बारावीनंतर काय?
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने यंदा बारावी परीक्षेचा निकाल अत्यंत लवकर जाहीर करुन कमाल केली आहे. फेब्रुवारी/मार्च महिन्यात परीक्षा झाल्यानंतर निकालाची प्रतिक्षा करता करता जून/जुलै महिना उजाडायचा. यंदा मंडळाने सर्व नऊ विभागांचा निकाल मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात म्हणजे पाच मे रोजी लावून टाकला. यंदा पालक आणि विद्यार्थ्यांना फार प्रतिक्षा करावी लागली नाही. विज्ञान, वाणिज्य, कला, व्होकेशनल (व्यावसायिक) अशा चार शाखांमध्ये बारावीची परीक्षा घेतली जाते. यामध्ये विज्ञान विषयाच्या विद्यार्थ्यांवर अभ्यासाचा अधिक ताण असतो. उच्च शिक्षणासाठी या शाखेतील विद्यार्थ्यांचा कल अभियांत्रिकी, वैद्यकीय, माहिती तंत्रज्ञान इत्यादी अशा शाखांकडे असतो. या अभ्यासक्रमांना प्रवेश मिळविण्यासाठी प्रवेश परीक्षा द्यावी लागते. या परीक्षा विज्ञान शाखा अभ्यासक्रमावर आधारित असल्या, तरी अभ्यासक्रमाबाहेरील भाग असतो. बारावी परीक्षेची तयारी करताना हे विद्यार्थी प्रवेश परीक्षेची तयारी करत असतात. त्यासाठी कनिष्ठ महाविद्यालयांत जाऊन अध्ययन करताना बरेचसे विद्यार्थी खासगी क्लासेसमध्ये जातात. येथे गुणवत्ता यादीला महत्त्व असते. बारावी परीक्षा झाल्यावर काही दिवसांतच प्रवेश परीक्षा घेतल्या जातात. बारावी परीक्षेस बसणारे विद्यार्थी प्रवेश परीक्षांना बसण्यास पात्र असतात. दोन्ही परीक्षा काही ठराविक अंतराने असल्याने विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. जेईई, नीट, यांसारख्या प्रवेश परीक्षांची तयारी करण्यासाठी विद्यार्थ्यांना वेळ मिळावा म्हणून मंडळाने यंदा परीक्षा दहा दिवस लवकर घेतल्या. त्यामुळे निकाल लवकर लावणे शक्य झाले. विद्यार्थ्यांनाही प्रवेश परीक्षांची तयारी करण्यासाठीही थोडाफार अवधी मिळाला. यंदा गतवर्षीच्या तुलनेत निकाल कमी लागला आहे. मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय घेण्यात आलेल्या परीक्षांचा निकाल ९१.८८ टक्के लागला. सर्व शाखांसाठी एकूण १४,२७,०८५ नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १४,१७,९६९ विद्यार्थी प्रविष्ट झाले आणि १३,०२,८७३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यंदाही मुलींनीच बाजी मारली. ६ लाख २५ हजार ९०१ मुली, तर ६ लाख ७६ हजार ९७२ मुले उत्तीर्ण झाली. मुलींचा ९४.५८ टक्के आणि मुलांचा ८९.५१ टक्के निकाल लागला. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक म्हणजे ९७.९९ टक्के लागला, तर लातूर विभागाचा सर्वात कमी ८९.४६ टक्के निकाल लागला. नाशिक विभागाचा निकाल ९१.३१ टक्के लागला असून नऊ विभागांत नाशिक आठव्या स्थानी आहे. परीक्षा म्हटली, तर कॉपी आलीच. कॉपी करण्याचा प्रयत्न विद्यार्थी करत असतात, हे परीक्षा घेणार्या यंत्रणांना माहिती असते. कॉपी करण्याच्या प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी भरारी पथके तैनात केली जातात, कॉपीमुक्त परीक्षा अभियान राबविले जाते, पोलिसांची मदत घेतली जाते. यंदा मंडळाने कॉपीमुक्त अभियान अत्यंत कडक पध्दतीने राबविल्याचे दिसून आले. त्यामुळे यंदाचा निकाल कमी लागला, असे सांगितले जात आहे. गतवर्षी ९३.३७ टक्के निकाल लागला होता. यंदा ९१.८८ टक्के निकाल लागला. गतवर्षीच्या तुलनेत १.४९ टक्के निकाल कमी लागला आहे. हा निकाल फारच कमी लागला, असेही म्हणता येत नाही. बारावीची परीक्षा आयुष्यातील एक वळणबिंदू असते म्हणून तिला महत्त्व आहे. निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांना वरिष्ठ महाविद्यालये आणि इतर काही व्यावसायिक शैक्षणिक संस्थामध्ये प्रवेश घेण्यासाठी धावपळ करावी लागते. ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया असल्याने गुणवत्तेच्या आधारावरच प्रवेश दिले जातात. परंतु एकही विद्यार्थी प्रवेशाविना राहणार नाही, याची जबाबदारी राज्य सरकारला घ्यावी लागते. गुणवत्तेच्या आधारावर तीन-चार फेऱ्यांमध्ये प्रवेश दिले जातात. अनेक विद्यार्थ्यांना आपल्या पसंतीच्या महाविद्यालयात प्रवेश मिळत नसल्याने ते नाराज होतात. परंतु, प्रश्न गुणवत्तेचा असतो म्हणून एक एक गुण महत्वाचा असतो. परीक्षेत पास झाल्याचा आनंद असला, तरी प्रश्न शेवटी टक्क्यांवर येत असतो. विज्ञान, वाणिज्य, कला या शाखांमध्ये प्रवेशासाठी गर्दी होत असली, तरी विज्ञान शाखेतील गुणवत्त विद्यार्थ्यांचा कल वैद्यकीय, औषधनिर्माण, अभियांत्रिकी, माहिती तंत्रज्ञान, संगणकशास्त्र, तंत्रनिकेतन, फॉरेन्सिक, कृषी, जैवतंत्रज्ञान इत्यादी शाखांकडे असतो. वाणिज्य विद्यार्थ्यांचा कल सहकार, सनदी लेखापाल, कंपनी सेक्रेटरी, कॉस्टिंग, भांडवली बाजार, व्यवस्थापन इत्यादी शाखांकडे असतो. कला शाखेतील विद्यार्थी मराठी, इंग्रजी, हिंदी, संस्कृत अशा भाषा तसेच समाजशास्त्र, अर्थशास्त्र, मानसशास्त्र, राज्यशास्त्र, भूगोल, इतिहास, तत्त्वज्ञान इत्यादी विषय उपलब्ध आहेत. याशिवाय सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांना कायदा, पत्रकारिता इत्यादी विषय उपलब्ध आहेत. शिक्षक, पालक यांचे मार्गदर्शन आणि स्वतःची इच्छा या आधारावर विद्यार्थी प्रवेश घेऊ इच्छितात. सर्व इच्छुकांना प्रवेश देण्याची जबाबदारी शासनाची असली, तरी गुणही महत्त्वाचे ठरतात. कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी अनेक कोर्सेस उपलब्ध आहेत. बिझिनेस अँड मॅनेजमेंट, बीबीए, पीडीडीएम किंवा मार्केटिंग/फायनान्स इत्यादी कोर्सेस उपलब्ध आहेत. माहिती तंत्रज्ञान कंपन्यांत काम करण्याची इच्छा असलेल्या विद्यार्थ्यांना हार्डवेअर आणि नेटवर्किंग, इंजिनिअरिंगला पर्यायी म्हणून हार्डवेअर आणि नेटवर्किंग पदविका अभ्यासक्रम आहेत. कृत्रिम बुध्दिमत्ता म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) हे नवीन क्षेत्र उपलब्ध झाले आहे. निमवैद्यकीय (पॅरामेडिकल) म्हणजे सर्जरी सहायक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, सोनोग्राफी मशीनशी निगडित, दंत सौंदर्यशास्त्राशी निगडित कोर्सेस आहेत. त्याशिवाय वैद्यकीय क्षेत्रातील उपकरणे आणि सहायक म्हणून अनेक कोर्सेस उपलब्ध आहेत. वैद्यकीय क्षेत्रात फार्मसी हे क्षेत्र खूपच महत्त्वपूर्ण मानले जाते. या क्षेत्रातही चांगले करिअर करता येऊ शकते. बारावीनंतर डी. फार्म आणि बी. फार्म हे अभ्यासक्रम पूर्ण करता येतात. आर्ट डायरेक्टर, चित्रकला शिक्षक, कार्टुनिस्ट, ग्राफिक डिझायनर, सेट डिझायनर, इंटेरियर डिझायनर, अॅनिमेशन, फिल्म मेकिंगसारखे कोर्सेस उपलब्ध आहेत. बारावीनंतर विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रात प्रवेश करण्याच्या संधी आहेत. विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनी विचारपूर्वक निर्णय घेऊन प्रवेश घेणे महत्त्वाचे आहे. गुणवत्तेला महत्त्व असल्याने मनाप्रमाणे प्रवेश मिळेलच याची खात्री नाही. त्यामुळे काही पर्याय हाताशी ठेवणेही आवश्यक आहे.
शिलापूर : नाशिक रोड रेल्वे पोलिसांच्या कर्तव्यदक्षतेने चोरी झालेली मोटारसायकल जुन्या जनरल तिकीट घराजवळ मिळून…
वाहनधारकांची गैरसोय होण्याची शक्यता, तांत्रिक दुरुस्तीचे प्रयत्न सुरू मनमाड : प्रतिनिधी मनमाडच्या पानेवाडीत असलेल्या हिंदुस्थान…
नांदगाव पोलिसांत गुन्हा दाखल, औषधसाठा जप्त पळाशी : वार्ताहर अॅलोपॅथीची वैद्यकीय पदवी अथवा परवाना जनतेच्या…
सिन्नर : प्रतिनिधी नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर नागपूर येथून देवनार-मुंबईकडे 21 म्हशी घेऊन जाणार्या आयशरने डाव्या…
वीजपुरवठा खंडित, घरांचे पत्रे उडाले, पिकांचे नुकसान; भरपाईची मागणी दिंडोरी : प्रतिनिधी दिंडोरी तालुक्यासह सुरगाणा,…
येवला : तालुक्यातील एरंडगाव शिवारातील विहिरीत पडून एका युवकाचा दुर्दैवी अंत झाला. सतीश रामकृष्ण जाधव…