डॉ. संजय धुर्जड.*
सुदर्शन हॉस्पिटल, नाशिक.
982245732
महाराष्ट्र हा मराठ्यांचा गड आहे. मराठे म्हणण्यापेक्षा मी याला हिंदूंचा गड म्हणेन, कारण याच महाराष्ट्राच्या भूमीत छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करून एका अर्थाने हिंदू धर्माची पुनर्स्थापना (रक्षण म्हणा हवं तर) केली होती, तसेच छत्रपती संभाजी महाराजांनी हिंदू धर्मासाठी आपल्या प्राणांची आहुती दिल्याने ते धर्मवीर झाले. असा या मातीचा इतिहास आहे.
तोच वारसा पुढील मराठेशाही आणि पेशवाईने सुरू ठेवून हिंदवी स्वराज्याच्या सीमा दिल्लीपल्याड अटकेपार विस्तारित केल्या. संपूर्ण भारत देशात मराठा साम्राज्य स्थापित केले आणि हिंदू धर्म, हिंदू देव देऊळे, हिंदू संस्कृती पुनर्प्रस्थापित केली. असा इतिहास आपल्या महाराष्ट्र देशाला असल्याने साहजिकच आपली छाती अभिमानाने फुगणारच, नाही का ? परंतु, सध्या या राज्यात जे काही सुरू आहे, ते लाजिरवाणे असण्यापेक्षा भीतीदायक आणि धोकादायक अधिक आहे, असे मला वाटते.
गेल्या काही महिन्यांपासून आपल्या महाराष्ट्रात काही विशिष्ट घटना घडतांना आपण बघतो आहे. महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये धार्मिक स्थळ, किव्हा धार्मिक सणानिमित्ताने आयोजित उत्सवांमध्ये औरंगजेब, टिपू सुलतान सारख्या जुलमी राज्यकर्त्यांचा उदो उदो होतांना दिसला. अशा आशयाच्या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल करून समाजात धार्मिक तेढ निर्माण केली जाते आहे. कोल्हापूर, अमरावती, अहमदनगर नंतर आता छ. संभाजीनगर मध्ये एका इसमाने सोशल मीडियावर म्हंटले की, १३ जून १६५९ रोजी औरंगजेबाचा राज्याभिषेक झाला होता, म्हणून या १३ जूनला औरंगजेबाच्या राज्याभिषेकाचा वर्धापन दिन धुमधडाक्यात साजरा करावा. ही पोस्ट व्हायरल झाल्याने तणाव वाढला, परंतु पोलिसांच्या हस्तक्षेपाने परिस्थिती नियंत्रणात आली.
अमरावती जिल्ह्यातील वलगावमध्ये एकाने व्हाट्सअप्पवर आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्यानेही अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. नगर जिल्ह्यातील मिरजगांवात एका दर्ग्याच्या संदल उरूस मधील मिरवणुकीत औरंगजेबाचा फोटो झळकवण्यात आला आल्याची पोस्ट सोशल मीडियावर दिसल्याने हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्याने तिथेही वातावरण तापले होते. कोल्हापुरात तर यावरून दंगल पेटली होती. हे आत्ताच का होत आहे, आणि कोण करत आहे आणि का करत आहे, या प्रश्नांची उत्तरं शोधायला हवी. कारण हे असंच सुरू राहिलं तर महाराष्ट्र दंगल खोरांचे राज्य आहे असं संदेश देशात आणि जगात पसरेल.
मी कुठल्या विशिष्ट जाती, धर्म, संप्रदाय, सामाजिक संघटना किव्हा राजकीय पक्षाचा समर्थक नाही. मी माझे मत, एक अलिप्त आणि तटस्थ भूमिकेतून मांडतो आहे. त्रयस्थ दृष्टिकोनातून जे मला दिसते आहे, ते मी इथे मांडण्याचा प्रयत्न करतो आहे. गेल्या एक दशकांपासून देशाचे राजकारण विकासावर आधारित झाले आहे. त्यापूर्वी एक जुन्या राजकीय पक्षाच्या पारंपारिक आणि पिढ्यां पिढ्याच्या समर्थकांच्या जोरावर सत्ता उपभोगत होते. आता त्यांनाही आपले राजकारण बदलून विकासाच्या मुद्द्यांवर निवडणूक लढवावी लागत आहे.
यामुळे, देशाला आणि देशातील जनतेला फायदाच होणार आहे. जागतिक मंदी चालू असतांना भारताची आर्थिक स्थिती मजबूत आहे, असे प्रथमदर्शनी तरी वाटते. परंतु, देशातील मागील काही घटनांकडे दृष्टिक्षेप टाकला तर असं जाणवते की, निवडणुका आल्या की एक मोठा मुद्दा समोर चर्चेत येतो. टीव्ही, पेपरमधील बातम्यांमध्ये झळकते, सोशल मीडियावर व्हायरल होतो, त्यावर खल होते, वाद प्रतिवाद होतो. अशा पार्श्वभूमीवर मतदान होते. मग तो मुद्दा पुलवामा दुर्घटना असो, की काश्मीर फाईल्स चा असो , की दि केरला स्टोरीचा असो. हा योगायोग जरी मानला, तरी तो योगायोग फक्त तुमच्या आणि माझ्यासारख्या भोळ्या भाबड्या जनतेसाठीच मर्यादित असतो. ज्यांना कळतो, त्यांच्यासाठी तो अजेंडा असतो.
महाराष्ट्रातही निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. महानगरपालिका केव्हाही जाहीर होणार आहेत. त्यानंतर विधानसभा आणि लोकसभांच्या निवडणूका पुढील काही काळात होणार आहे. प्रत्येक राजकीय पक्ष आपापल्या परीने तयारीला लागले आहेत. कुणी पुनर्बांधणीला लागले आहे, तर कुणी नेतृत्व बदल करतो आहे, तर कुणाकडे करण्यासारखे काहीच नाही, तर काहींना शेजारील निवडणुकीतून नवसंजीवनी मिळाल्याचे जाणवते. वर नमूद केलेल्या ज्या घटना राज्यात घडत आहे, त्या येणाऱ्या निवडणुकीशी संबंधित तर नाही ना, अशी शंका मनाला सहजच शिवते.
समाजात धार्मिक, जातीय तेढ निर्माण करून मतांचे ध्रुवीकरण करण्याचा उद्देश तर नाहीए ना, असा प्रश्न तुम्हालाही पडला आहे का? नसेल तर विचार करा, की अशा घटना यापूर्वी महाराष्ट्रात कधी घडल्या होत्या का? औरंगजेब आणि टिपू सुल्तानाचा उदो उदो या महाराष्ट्रात करण्याची हिंमत कुणी करू शकतो का?
मराठा आणि हिंदूबहुल राज्यात जुलमी शासकांच्या समर्थकांवर कडक कारवाई का नाही होत? इतकं सगळं होऊन ही प्रमुख मंत्री गण यावर गप्प का? स्वतःला कट्टर हिंदुत्ववादी समजणारे पक्ष सत्तेत असतांनाही अल्पसंख्यांक म्हणवणारा समाज असे धाडस कसे करू शकतो? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे शोधली तर खरे काय ते शहाण्याला लगेचच कळेल.
खराखुरा हिंदुत्ववादी पक्ष किव्हा अशा पक्षाच्या नेत्यांनी विधायक हिंदुत्ववाद जोपासावा. राष्ट्रद्रोह्यांना तिळमात्र थारा न देता, त्याचे समूळ उच्चाटन करावे. समाज विघातक तत्व शोधून शोधून ठेचावे. माता भगिनींवर वक्रदृष्टी ठेवणाऱ्यांचे डोळे फोडावे. देहविक्री करणाऱ्यांची चामडी सोलावी. कायदा आणि न्यायव्यवस्थेची जरब असावी. पोलीस, निमलष्करी आणि लष्करी दलांचा वापर करून देशद्रोह्यांना देश सोडून पळून जावे, असे पछाडावे. असा राष्ट्रवाद (हिंदुत्ववाद) चालेल. देशहिताचा विचार करणाऱ्यांना हा देश आणि हे राज्य सुरक्षित वाटले पाहिजे. ज्यांना इथे राहणे असुरक्षित वाटत असेल, त्यांचा राष्ट्रवाद शंकास्पद समजावा.
मतांसाठी आणि राजकीय फायद्यासाठी हिंदूंची सहानुभूती मिळवण्यासाठी गैरहिंदूंना अकारण त्रास देऊ नये. त्यांच्या राष्ट्रवादाबद्दल अकारण शंका घेऊ नये, असे वाटल्यास सखोल चौकशी करून सत्य बाहेर आणावे. उत्तरेतील प्रदेशात असे बघायला मिळते आहे. त्यांची कार्यशैली थोडी निराळी असली तरी ती लोकांना भावते आहे. जोवर राष्ट्र हिताला धरून असलेले हिंदुत्ववाद राबवतात, तोपर्यंत जनता साथ देईल. परंतु, राष्ट्रहिताच्या नावाखाली हिंदुत्ववाद राबवाल, तर कालांतराने जनता साथ सोडेल, कारण यात राष्ट्रहित नसेल. दिर्घकाळात देशासाठी ते हानिकारक असेल.
राष्ट्रवाद आणि हिंदुत्ववाद या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. दहा वर्षांपूर्वी दिसलेला राष्ट्रवाद हळू हळू लोप पावत चाललेला वाटतोय, आणि आता हळू हळू हिंदुत्ववाद डोकं वर काढतोय. सत्ताधाऱ्यांनी ही गोष्ट लक्षात ठेवावी. जेव्हा सबका साथ, सबका विकासाचा नारा दिला, तेव्हा जनतेने विकासाच्या सादेला साथ दिली आहे, हिंदुत्ववादाला नाही. विकास झाला तर सर्वांचाच विकास होणार आहे, हाताला काम मिळेल, कामातून दोन पैसे मिळतील. जीवनमान वधारेल, जीवन अधिक सुखकारक होईल. विकासच पोट भरेल, धर्म नाही.
सत्तेतील धुरंधरांना ही बाब माहीत होती म्हणून आधी विकासाचा नारा दिला असावा. हिंदुत्ववाद हा जर त्यांचा छुपा अजेंडा असेल तर त्यांची अधोगती सुरू होणार, हे नक्की. असे काही ते करणार नाही, अशी आशा करायला हरकत नाही. सर्वसामान्यांसाठी धर्म हा केवळ घरापूरता मर्यादित असतो, फारतर आसपासच्या लोकांपर्यंत. राज्य आणि देश पातळीवर धर्म काही देणार नाही, धर्माच्या मागे अंधपणे पळाल्याने काही हाती लागणार नाही.
आपल्या देवाचे मंदिर झाल्याने फारतर समाधान वाटेल, अभिमान वाटेल. परंतु त्याने आपल्या जीवनात काहीही फरक पडणार नाही, हे आपल्याला माहीत असते. फक्त भावना आणि श्रद्धा असल्याने त्यात आपण नकळतपणे अडकून जातो, आणि त्याबद्दलच्या बातम्या बघण्यात, चर्चा करण्यात किव्हा तिथे जाण्यात आपला बहुमोल वेळ खर्च करतो. त्यापेक्षा स्वतःवर आणि आपल्या कुटुंबियांवर लक्ष केंद्रित करून जीवनात जे अपेक्षित आहे, ते केल्याने आपल्या जीवनात फरक पडेल. तुम्ही प्रगती करा, छान आयुष्य जगा, हीच तर त्या देवाची इच्छा आहे, नाही का ?
ReplyForward
|