मुख्य जलवाहिनी फुटल्याने पाणीपुरवठा होता बंद; रविवारपासून सिन्नरचा पाणीपुरवठा सुरू
सिन्नर : प्रतिनिधी
हरसुले शिवारात सिन्नर नगरपरिषदेची मुख्य जलवाहिनी फुटल्याने शनिवारी शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला. सायंकाळपासून सुरू असलेले दुरुस्तीचे काम मध्यरात्री एक वाजेपर्यंत चालले. त्यानंतर रविवारी सकाळी जलवाहिनीची तपासणी करून सकाळी दहा वाजेच्या सुमारास शहरातील जलकुंभ भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली.
हरसुले फाटा परिसरात सीएनजी गॅस लाइन टाकण्यासाठी खोदकाम सुरू असताना ही जलवाहिनी फुटली. या घटनेत हजारो लिटर पाण्याचा अपव्यय झाला. सुदैवाने हा प्रकार वेळेत लक्षात आल्याने तातडीने पाणीपुरवठा बंद करण्यात आला. मात्र, या घटनेमुळे शहरातील पाणीपुरवठ्याचे नियोजन एक दिवस पुढे ढकलावे लागले. नगरपालिका प्रशासनाने नागरिकांना त्याबाबत पूर्वसूचना देत सहकार्याचे आवाहन केले होते.
घटनेची माहिती मिळताच नगराध्यक्ष विठ्ठल उगले, उपनगराध्यक्ष हर्षद देशमुख आणि पाणीपुरवठा समितीचे सभापती पंकज मोरे यांनी घटनास्थळी भेट देत परिस्थितीची पाहणी केली. गॅस लाइन टाकण्यासाठी खोदकाम करणार्या संबंधित कंपनीला त्यांनी धारेवर धरले. त्यानंतर कंपनीकडून दुरुस्तीच्या कामात सहकार्य करण्यात आले.
सायंकाळी सुरू झालेले दुरुस्तीचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. सुरुवातीला रात्री दहा वाजेपर्यंत काम पूर्ण होईल, असा अंदाज होता. मात्र, प्रत्यक्षात काम पूर्ण होण्यासाठी मध्यरात्री एक वाजता एवढ्या उशिरा चाचणी घेणे शक्य नसल्याने रविवारी सकाळी टेस्टिंग करण्याचा निर्णय घेण्यात आला. सकाळी तपासणी पूर्ण झाल्यानंतर शहरातील जलकुंभ भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली.
उपनगराध्यक्ष मध्यरात्रीपर्यंत घटनास्थळी
उपनगराध्यक्ष हर्षद देशमुख हे दुरुस्तीचे काम सुरू झाल्यानंतर ते पूर्ण होईपर्यंत प्रत्यक्ष फिल्डवर उपस्थित होते. काम पूर्ण झाल्यानंतर ते घरी गेले. त्यानंतर रविवारी सकाळी पाणीपुरवठा विभागाच्या कर्मचार्यांसोबत टेस्टिंग करून शहरातील पाणीपुरवठा पूर्ववत करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला.
Water main repair until 1 am