अग्निशमनच्या ताफ्यात ‘वॉटर टॉवर’

सिंहस्थात निभावणार सुरक्षेची जबाबदारी

नाशिक : प्रतिनिधी
महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या ताफ्यात लवकरच (वॉटर टॉवर) अत्याधुनिक जलमनौरा खरेदी केला जाणार आहे. याकरिता तब्बल अठरा कोटींचा खर्च केला जाणार आहे. दरम्यान, या वॉटर टॉवरचा शहरातील गल्लीबोळ परिसरात आग लागल्यास त्यावर उपाययोजना करण्यासाठी मोठी मदत होणार आहे. यापूर्वी अग्निशमनचे मोठे वाहन अरुंद गल्लीत प्रवेश करू शकत नसल्याने विविध समस्या उद्भवत असे. ही अडचण लक्षात घेऊन सिंहस्थ कुंभमेळ्यातील गर्दी पाहता अग्निशमन विभागाने सदर टॉवर खरेदीचा निर्णय घेतला आहे.
शहरात सिडकोसह जुने नाशिक व इतरभागात अनेक अरुंद गल्लीबोळी असून, तेथे कधीही आगीची आपत्ती ओढवल्यास आग नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशमनला अडचणी येत असल्याचे यापूर्वी दिसून आले आहे. नाशिक शहराची लोकसंख्या 25 लाखांच्या पुढे गेली असून, शहरात बहुमजली इमारतींची संख्या वाढत आहे. प्रस्तावित जलमनोर्‍याची सहा हजार लिटर पाणी साठवण्याची क्षमता असून, सुमारे 30 ते 45 मीटर उंचीपर्यंत पाण्याचा मारा करू शकत असल्याने आगीवर नियंत्रण मिळवले जाऊ शकते. दरम्यान, वॉटर टॉवरबरोबरच तीन कोटी रुपये खर्चून अग्निशमन रोबोटदेखील खरेदी केला जाणार आहे. हा रोबोट धूर, तीव्र उष्णता आणि धोकादायक रासायनिक वातावरणातही कार्य करू शकतो. जवानांचा जीव धोक्यात न घालता आगीवर नियंत्रण मिळविणे आणि बचावकार्य अधिक सुरक्षितपणे करणे शक्य होणार आहे. महापालिकेच्या अधिकार्‍यांनी प्रयागराज येथे झालेल्या महाकुंभमेळ्याच्या अभ्यास दौर्‍यात या आधुनिक उपकरणांचा वापर प्रत्यक्ष पाहिला होता. तेथील अनुभवाच्या आधारे नाशिकमध्ये होऊ घातलेल्या सिंहस्थात अशी यंत्रणा उभारण्याचे नियोजन आहे. सिंहस्थ काळात कोट्यवधी भाविकांच्या उपस्थितीत आपत्ती व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी ही उपकरणे महत्त्वाची ठरणार आहे. शहराचा विस्तार, उंच इमारती आणि दाट लोकवस्ती लक्षात घेता पारंपरिक साधनांसोबत अत्याधुनिक यंत्रसामग्रीची आवश्यकता निर्माण झाली होती. धूर आणि तीव्र उष्णतेमुळे अग्निशमन जवानांनाही घटनास्थळी जाण्यात अडचणी निर्माण होतात. ही बाब लक्षात घेऊन आधुनिक उपकरणे खरेदी करण्याचा निर्णय घेतला गेला.

‘Water Tower’ added to fire-fighting fleet

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *