– नितीन डोंगरे
माणूस जन्माला येतो, आयुष्यभर धडपडतो आणि मृत्यूनंतर स्वर्ग मिळावा, अशी मनोमन इच्छा बाळगतो. कुणी उपवास करतो, कुणी दानधर्म करतो, कुणी तीर्थयात्रा करतो, कुणी देवापुढे नवस बोलतो. जणू काही आयुष्यभर पुण्याची शिदोरी जमा करायची आणि मृत्यूनंतर त्याच्या मोबदल्यात स्वर्गाची जागा मिळवायची! पण कधी शांतपणे स्वतःलाच एक प्रश्न विचारला आहे का? काय माहीत… आपण ज्या स्वर्गाचा मृत्यूनंतर शोध घेत आहोत, तो स्वर्ग कदाचित आज, याच क्षणी आपल्या आजूबाजूला असेल!
सकाळी डोळे उघडले की, पहिला चमत्कार आपल्या नकळत घडलेला असतो, की आपण जिवंत असतो. श्वास सुरू असतो. हृदय धडधडत असतं. हात-पाय आपलं म्हणणं ऐकत असतात. यानंतर एका छोट्याशा स्विचने अंधार दूर होतो. दुसर्या स्विचने पंखा सुरू होतो. बटण दाबलं की थंड हवा मिळते. नळ उघडला की पाणी घरात येतं. स्वयंपाकघरात काही मिनिटांत चहा, नाश्ता किंवा जेवण तयार होतं.
मोबाइल हातात घेतला की जगाशी संवाद साधता येतो. हजारो किलोमीटर दूर असलेली माणसं क्षणात आपल्या समोर येतात. ज्ञानाचा अक्षरशः महासागर आपल्या हातात सामावलेला आहे. ही सगळी अद्भुतता आपण मात्र इतकी अंगवळणी पाडून घेतली आहे की, आता त्यात आपल्याला चमत्कार दिसतच नाही. कल्पना करा, काही शतकांपूर्वीचा एखादा राजा आजच्या सामान्य माणसाच्या घरात आला तर? त्याला बटण दाबल्यावर उजेड मिळतो हे पाहून आश्चर्य वाटेल. नळातून अखंड पाणी येतं हे पाहून तो थक्क होईल. घरात बसून दूरदेशी असलेल्या व्यक्तीशी बोलता येतं हे पाहून कदाचित त्याला ही जादूच वाटेल. क्षणात अन्न मागवून घरपोच मिळतं, हे त्याला एखाद्या राजेशाही सामर्थ्यापेक्षाही मोठं वाटेल.तो कदाचित मनात म्हणेलसुद्धा की, मी राजसिंहासनावर बसलो, माझ्याकडे संपत्ती होती, सैन्य होतं, सत्ता होती, पण या माणसाकडे असलेल्या कितीतरी सुविधा माझ्याकडे नव्हत्या.
आजचा सामान्य माणूस तंत्रज्ञान, वैद्यकीय सुविधा, वाहतूक, संपर्क आणि जीवनातील अनेक सोयींच्या बाबतीत पूर्वीच्या राजांपेक्षाही अधिक संपन्न आहे. पण तरीही समाधान कुठे आहे? कारण माणसाची एक विचित्र मानसिकता आहे, जे मिळालं आहे ते हळूहळू सामान्य होतं आणि जे मिळालेलं नाही त्याची किंमत वाढत जाते. एसी आहे म्हणून आनंद होत नाही, तो बंद पडला की त्याची किंमत कळते. घर आहे म्हणून समाधान नसतं. शेजार्याचं घर मोठं आहे म्हणून मन अस्वस्थ होतं. गाडी आहे म्हणून आनंद नाही, दुसर्याची गाडी महागडी आहे म्हणून स्वतःची गाडी छोटी वाटते. मोबाइल आहे म्हणून समाधान नाही…. त्यापेक्षा नवीन मॉडेल कोणाकडे आहे याची चिंता असते. आपण आपल्या आयुष्यातील सुखांकडे पाहण्याऐवजी दुसर्याच्या आयुष्यातील सुखांकडे पाहत राहतो आणि स्वतःला
दुःखी घोषित करतो. खरा विरोधाभास तर असा आहे की, एकाच शहरात, कधी एकाच रस्त्यावर आणि कधी एकाच इमारतीत दोन वेगवेगळी जगं अस्तित्वात असतात. शहरातल्या फ्लॅट संस्कृतीत राहणार्या लोकांना, शेजारी कोण आहे? याची माहिती नसते. एका घरात मुलाला नवीन मोबाइल जुना झाला म्हणून नाराजी असते, तर दुसर्या घरात त्याच वयाच्या मुलाला ऑनलाइन शिक्षणासाठी मोबाइल मिळावा, हीच मोठी इच्छा असते. कुणाला गरम पाणी लगेच मिळालं नाही म्हणून चिडचिड होते, तर कुणासाठी दिवसातून एकदा स्वच्छ पाणी मिळणंही भाग्य असतं. कुणी वजन कमी करण्यासाठी आहाराचे नियोजन करत असतो, तर कुणी पुढचं जेवण कुठून मिळेल याचा विचार करत असतो. कुणाला घरातील एका खोलीत एसी नसल्याची खंत असते, तर कुणाला डोक्यावर
स्वतःचं छप्पर असावं एवढीच अपेक्षा असते. म्हणून स्वर्ग आणि नरक हे कदाचित मृत्यूनंतरच्या जगातील शब्द नसतीलसुद्धा… ते आपल्या मनःस्थितीचेही दोन अनुभव असू शकतात.
आपल्याकडे किती आहे? यापेक्षा, आपल्याकडे जे आहे त्याकडे आपण कसं पाहतो, यावर आपल्या आनंदाचं मोठं गणित अवलंबून असतं. काही माणसं अत्यंत मर्यादित साधनांमध्येही आनंदी असतात. चेहर्यावर हसू ठेवतात. छोट्या गोष्टींमध्ये समाधान शोधतात. तर काहींकडे संपत्ती, सुविधा, प्रतिष्ठा, सुरक्षितता अगदी सगळं भरभरून असूनसुद्धा त्यांच्या आयुष्यात तक्रारींची कमतरता नसते.कारण समस्या नेहमी परिस्थितीत नसते, अनेकदा समस्या आपल्या अपेक्षांच्या वाढत्या उंचीत असते.
माणूस दिवस संपताना विचारतो, आज मला काय मिळालं नाही? पण त्याने स्वतःला कधी विचारावं…आज माझ्याकडे काय होतं? आज मी निरोगीपणे उठलो का? मला अन्न मिळालं का? पिण्यासाठी पाणी होतं का? माझ्या डोक्यावर छप्पर होतं का? माझ्याशी बोलणारं कुणीतरी होतं का? माझ्यावर प्रेम करणारी माणसं माझ्या आयुष्यात आहेत का? या प्रश्नांची उत्तरं हो असतील, तर कदाचित आपल्या आयुष्यातील संपत्तीची आपल्याला अजून पूर्ण जाणीव झालेली नाही. कृतज्ञता म्हणजे आपल्याकडे सर्व काही आहे असा भ्रम मानू नये, जे आहे त्याची किंमत ओळखण्याची ती एक दृष्टी आहे. तक्रारी कमी झाल्या की सुख वाढतं असं नाहीय मुळी…तर कृतज्ञता वाढली की त्याच सुखाची जाणीव वाढते. म्हणूनच… कदाचित स्वर्ग शोधण्यासाठी मृत्यूनंतरच्या जगाची वाट पाहण्याची गरज नाही. सकाळच्या सूर्यकिरणांत, आई-वडिलांच्या आशीर्वादात, मुलांच्या हसण्यात, मित्राच्या एका फोनमध्ये, गरम चहाच्या कपात, पोटभर जेवणात, स्वतःच्या घराच्या सुरक्षिततेत, निरोगी शरीरात आणि आपल्या माणसांच्या सहवासातही स्वर्गाचे अनेक छोटे-छोटे तुकडे विखुरलेले असतात. फक्त ते पाहण्याची दृष्टी असावी लागते.देवाने कदाचित आपल्याला स्वर्ग शोधायला सांगितलंच नसेल, त्याने आपल्याला स्वर्गासारखं आयुष्य दिलं असेल. आपण मात्र त्याची तुलना करून त्यातही कमतरता शोधत बसलो आहोत.
Where should one go to find heaven?