संपादकीय

एवढी अमानुषता व निर्दयीपणा काय कामाचा?

हल्ली बघ्याची भूमिका घेणार्‍या लोकांचा सुळसुळाट प्रचंड वाढला आहे. संकटात सापडलेल्या लोकांना माणुसकीच्या नात्याने हवी ती मदत करणे, हे प्रत्येकाचे काम असते. पण आजकाल संकटात सापडलेल्या व्यक्तीला हवी ती मदत करण्याऐवजी त्यांचा त्रास पाहणार्‍या बघ्या लोकांची संख्या खूप वाढली आहे. एखाद्या घरात सख्ख्या भावंडांमध्ये प्रचंड वादविवाद सुरू झाला आणि काठ्या-कुर्‍हाडीने भांडण सुरू असताना ते भांडण मिटविण्याऐवजी बहुतांश लोक नेत्रसुख घेत बघ्याची भूमिका घेतात. माणुसकीच्या नात्याने भांडणतंटा मिटवणे हे प्रत्येक माणसाचे परम कर्तव्य असते. अशावेळी कोणत्याच माणसांत माणुसकी जागी होताना दिसत नाही. कोणताच माणूस पुढे येऊन भांडणतंटा मिटवताना दिसत नाही. म्हणजे आजच्या माणसात माणुसकी जराही शिल्लक राहिली नाही, असेच म्हणावे लागेल. माणसाने माणुसकीचा त्याग करून अमानुषतेचा स्वीकार केला आहे. कॉलेजला जाणार्‍या, कामधंद्यासाठी बाहेर पडणार्‍या, बाहेर फेरफटका मारायला जाणार्‍या आणि नोकरीनिमित्त बाहेर निघणार्‍या महिलांवर व मुलींवर अत्याचार होत असताना त्या महिलेच्या वा मुलीच्या मदतीला कोणताच माणूस धावून येताना दिसत नाही. माणूस मदत न करता फोटो व व्हिडीओ काढण्यात मग्न असतो. खरोखरच आताच्या माणसांमध्ये माणुसकी शिल्लक राहिलेली नाही.
माणुसकीचा गुणधर्म शिल्लक राहिलेला नाही. म्हणून माणसांमध्ये जराही सहानुभूती जागृत होत नाही. माणसांत माणुसकी जागृत न होण्याचे कारण म्हणजे आजकालच्या माणसांची नीतिमत्ता रानटी पशुप्रमाणे झाली आहे. रस्त्याने जाणार्‍या एखाद्या गाडीचा भीषण अपघात झाला आणि त्या गाडीमधील प्रवासी जखमी झाले तर त्यांना तत्काळ दवाखान्यात घेऊन जाणे हे माणुसकीच्या नात्याने माणसाचे कर्तव्य असते; परंतु त्यांना दवाखान्यात दाखल करण्यासाठी कोणत्याच माणसात माणुसकी जागी होताना दिसत नाही.
लोक जखमी प्रवाशांना अगोदर दवाखान्यात दाखल करण्याऐवजी बघ्याची भूमिका घेऊन निघून जातात. माणुसकीच्या नात्याने त्या जखमी प्रवाशांना सरकारी दवाखान्यात दाखल करणे, हे माणुसकीचे लक्षण असते. हे लक्षण सध्या कोणातच दिसत नाही. एखाद्या मुलीला भरचौकात कोणी छेडछाड करत असेल, तिच्यासोबत अश्लील चाळे करत असेल, नाहक त्या मुलीला त्रास देत असेल किंवा तिला शिवीगाळ करत असेल तर अशावेळी त्या मुलीच्या मदतीला कोणताच माणूस धावून जाताना दिसत नाही. सगळी माणसे बघ्याची भूमिका घेऊन निघून जातात. एसटी बसने प्रवास करताना आपण बघत असतो की, जागा धरण्यावरून एखादा मुलगा एखाद्या मुलीला नाहक त्रास देत असेल, तिला शिवीगाळ करत असेल, जाणीवपूर्वक तिला बदनाम करत असेल तर अशावेळी त्या मुलीच्या बाजूने कोणताच माणूस मदत करायला धावून जात नाही. बसमधील सर्व प्रवासी बघ्याची भूमिका घेतात. समाजात व गावात कोणत्या ना कोणत्या कारणावरून भांडणतंटे सुरू झाले की, आजकालच्या लोकांना फार खुशी वाटत असते. ते नेत्रसुख घेऊन आनंदाने भांडण पाहत राहतात; परंतु भांडण मिटवण्याची भूमिका कोणताच माणूस घेत नाही. उलट आगीत तेल ओतण्याचे काम करतात. त्यांना भांडण आणखीन मोठे व्हावे वाटते. एवढा अमानुषपणा व निर्दयीपणा काय कामाचा? एकेकाळी पृथ्वीतलावर माणूस माणूस म्हणून ओळखला जात होता. माणसांमध्ये माणुसकी ठासून भरलेली होती. माणसात माणुसकीचे गुणधर्म ठळकपणे पाहायला मिळायचे. माणसे माणसासारखे वर्तन करून माणुसकीची शोभा वाढवायचे. सार्वजनिक ठिकाणी, चौकात कोणाचा वादविवाद लागला तर सगळी माणसे एकत्र येऊन तो वाद मिटवायचे. एखाद्या महिलेकडे वा मुलीकडे कोणी वाईट नजरेने बघत असेल, महिलांना वा मुलींना कोणी नाहक त्रास देत असेल तर तेव्हाची माणसे जातपात न बघता, त्या मुलीच्या बाजूने खंबीरपणे उभे राहून त्रास देणार्‍या नराधमांना चांगलेच फटकारायचे. त्याकाळी महिलांचा मानसन्मान केला जायचा. तेव्हाची माणसे चारित्र्यवान व शीलवान होती. तेव्हाच्या माणसांत दया, करुणा व सहानुभूती असल्यामुळे कुठे अन्याय, अत्याचार होत असेल, तर माणसाचे मन हळवे होऊन माणूस चटकन इतरांच्या मदतीला धावून जायचा; परंतु आजकालच्या माणसांमध्ये योग्य वेळी योग्य संस्काराची पेरणी न झाल्यामुळे माणूस माणसासारखा न वागता सैतानासारखा वागत आहे. संस्काराच्या अभावामुळे माणसात माणुसकीचे गुणधर्म पेरणारे आजी-आजोबा आजकाल राहिले नसल्यामुळे आताच्या मुलांवर संस्काराची योग्य रुजवण होत नाही. म्हणून आजकाल माणसांना माणूस बनवणारे आजी-आजोबा घरोघरी नसल्यामुळे मुलांवर चांगल्या संस्काराची पेरणी होत नाही. परिणामी विद्यार्थी कसेही मोकाट जनावराप्रमाणे वर्तन करून माणुसकीला काळिमा फासतात. म्हणूनच आजकालची माणसे माणुसकीच्या नात्याने संकटात सापडलेल्या व अडचणीत गवसलेल्या माणसांना मदत करायला पुढे येत नाहीत. त्यांना मदत न करता मनसोक्त बघ्याची भूमिका घ्यायला आवडत असते.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

दादांची अकाली एक्झिट ! जिल्हा शोकसागरात

सर्वपक्षीयांकडून जड अंतःकरणाने श्रद्धांजली; कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला नाशिक ः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख…

7 hours ago

स्मार्ट पार्किंगचे घोडे अडलेलेच!

टेंडर सेलकडून कार्यवाही होईना... नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिका शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी…

7 hours ago

बांगलादेश क्रिकेट बोर्डाचा आत्मघातकी निर्णय

बांगलादेशने दुराग्रही भूमिका घेऊन भारतात होणार्‍या टी-20 विश्वचषक स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशचा हा…

8 hours ago

अजितदादांची साथ नेहमी स्मरणात राहील!

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन वेदनादायी आहे. राज्याचे सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून व दीर्घकाळ…

8 hours ago

पवार परिवारावर आघात

महाराष्ट्रात ज्यांना जाणता राजा म्हटले जाते, त्या शरद पवारांच्या सावलीत वाढलेले एक बोलके, दिलखुलास राजकीय…

8 hours ago

मीठसागरे शिवारात बिबट्या मादी जेरबंद

सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील मीठसागरे शिवारात बुधवारी (दि. 28) सकाळी चार वर्षे वयाची बिबट्याची मादी…

8 hours ago