अवैध अन् अनधिकृत बांधकामांनी निर्विघ्न कुंभमेळा होणे अवघड
त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी
सिंहस्थ कुंभमेळा भरवण्यासाठी शेतजमिनी अधिग्रहीत करण्यासाठी शासन आग्रही आहे, तर सिंहस्थ आरक्षणाचे काय झाले, असे शेतकरी विचारत आहेत. डीपी तयार करताना तो बिल्डरधार्जिणा झाला म्हणून आज शेतजमिनी जाण्याची वेळ आली आहे. याबाबत बाधित शेतकर्यांची खात्री झाली आहे.
त्र्यंबकेश्वर येथे दर बारा वर्षांनी सिंहस्थ कुंभमेळा भरतो. त्यासाठी जागेची उपलब्धता हवी. शहर विकास योजना तयार करताना टाउन प्लॅनिंग आणि स्थानिक स्वराज्य संस्था असलेल्या नगरपरिषदेने विचार करण्याची आवश्यकता होती. किंबहुना 2013 मध्ये मुदत संपलेला शहर विकास आराखडा तयार करण्यासाठी हद्दवाढ करून 2017 साल उजाडावे लागले. त्यातही तत्कालीन मुख्याधिकार्यांनी तत्कालीन नगराध्यक्षांच्या विरोधात जिल्हाधिकार्यांकडे तक्रार केली.
त्यानंतर नगराध्यक्षांना राजीनामा देणे भाग पडले. तेव्हाचे विभागीय आयुक्त महेश झगडे यांनी त्र्यंबकेश्वरच्या डीपीवर कडक शब्दांत ताशेरे ओढले व तातडीने हा आराखडा रद्द करण्याचे आदेश दिले. तथापि, तसे घडले नाही.
डीपीमध्ये तीव्र उताराचे डोंगर रहिवासी क्षेत्र म्हणून पिवळ्या पट्ट्यात घेतले, तर सखल जमिनींना हिरव्या पट्ट्यात आणि आरक्षणात टाकले. शासकीय भूखंड बाजूला ठेवून खासगी जमिनी आरक्षणात टाकण्यात आल्या. भौगोलिक रचना पाहता शहराचा विस्तार पूर्व आणि उत्तर दिशेने होईल, अशी आहे. मात्र, दक्षिण बाजूला ब्रह्मगिरीलगत असलेली शेकडो एकर जमीन व डोंगर पिवळ्या पट्ट्यात घेतले. संबंधित यंत्रणांनी दिलेली मूकसंमती संशयास्पद आहे. शहराच्या बाहेर वाढीव हद्दीत अवास्तव रस्त्यांचे जाळे निर्माण करण्याचा नेमका हेतू काय? याबाबत मौन बाळगले.
सन 2017 मध्ये प्रस्तावित आराखड्यावर हरकती घेतल्या त्यांना केराची टोपली दाखवली.त्यानंतर 2019 मध्ये आलेली वाढीव योजना कधी मंजूर झाली याबाबत आजतागायत गुप्तता राखली गेली.
2019 मध्ये डीपीमध्ये असलेली तरतूद
सिंहस्थ झोन 50.59 हेक्टर, शाही मार्ग पुनर्वसन 1.45 हेक्टर अशी एकूण 51.99 हेक्टर म्हणजेच 0.5199 चौरस किमी इतके आहे. शहराची हद्द 11 चौरस किलोमीटर असताना त्यात सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी केवळ अर्धा चौरस किमी क्षेत्र आरक्षित ठेवण्यात आले. यावरून सिंहस्थ कुंभमेळा भरविण्यासाठी शासनाचा नगरविकास विभाग आणि नगरपरिषद किती गंभीर होते, हे दिसते. प्रस्तावित आणि वाढीव योजनेत असलेल्या आरक्षणांबाबत ठराव घेण्याची व आरक्षण बदलण्याची घाई केली. यामधून सिंहस्थ आरक्षण वगळण्यासाठी ठराव झाले. सिंहस्थ कुंभमेळ्याचे शहर असलेल्या आणि पूर्वीच्या 1.89 चौरस किमी क्षेत्रात वाढ होऊन 11 चौरस किमी हद्द प्राप्त झालेल्या त्र्यंबकनगरीच्या डीपीत सिंहस्थ कुंभमेळ्याला नगण्य स्थान मिळाले आहे.
What happened to Simhastha reservation; Farmers’ question