संपादकीय

भक्तांना कोण तारी?

बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर येथे गेल्या आठवड्यात हरियाणाच्या एका भाविकाला पाच ते सहा जणांनी अगदी कपडे फाटेपर्यंत बेदम मारहाण केली. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर संतापाची लाट उसळली. शेकडो किलोमीटरचा प्रवास करत मनःशांती आणि देवदर्शनासाठी रांगेत पाच-पाच तास उभे राहिल्यानंतर देवदर्शनाऐवजी लाथाबुक्क्यांचा प्रसाद जर मिळत असेल तर दुरून दर्शन केलेलेच बरे, असे म्हणण्याची वेळ आली आहे.

मंदिर परिसरातील हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या घटनेची दखल घेण्याऐवजी सुरक्षारक्षकच कसे धुतल्या तांदळासारखे स्वच्छ आणि ज्या भाविकाला मारहाण झाली तो चक्क ड्रग्ज घेऊन आला होता, असा जावईशोधदेखील विश्वस्तांनी लावला. अगदी चेहरा पाहून ड्रग्ज घेतले होते, असा शोध लावणार्‍या त्या विश्वस्ताला खरे तर पोलीस खात्याने फॉरेन्सिक लॅबचा प्रमुखच करायला हवे. विशेष म्हणजे, कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांनीही या प्रकरणाबद्दल चेहरा पाहून ड्रग्ज घेतले, हे कसे ओळखणार? असा सवाल उपस्थित केला. त्यामुळे सुरक्षारक्षकावर जशी कारवाई झाली तद्वतच भाविकाला थेट आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करणार्‍या त्या विश्वस्तावरदेखील कारवाई व्हायलाच हवी, अशी जनभावना आहे.
त्र्यंबकेश्वर देवस्थानमध्ये भाविकांना भक्तीचा प्रसाद मिळण्याऐवजी जो लाथाबुक्क्यांचा प्रसाद मिळतो. ही घटना काही पहिल्यांदाच घडलेली नाही. यापूर्वी 16 ऑगस्ट 2025 ला भाविकांना लाठ्याकाठ्यांनी मारहाण करण्यात आली होती. 14 जानेवारी 2024 ला ऐन मकरसंक्रांतीच्या दिवशी गर्दी वाढल्यामुळे रांगेत उभ्या असलेल्या भाविकांशी सुरक्षारक्षकांचा वाद झाला. यावेळीदेखील भाविकांना धक्काबुक्की झाली होती. 11 सप्टेंबर 2023 ला श्रावणी सोमवारच्या दिवशी दर्शनासाठी मोठी गर्दी उसळल्याने व्हीआयपी दर्शन आणि सामान्य रांगेतील वादावरून सुरक्षारक्षक आणि भाविकांत मोठी बाचाबाची झाली होती. यावेळीदेखील काही भाविकांनी मारहाणीचा आरोप केला होता. 1 मे 2023 ला उत्तर भारतीय काही भाविकांना सुरक्षारक्षकांनी त्यांना अर्ध्या रस्त्यात अडविल्याने बाचाबाचीचे रूपांतर धक्काबुक्कीत झाले होते. 5 जानेवारी 2023 ला नवीन वर्षाच्या सुरुवातीला दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या एका गटाला सुरक्षारक्षकांनी मारहाण केल्याची तक्रार त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात दाखल झाली होती.
त्र्यंबकेश्वर येथील मंदिराच्या एकूणच दर्शनाच्या पद्धतीच्या अनेक सुरस कथा नागरिकांत चर्चिल्या जात आहेत. देवदर्शनासाठी भाविक हजारो रुपये खर्च करून दूर अंतरावरून येतात. तीन-तीन तास रांगेत उभे राहतात आणि दर्शनाची वेळ आली की, एक सेकंदही थांबू न देता देवाजवळील बडवे मागून ढकलून देतात. जवळपास सर्वच ठिकाणी अशी कार्यप्रणाली असल्याने भाविक धड दर्शनही घेऊ शकत नाहीत. अर्थात, प्रत्येक ठिकाणी असाच अनुभव येईल असेही नाही. दर्शनाची व्यवस्था जर पाहायची असेल तर त्र्यंबकेश्वरच्या विश्वस्तांनी एकदा शेगावला श्री संत गजानन महाराज मंदिरातील व्यवस्थेचा पाहणी दौरा करून त्र्यंबकेश्वरलाही काही उपाय करता येतील का? याचा विचार करायला हवा. सिंहस्थनगरी असल्यामुळे त्र्यंबकेश्वरचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. त्यातच गेल्या काही वर्षांत भाविकांमधील आस्था वाढीला लागल्याचा परिणाम म्हणून त्र्यंबकेश्वरला आता बाराही महिने गर्दीचा ओघ अविरत सुरू असतो. देवस्थानने गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी खासगी सुरक्षारक्षक नियुक्त केलेले आहेत; परंतु हे सुरक्षारक्षक म्हणजे चहापेक्षा किटली गरम या वृत्तीने वागताना दिसतात. मंदिर म्हणजे जणू काही यांच्या बापजाद्यांची इस्टेट असल्यासारखे त्यांचे वर्तन असते. भाविकांना ढकलणे, अंगावर खेकसणे यामुळे दर्शन नको, पण या बडव्यांना आवरा, असे खेेदाने म्हणावे लागते. प्रापंचिक दु:खाने पिचलेला माणूस
मनःशांतीसाठी देवाच्या द्वारी क्षणभरासाठी येतो खरा, पण पदरी मनस्तापच पडतो. देवस्थानने दोनशे रुपये व्हीआयपी दर्शन पासची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. यातून त्र्यंबक देवस्थानचे आणि काही विश्वस्तांचे भले होत असले, तरी दोनशे रुपयांचा पास मिळविण्यासाठी द्राविडी प्राणायाम करावा लागतो. देवस्थानच्या व्यवस्थापकांना यात लक्ष घालण्यास वेळ तरी मिळतो की नाही? याबाबतच साशंकता आहे. त्र्यंबकमध्ये तीन महिन्यांपूर्वी काही पत्रकारांना एन्ट्री फीवरून मारहाण झाली. त्यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत हे प्रकरण गेले. अर्थात, पत्रकार असल्यामुळे तातडीने दखल घेतली गेली. पण सामान्य माणूस दररोज फटके खातोय, अगदी कपडे फाटेपर्यंत त्याला मारले जाते. त्यांना कुणी वाली आहे की नाही? यात कौतुक करावे लागेल ते जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांचे. त्यांनी स्वत: या घटनेची दखल घेऊन गुन्हा दाखल केला. त्यानंतर त्या सुरक्षारक्षकांना अटकही झाली आणि कामावरून त्यांना बडतर्फही करण्यात आले. विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी आता या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. त्र्यंबकेश्वरच्या नगराध्यक्षांनीही या प्रकरणात कडक कारवाई करावी. अशी मागणी केली. नगराध्यक्षांनाही देवस्थानचा हा कारभार काही पटलेला नाही. त्र्यंबकेश्वर देवस्थानला एवढे उत्पन्न मिळते, पण त्या तुलनेत सुविधा नाहीत. विशेष म्हणजे, उत्पन्नवाढीसाठी आणखी नवनवीन फंडे शोधून काढत स्वत:चे उखळ पांढरे करण्यात काही विश्वस्त पटाईत आहेत. मागे नगरपालिकेच्या अधिकारी असलेल्या श्रीया देवचक्के यांनी चप्पल स्टँडचा ठेका एका खासगी ठेकेदाराला दिला. त्यातून ठेकेदाराचे तर भले झालेच, पण अधिकार्‍यांनीदेखील वाहत्या गंगेत हात धुऊन घेतले. म्हणजे चपला ठेवायलासुद्धा पैसे घेणारे हे देवस्थान भाविकांना विनात्रास दर्शन होईल, याची काळजी का घेत नाही? पुढील वर्षी नाशिक व त्र्यंबकेश्वरमध्ये सिंहस्थ होत आहे. त्याच्या कामांची गती आता हळूहळू वेग पकडत आहे. श्रावण आणि सुट्ट्यांच्या दिवशी जेवढी गर्दी असते, त्यांच्या शंभर-दोनशेपट गर्दी सिंहस्थात होते. आताच जर अशी परिस्थिती आहे तर सिंहस्थात काय होईल, याची कल्पनाच न केलेली बरी! मंदिरातील देवाभोवती जे बडवे आहेत त्यांचे वागणे व्यक्तीनुसार बदलते. एखादा सेलिब्रिटी आला तर सर्व नियम फाट्यावर मारून त्याच्या पुढे पुढे करणे हा जणू काही यांचा जन्मसिद्ध हक्कच आहे. एखाद्या भक्ताच्या हातात हिरवी नोट असेल तर भक्ताला नारळ देऊ की हार देऊ की आणखी काय काय देऊ? इतका तो आनंद चेहर्‍यावर ओसंडून वाहतो. सामान्य भक्त जर हात जोडणारा असेल तर त्याला धक्के मारून बाहेर काढतात. वास्तविक देव हा भक्तीचा भुकेला असतो. भेदाभेद अमंगळ… देवाच्या द्वारी सर्व समान आहेत. पण त्र्यंबक देवस्थानला ज्या बडव्यांनी घेरलंय, त्यामुळे सामान्य भक्तांना त्र्यंबकराजा आता तूच तार, असे म्हणण्याची वेळ आली आहे.
त्र्यंबकेश्वर देवस्थानातील एकूणच कारभाराबद्दल माजी विश्वस्त ललिता शिंदे आवाज उठवत असतात. पण तरीही निगरगट्ट झालेली यंत्रणा आणि सामान्यांचा दाबला जाणारा आवाज यामुळे सगळीच हतबलता दिसून येते. मागील आठवड्यात झालेल्या घटनेतून प्रशासनाने बोध घेऊन त्र्यंबक मंदिराची एकूणच व्यवस्था सुधारावी लागेल. ज्या भाविक भक्तांमुळे येथील एकूणच अर्थकारणाला चालना मिळते तो भक्तच जर असे प्रसंग वारंवार घडू लागल्याने दुरावला तर त्र्यंबकचे अर्थकारण चालणार कसे? याचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे.

Who saves the devotees?

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

सातपूरला गॅसचा काळाबाजार उघडकीस

पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…

6 hours ago

गुढीपाडव्याच्या निमित्ताने बाजारात उत्साह

मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…

7 hours ago

कचरा करताना कुणीच कचरत नाही…

आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…

7 hours ago

शहरात 12 कोटींचा टीडीआर घोटाळा

स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…

7 hours ago

उन्हाच्या झळांनी धरणांच्या पाणीपातळीत घट

धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…

7 hours ago

चंदुकाका सराफ प्रस्तुत “विवाह तस्मै” कलेक्शन!

पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…

7 hours ago