्रता मोठी असेल, तर त्सुनामी लाटा उसळतात. भूकंपाची नोंद करणाऱ्या यंत्रास ‘सेस्मोग्राफ’ असे नाव आहे. रिश्टर स्केल या गणिती एककात हे यंत्र भूकंपाची नोंद करत असते. ज्वालामुखीच्या उद्रेक, मोठ मोठया धरणांचा जमिनीवर पडणारा ताण या कारणांनी भूकंप होतात. पृथ्वीच्या पोटात प्रचंड उष्णता असल्याकारणाने त्यात असलेला तप्त लाव्हारस उफाळून वर येऊन भूकंप होतात. खाणकाम, मोठया रस्त्याचा कामासाठी सुरुंग लावणे, जमिनीच्या आत घेतल्या जाणाऱ्या अणुचाचण्या अशा मानवनिर्मित कारणांमुळेही भूकंप होतात. नैसर्गिक आपत्तींपैकी भूकंपाची भविष्यवाणी करता येत नाही. जमिनीखाली भूकंपाची उत्पत्ती होण्यास आणि त्याचा धक्का पृथ्वीच्या पृष्ठभागापर्यंत पोहोचण्यास अवघे काही सेकंद लागतात. त्यामुळे अत्यंत कमी वेळात भूकंपाची भविष्यवाणी करता येत नाही. जमिनीखाली हालचाली वेगळ्या पद्धतीने होत असेल, तर प्राण्यांना विशेषतः कुत्र्यांना त्याची जाणीव होत असते. भूकंप होण्याच्या आधी कुत्री सुरक्षित स्थळी जातात आणि भुंकतात, असेही सर्वसाधारण निरीक्षण काही जाणकारांचे असते. तथापि, तुर्की, सिरियात भूकंप होणार असल्याची भविष्यवाणी तीन दिवस आधी भूकंपीय हालचालींचा अभ्यास करणार्‍या सोलर सिस्टम जियोमेट्री सर्व्हेचे एक संशोधक फ्रँक हूगरबिट्स यांनी केली होती. त्यांनी ती फेब्रुवारी रोजी ‘आज नाही, तर उद्या ७.५ रिश्टर स्केल तीव्रतेचाभूकंप दक्षिणमध्य तुर्की, जॉर्डन, सीरिया आणि लेबनाॅनमध्ये पाहायला मिळेल, असे ट्विटरवर जाहीर केले होते. यानंतर सोमवारी पहाटे ४ च्या सुमारास तुर्कस्तान आणि सीरियासह आसपासचे देश भूकंपामुळे हादरले. या भूकंपाची तीव्रता ७.८ इतकी होती. नंतर ७.६ रिश्टर ६.० तीव्रतेचे धक्के बसले. मंगळवारी ५.५ आणि ५.४ तीव्रतेचे आणखी दोन धक्के बसले. भूकंपाची भविष्यवाणी केली गेली, तरी विश्वास ठेवता येत नाही आणि परिस्थितीला तोंड देण्यासाठी अवधी मिळत नसतो. तुर्कस्तान आणि सिरियात तेच पाहायला मिळाले.

 

तुर्कीचे भूकंपाशी नाते

 

तुर्कस्तान आणि आसपासचे देश अ‍ॅनाटोलियन प्लेटवर हे देश ६ टेक्टोनिक प्लेट्सने वेढलेले आहेत. अ‍ॅनाटोलियन प्लेटच्या पूर्वेला ईस्ट अ‍ॅनाटोलियन फॉल्ट आहे, तर डाव्या बाजूला ट्रान्सफॉर्म फॉल्ट (दोष) आहे. दक्षिण आणि दक्षिण-पश्चिमेला आफ्रिकन प्लेट आहे. तुर्कस्तानच्या उत्तरेला युरेशियन प्लेट आहे. या प्लेट घड्याळाच्या काट्याच्या उलट्या दिशेने फिरतात. त्यामुळे या प्लेट्समध्ये सतत घर्षण होत असल्याने तुर्कस्तान आणि आसपासच्या देशांत भूकंपाचे हादरे बसतात, असे संशोधकांचे मत आहे. तुर्कस्तानमध्ये अनेकदा भूकंप झालेले आहेत. गेल्या २४ वर्षात तुर्कस्तानात भूकंपामुळे १८,००० हून अधिक लोकांनी आपला जीव गमावला आहे. याआधी १९३९ मध्ये इतक्याच तीव्रतेच्या भूकंपाने तुर्कस्तान हादरला होता. त्यावेळी तब्बल ३२,००० लोकांनी आपला जीव गमावला होता. सन १९७० नंतर ३ वेळा ६ मोठे भूकंप झाले. अलीकडच्या काही वर्षांमध्ये तुर्कस्तान आणि आसपासच्या प्रदेशात ५.०० पेक्षा जास्त तीव्रतेचे तीन भूकंप झाले आहेत. या प्रदेशातला शेवटचा मोठा भूकंप जानेवारी २०२० मध्ये झाला होता. ऑक्टोबर २०११ मध्ये पूर्व तुर्कस्तानमधील व्हॅन प्रांतात ७.२ रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचा भूकंप झाला. मार्च २०१० मध्ये पूर्व तुर्कस्तानमध्ये ६ रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचा भूकंप झाला. ऑगस्ट १९९९ मध्ये तुर्कस्तानमध्ये ७.६ रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचा हा भूकंप झाला होता. तुर्कस्थानचे राष्ट्राध्यक्ष रिसेप तय्यीप एर्डोगन यांनी तब्बल ९३ वर्षांपूर्वी तुर्कस्थानमध्ये भूकंपामुळे निर्माण झालेल्या भीषण परिस्थितीशी आताच्या भूकंपाची तुलना केली आहे. या परिस्थितीतून स्थिरस्थावर होण्यासाठी किती दिवस लागतील, याचा काही अंदाज नाही. भारतात महाराष्ट्रातील किल्लारी, लातूर आणि गुजरातमधील भुज भूकंप असेच विनाशकारी होते. भूकंपासारख्या नैसर्गिक आपत्तींपुढे जग हतबल आहे.

Ashvini Pande

Recent Posts

नाशिकरोड ‘एमपीए’च्या पदाधिकार्‍यांची निवड

नाशिकरोड : वार्ताहर युरेथ्रल स्ट्रिक्चर अत्याधुनिक पद्धतीने शस्रक्रिया कक्षींन आता सुरळीत करता येते. वारंवार यूरेथ्रा…

57 minutes ago

भव्य शोभायात्रा, सांस्कृतिक कार्यक्रमांनी महावीर जयंती साजरी

नाशिकरोड : वार्ताहर जैन धर्माचे 24 वे तीर्थंकार भगवान महावीर यांचा 2624 जन्मकल्याणक म्हणजे जन्मदिन…

1 hour ago

नैसर्गिक साधनांचा वापर करत विद्यार्थ्यांनी बनवली 140 घरटी

चिमण्यांसाठी केली दाणापाण्याची सोय, शहा येथील भैरवनाथ विद्यालयाचा पर्यावरणस्नेही उपक्रम सन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील शहा…

1 hour ago

पोलीस ठाण्यातच  दोन पोलीस एकमेकांना भिडले नेमके काय कारण घडले?

पोलीस ठाण्यातच  दोन पोलीस एकमेकांना भिडले नेमके काय कारण घडले? सिडको :  विशेष प्रतिनिधी सरकार…

2 hours ago

लासलगाव बाजार समितीच्या सभापतिपदी या नेत्याची निवड

लासलगाव बाजार समितीच्या सभापतिपदी या नेत्याची निवड   राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या आदेशाचे…

2 hours ago

अमेरिकेचा मोठा शत्रू

अमेरिकेचा मोठा शत्रू अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सुमारे ७५ देशांवर लादलेल्या जबर आयात शुल्कामुळे…

16 hours ago