अनंत बोरसे
अमेरिका हा सर्व शक्तिमान महाशक्ती असला, तरी एखाद्या सार्वभौम राष्ट्रात हस्तक्षेप वा कारवाई करण्याचा त्याला कुठलाही अधिकार नाही आणि ते कुठल्याही आंतरराष्ट्रीय संकेतात बसत नाही. एखादा देश अमेरिकेची मनमानी चालू देत नाही म्हणून यापूर्वीदेखील अमेरिकेची दंडेलशाही वारंवार अधोरेखित झाली आहे. व्हेनेझुएला हा एक सार्वभौम देश आहे. असे असताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशानुसार अमेरिकन लष्कराने राष्ट्राध्यक्ष आणि त्यांच्या पत्नीचे अपहरण केले आणि कैदी बनवून अमेरिकेत आणले. आता त्यांच्यावर खटला चालविला जाणार आहे.
डोनाल्ड ट्रम्प हे विक्षिप्त राष्ट्राध्यक्ष म्हणून आता ओळखले जाऊ लागले आहेत. दुसर्या देशात हस्तक्षेप करण्याचा अमेरिका काय किंवा कोणालाही अधिकार नाही. त्यासाठी संयुक्त राष्ट्र संघ आहे, संघाची सुरक्षा परिषद आहे, आंतरराष्ट्रीय न्यायालय आहे. याला बगल देत अमेरिकेने दुसर्या देशात हस्तक्षेप करणे ही केवळ दंडेलशाही आहे. आजवर अनेक राष्ट्रांमध्ये अमेरिकेने हस्तक्षेप करत अनेक राजवटी उलथून टाकल्या आहेत. अमेरिका नेहमीच स्वतःला जगाचा पोलिस समजते. मात्र, वागते दरोडेखोरासारखी. अमेरिकेच्या या कृतीमुळे जगभर चिंतेचे वातावरण बनले आहे. अनेक देशांनी याचा निषेध व्यक्त केला आहे. भारतानेदेखील मोघमपणे चिंता व्यक्त केली आहे.
इराककडे अण्वस्त्रे असल्याचा बहाणा करून सद्दाम हुसेन याला संपवले. अशी अनेक उदाहरणे आहेत. गेल्या वर्षी बांगलादेशमध्ये झालेल्या सत्तांतरातदेखील अमेरिकेची भूमिका असल्याची चर्चा आहे. दुसर्यांदा राष्ट्राध्यक्ष झाल्यापासून डोनाल्ड ट्रम्प हे विक्षिप्त असल्यासारखे वागत आहेत. अमेरिका फर्स्ट म्हणत त्यांनी टेरिफ बॉम्ब फोडला आणि जगाला वेठीस धरले आहे. भारताबाबत तर ते कठोर भूमिका घेत आहेत. ’ऑपरेशन सिंदूर’ माझ्यामुळेच दोन्ही देशांनी थांबवले असे ते वारंवार सांगत आहेत. भारताने कोणाकडून तेल खरेदी करावे, कोणाकडून नाही यासाठी ते भारतावर दबाब आणत आहेत. आता पुन्हा एकदा त्यांनी भारतावर टेरिफ कर लादण्याचे संकेत दिले आहेत. आजवर अमेरिका, रशिया या दोन महाशक्तींच्या युद्धात भारताची भूमिका नेहमीच तटस्थ राहिली आहे. नॉन अलायन्स मूव्हमेटमध्ये भारताने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. रशियाच्या विघटनानंतर अमेरिका जगाची महाशक्ती बनू पाहत आहे. मात्र, आता चीन नवीन महाशक्ती म्हणून उदयास येत आहे. गेल्या काही वर्षांपासून आपण आपला पारंपरिक सच्चा मित्र रशियापासून दुर जात अमेरिकेबरोबर चुंबाचुंबी करत आहोत, पण अमेरिका भारताचा कधीच सच्चा मित्र बनू शकत नाही. डोनाल्ड ट्रम्प हे तर कोणाचेच मित्र बनू शकत नाहीत. आजवर जेव्हा जेव्हा पाकिस्तान आणि भारत यांच्यात बाजू घेण्याची वेळ आली तेव्हा तेव्हा अमेरिकेने पाकिस्तानची पाठराखण केली आहे.
अमेरिकेच्या दंडेलशाहीमुळे जगाची वाटचाल तिसर्या महायुद्धाकडे होत आहे का? युद्ध कोणालाही परवडणारे नाही. यामुळे होते ते केवळ नुकसानच. आजच्या घडीला जगभर महागाई, बेरोजगारी, आर्थिक संकट, आरोग्य, गरिबी, पर्यावरण, असे अनेक गंभीर प्रश्न असताना अमेरिका मात्र दंडेलशाही करत आहे. याला रोखणार तरी कोण? आजच्या घडीला जवळपास सर्वच शेजार्यांशी संबध चांगले राहिलेले नाहीत की जगात मित्र न वाढता शत्रूच अधिक वाढत आहेत, हे स्वीकारावे लागेल. नेपाळ, भूतानप्रमाणेच बांगलादेशबरोबर वर्षानुुवर्षे रोटीबेटीचे व्यवहार राहिले आहेत. मात्र, गेल्या काही वर्षांपासून चीन आणि पाकिस्तानकडे बांगलादेश झुकत आहे, हे लक्षात येऊनदेखील भारताने याकडे गांभीर्याने पाहिले नाही. गेल्या वर्षी बांगलादेशमध्ये झालेल्या सत्तांतराच्या वेळी शेख हसीना यांना भारताने आश्रय
दिला आणि अजूनही त्या भारतात आहेत.
बांगलादेशमध्ये होणार्या निवडणुकीत त्यांच्या पक्षाला अपात्र ठरविण्यात आले आहे. नुकत्याच मृत्यू पावलेल्या खलिदा झिया यांच्या पुत्राने बांगलादेशाचे धोरण स्पष्ट करताना ते बांगलादेशकेंद्रित असेल, हे स्पष्ट केले आहे. जमात इस्लामसारखा दुसरा पक्ष पाकिस्तानधार्जिणी भूमिका घेणारा पक्ष आहे.
निवडणुकीनंतर यापैकी कोणीतरी सत्तेवर येईल अशावेळी शेजार्याबरोबर सलोख्याचे संबंध ठेवताना भारताची मोठी कसोटी लागेल. तिकडे ट्रम्प तात्यांची मजीर्र् राखण्याचे कितीही प्रयत्न भारताकडून केले जात असले, तरी ट्रम्प तात्यांची नाराजी काही दूर होत नाही. रशियाकडून तेल खरेदी न थांबवल्यास टेरिफ कर लादण्याची पुन्हा एकदा त्यांनी धमकी दिली आहे. ऑपरेशन सिंदूरच्या वेळी भारताच्या बाजूने अफगाणिस्तानसारखे एक-दोन राष्ट्र सोडल्यास कुणीही पाठीशी उभे राहिले नाही. एकेकाळी निरपेक्ष गटाचे नेतृत्व करणारा भारत आज मात्र चांगलाच कोंडीत सापडला आहे. भारताचे परराष्ट्र धोरण कुठेतरी ’चुकते’ आहे का? अमेरिका- ट्रम्प यांची मनमानी, दंडेलशाही रोखायची कोणी?
Who can stop the tyranny of Donald Trump (USA)?
प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…
महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…
कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…
सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…
पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…
नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्या…