पुरुषांच्या वेदनांनाही न्याय मिळणार कधी?

जागतिक पुरुष दिन विशेष

नाशिक : प्रतिनिधी
कुटुंबाचा आधारस्तंभ, जबाबदारीचे ओझे वाहणारा आणि प्रत्येक संकटात खंबीरपणे उभा राहणारा पुरुष… मात्र या पुरुषालाही वेदना होतात, त्यालाही मानसिक त्रास होतो आणि कधी त्याचा जीवही घेतला जातो. समाजात महिलांवरील अत्याचारांविरोधात मोठ्या प्रमाणावर आवाज उठवला जातो. ही जागरूकता निश्चितच आवश्यक आहे. मात्र, दुसरीकडे पुरुषांवरील अत्याचार, मानसिक छळ, आर्थिक शोषण आणि महिलांकडून पुरुषांच्या हत्येच्या घटना समोर येत असताना या प्रश्नांची चर्चाही होणे गरजेचे आहे.
मेघालयातील राजा रघुवंशी हत्या प्रकरणाने संपूर्ण देशाचे लक्ष वेधले होते. अशा घटनांमुळे वैवाहिक नात्यांमधील विश्वास, सुरक्षितता आणि बदलत्या कौटुंबिक संबंधांबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.पुरुषांवरील अन्याय केवळ हत्यांपुरता मर्यादित नाही. मानसिक छळ, सततचे टोमणे, धमक्या, आर्थिक मागण्या, कौटुंबिक वाद आणि मुलांपासून दूर राहण्याची वेळ येणे अशा समस्यांनाही अनेक पुरुष सामोरे जातात. पुरुष दिन हा केवळ पुरुषांच्या योगदानाचा गौरव करण्याचा दिवस नाही, तर त्यांच्या अडचणी समजून घेण्याची संधी आहे. स्त्री-पुरुष समानतेचा अर्थ कोणत्याही एका घटकाच्या वेदनांकडे दुर्लक्ष करणे नव्हे. अन्याय करणारा कोणीही असो, पीडिताला न्याय मिळालाच पाहिजे. पुरुषांच्या भावनांनाही अभिव्यक्तीची आणि त्यांच्या तक्रारींनाही न्यायाची समान संधी मिळणे, हीच काळाची गरज आहे.

पुरुषांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन आजही पूर्वग्रहदूषित आहे. पुरुष कायम स्ट्राँग असतात, त्यांना दुःख होत नाही किंवा त्यांनी रडू नये, अशी मानसिकता लहानपणापासूनच बिंबवली जाते. कौटुंबिक कलह, अत्याचार किंवा मानसिक तणावाच्या घटनांमध्ये स्त्रियांच्या तुलनेत पुरुषांच्या समस्यांकडे तितक्या गांभीर्याने पाहिले जात नाही. लोक हसतील किंवा आपण कमजोर ठरू, या भीतीने पुरुष मदत घेण्यास कचरतात. मात्र, ताणतणाव दाबून ठेवल्यास त्यांच्यात चिडचिड वाढणे किंवा व्यसनाधीनतेकडे वळणे असे गंभीर परिणाम दिसून येतात. त्यामुळे पुरुषांनी कोणताही संकोच न बाळगता तज्ज्ञांची मदत घेणे गरजेचे आहे आणि समाजानेही आपला हा दृष्टिकोन बदलला पाहिजे.
– डॉ. अनुप भारती, मानसोपचारतज्ज्ञ

कौटुंबिक वादांमध्ये काही महिलांकडून कौटुंबिक हिंसाचार, हुंडा प्रतिबंधक आणि पोटगीविषयक कायद्यांचा गैरवापर केला जात असल्याचे प्रकार समोर येतात. त्यामुळे अनेक पुरुषांचे वैयक्तिक आणि वैवाहिक आयुष्य उद्ध्वस्त होत आहे. मात्र, पुरुषांनी अन्याय सहन न करता कायद्याचा अभ्यासपूर्ण वापर करून ठामपणे लढा दिला पाहिजे. खोटे आरोप आणि पुराव्यांविरोधात दाद मागण्यासाठी कायद्यात तरतुदी आहेत. तसेच पुरुष हक्कांसाठी कार्यरत संस्थांची मदतही घेता येऊ शकते. – अ‍ॅड. शुभांगी सोनवणे

पुरुषही मानसिक तणावाचे बळी
कौटुंबिक जबाबदार्‍या, आर्थिक ओढाताण, नात्यांमधील संघर्ष आणि सामाजिक अपेक्षा यांचा पुरुषांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. मात्र, भावना व्यक्त केल्यास समाज काय म्हणेल, या भीतीने अनेक पुरुष मनातील वेदना दडपून ठेवतात. मानसिक आरोग्याबाबत पुरुषांनीही मोकळेपणाने बोलण्याची गरज आहे.

 

 

 

 

 

When will men’s pain also receive justice?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *