न्यायडोंगरीतील रेल्वेस्थानकावर एक्स्प्रेसना थांबा कधी मिळणार?

न्यायडोंगरी : वार्ताहर
न्यायडोंगरी रेल्वे स्थानकावर नागपूर एक्स्प्रेस, महाराष्ट्र एक्स्प्रेस गाडीला अधिकृत थांबा देण्याची मागणी गेल्या 25 वर्षांपासून तसेच नव्याने सुरू झालेल्या धुळे-दादर रेल्वेगाडीला अधिकृत थांबा मिळावा, याबाबत मागणी प्रलंबित आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
सुमारे 20 हजार लोकसंख्या असलेले न्यायडोंगरी गाव आणि परिसरातील 24 गावांसाठी हे रेल्वेस्थानक महत्त्वाचे संपर्क केंद्र मानले जाते. शिक्षण, नोकरी, व्यवसाय, व्यापार तसेच वैद्यकीय सेवांसाठी हजारो नागरिक रेल्वे प्रवासावर अवलंबून आहेत. मात्र, इतक्या मोठ्या प्रवासी क्षमतेच्या स्टेशनवर सध्या केवळ इगतपुरी- भुसावळ – इगतपुरी व देवळाली – भुसावळ – देवळाली अशा चार मेमो गाड्यांनाच थांबा असल्यामुळे प्रवाशांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. मुंबई, पुणे, नाशिक व जळगाव येथे जाण्यासाठी न्यायडोंगरी येथील नागरिकांना पहाटे सुमारे 25 किलोमीटर अंतरावरील नांदगाव किंवा चाळीसगाव रेल्वे स्थानकांवर जावे लागते. ग्रामीण भागातील मर्यादित वाहतूक व्यवस्था, वाढता खर्च आणि वेळेचा अपव्यय यामुळे प्रवाशांचा त्रास अधिक वाढत असल्याचे नागरिक सांगतात. माजी खासदार स्व. हरिश्चंद्र चव्हाण यांना वेळोवेळी असंख्य निवेदने देण्यात आली होती.
त्यानंतर निवडणूक प्रचारादरम्यान डॉ. भारती पवार यांनी न्यायडोंगरी येथील श्रीराम व शिवमंदिरात भेट देताना ‘तुमच्या येथील स्थानिक उमेदवाराने माघार घ्यावी; मी निवडून आल्यानंतर पहिल्याच अधिवेशनात हा प्रश्न मार्गी लावेन,’ असा शब्द दिल्याचे नागरिक सांगतात.
विद्यमान खासदार भास्कर भगरे यांचीही नागरिकांनी प्रत्यक्ष भेट घेऊन भुसावळ रेल्वे मंडळ येथे निवेदन दिले आहे. तरीदेखील या मागणीबाबत कोणतीही सकारात्मक हालचाल दिसून येत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे. रेल्वे प्रशासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घेऊन नागपूर एक्स्प्रेस, महाराष्ट्र एक्स्प्रेस तसेच धुळे-दादर रेल्वेगाडीला न्यायडोंगरी रेल्वे स्टेशनवर अधिकृत थांबा मंजूर करून या दीर्घकालीन प्रश्नाला न्याय द्यावा, अशी मागणी होत आहे.

When will the express train stop at Nyaydongari railway station?

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *