“शेतकर्‍याच्या घामाची किंमत कोण ठरवणार?”

– ज्योती जाधव-काळे

काल मार्केटमध्ये असताना तिथे एक व्यक्ती भाजीवाल्यासोबत घासाघीस करत म्हणत होती….
“30 रुपयांची भाजीची जुडी 20 ला द्या” तो प्रसंग पाहून मन सुन्न झालं कारण त्या 30 रुपयांच्या मागे फक्त भाजी नव्हती, तर एका शेतकर्‍याचा घाम, कष्ट, संघर्ष आणि आशा दडलेली होती.
एक शेतकरी बी पेरतो, महिनोनमहिने उन्हात राबतो, कधी पावसाची चिंता, कधी दुष्काळाची भीती, कधी रोगराई तर कधी बाजारभावाची अनिश्चितता.
इतकं सगळं सहन करून तो पीक उभं करतो.पण दुर्दैव असं की, ज्याने माल पिकवला त्यालाच त्याच्या मालाची किंमत ठरवण्याचा अधिकार नसतो.
शेतकरी रात्रंदिवस कष्ट करतो, पण भाव ठरवतात व्यापारी, बाजार आणि परिस्थिती आणि शेवटी तोच शेतकरी तोट्यात जातो.
आपण एखाद्या मोठ्या मॉलमध्ये जातो, तिथे लिहिलेली किंमत न बोलता देतो, पण भाजीवाल्याकडे मात्र 5-10 रुपयांसाठी कटकट करतो.
कधी विचार केलाय का? त्या पैशांवर कुणाचं घर चालत असेल, कुणाच्या मुलांचं शिक्षण होत असेल, कुणाच्या संसाराची आशा टिकून असेलमुलीचे शिक्षण, तिचं लग्न, तिचं भविष्य यासाठी स्वतःच्या इच्छा मारून जगतो. शेतकरी फक्त अन्न पिकवत नाही, तो आपल्या जगण्याचा आधार पिकवत असतो म्हणूनच, शेतकर्‍याच्या कष्टाचा आदर करा त्यांच्या घामाची किंमत कमी
करू नका.
सीमेवर उभा असलेला जवान, मातीत घाम गाळणारा किसान, आणि घरात सर्वांसाठी प्रेमाने स्वयंपाक करणारी स्त्री, या तिघांचं ऋण कधीच फेडता येणार नाही कारण, एक देशाचं रक्षण करतो, एक जगाची भूक भागवतो, आणि एक घराला मायेची ऊब देते. म्हणून आयुष्यात नेहमी जवान, किसान आणि स्त्रीचा मनापासून आदर करा.
पण दुर्दैव एवढंच देशाचं पोट भरणारा शेतकरीच आज स्वतःच्या हक्कासाठी झगडतोय, म्हणून फक्त “अन्नदाता” म्हणू नका, तर त्याच्या घामाची किंमतही ओळखा कारण “जगाचा पोशिंदा” वाचला, तरच आपलं उद्याचं पोट भरेल. शेतकर्‍याला पिकाचा हमीभाव मिळत नाही,खत, बियाणे, औषधं यांचे दर खूप वाढले पण मालाला योग्य भाव नाही, पाऊस कधी जास्त तर कधी दुष्काळ सगळा धोका शेतकर्‍यालाच …..
कर्ज घेऊन शेती करावी लागते, पण उत्पन्न मात्र अनिश्चित. दलाल आणि व्यापारी जास्त नफा कमावतात, शेतकरी मात्र तोट्यात राहतो. शेतमाल साठवण्यासाठी योग्य गोदामांची कमतरता. रस्ते, वीज, पाणी या मूलभूत सुविधांचा अभाव, विमा योजना वेळेवर मिळत नाहीत किंवा प्रक्रिया खूप कठीण असते. शेतकर्‍यांच्या मुलांनाही शेती नकोशी वाटते कारण भविष्य सुरक्षित नाही. आत्महत्या करणार्‍या शेतकर्‍यांची वाढती संख्या ही समाजासाठी लाजिरवाणी बाब आहे. लोक एका मोबाईलसाठी हजारो रुपये देतात, पण भाजी 5 रुपये कमी मागतात. “अन्नदाता” म्हणणारेच त्याच्या कष्टाची किंमत विसरतात. शेती हा व्यवसाय नाही तर जगण्याचा संघर्ष झाला आहे. सरकारने थेट शेतकर्‍यांकडून माल खरेदी करण्याची व्यवस्था वाढवावी. शेतकर्‍याला त्याच्या मालाचा भाव ठरवण्याचा अधिकार मिळायला हवा.आज शेतकरी फक्त पिकांसाठी नाही, तर स्वतःच्या अस्तित्वासाठी लढतोय, त्याच्या हातात नांगर आहे, पण आयुष्य मात्र कर्जाच्या ओझ्याखाली दबलंय. सरकारने फक्त घोषणा नाही, तर प्रत्यक्ष मदत आणि योग्य धोरणं द्यायला हवीत. कारण शेतकरी वाचला तरच देशाचं भविष्य वाचेल मी देखिल एका शेतकर्‍याची मुलगी आहे”
म्हणूनच शेतकर्‍याच्या डोळ्यातलं दुःख,त्याच्या कपाळावरचा घाम आणि मनातली चिंता मला जवळून समजते.
लहानपणापासून वडिलांना उन्हात राबताना पाहिलंय,पावसासाठी आकाशाकडे आशेने बघताना पाहिलंयरात्रंदिवस कष्ट करूनही हातात मात्र अपुरे पैसे येताना पाहिलंय त्याच्या घामाची किंमत दुसरंच कुणीतरी ठरवतांना पाहिलंय…. “जगाचा पोशिंदा” म्हणणारा शेतकरी आज स्वतःच्या जगण्यासाठी झगडतोय, शेतकरी सकाळपासून संध्याकाळपर्यंत उन्हात घाम गाळतो,पण त्याच्या कष्टाची किंमत बाजारात काही रुपयांत मोजली जाते. खत, बियाणे, औषधं, वीज, मजुरी, सगळ्यांचे दर वाढले, पण शेतमालाला योग्य भाव मात्र आजही नाही. कधी अवकाळी पाऊस,कधी दुष्काळ, कधी गारपीट, तर कधी व्यापार्‍यांची लूट, प्रत्येक संकट आधी शेतकर्‍यावरच कोसळतं.
सरकारकडे माझा एकच प्रश्न आहे, देशाला अन्न देणारा शेतकरीच आज उपाशी का झोपतोय? शेतकरी फक्त कर्जमाफी मागत नाही, तर त्याच्या कष्टाला योग्य मान आणि योग्य भाव मागतोयजर शेतकरीच उरला नाही, तर उद्या आपल्या ताटातला घास कुठून येणार? आज कांदा पिकवणारा शेतकरी डोळ्यात पाणी आणून स्वतःचं पीक विकतोय महिनोन्महिने मेहनत करून, कर्ज काढून, औषधं-खत टाकून उभं केलेलं पीक जेव्हा बाजारात कवडीमोल भावात विकावं लागतं,तेव्हा फक्त कांदाच नाही तर शेतकर्‍याचं मनही रडत असतं, कधी तर इतका कमी भाव असतो की, वाहतूक खर्चही निघत नाही हे असे अनेक पिकांबाबत होते कि मार्केट लाच शेतकरी भाजीपाला टाकून येतात…मग शेतकर्‍याने जगायचं तरी कसं? सरकारने कांद्याला योग्य हमीभाव द्यावा,दलालांची लूट थांबवावी आणि शेतकर्‍याच्या घामाची किंमत ओळखावी.
माझे वडील मला नेहमी सांगतात “ताई तुझे लेख खूप छान असतात, मला तुझा अभिमान आहे, फक्त कधी कुणाचं मन दुखेल असं लिहू नको” पण काय करणार बाबा…… आज शेतमालाला भाव नाही म्हणून माझ्या शेतकरी वडिलांचंच मन दुखत असेल, तर मी आणि माझ्यातील लेखिका तरी कशी शांत राहणार…..? तुमच्या हातावरचे घट्टे पाहिले आहेत मी उन्हात वाहणारा घाम मी पाहिलाय, कर्जाच्या चिंतेत हरवलेला चेहरा पाहिलाय, कर्जाचा डोंगर आणि चिंता असलेला चेहरा मी पाहिलाय… म्हणूनच आज शब्द शांत बसत नाहीत कारण ही फक्त माझ्या बाबांची नाही, तर प्रत्येक शेतकरी बापाची वेदना आहे फक्त एवढीच विनंती…..भाजी घेताना पैसे कमी करा,पण शेतकर्‍याच्या कष्टाची किंमत कमी करू नका कारण ज्या दिवशी शेतकर्‍याच्या डोळ्यातलं पाणी संपेल, त्या दिवशी आपल्या ताटातला घासही संपेल कारण अजून शेतकरी संपावर गेलेला नाही तो आजही स्वतःचं दुःख बाजूला ठेवून जगाची भूक भागवतोय, पण ज्या दिवशी शेतकर्‍यानेच नांगर खाली ठेवला, त्या दिवशी पैशांनी बाजार भरलेले असतील, पण ताटात घास नसेल म्हणून वेळ अजूनही गेलेली नाही शेतकर्‍याच्या घामाची किंमत ओळखा, नाहीतर उद्या जगाला अन्नाची खरी किंमत समजेल.
आजही शेतकरी शांत आहे म्हणूनच देशाची चूल पेटतेय, ज्या दिवशी तो रस्त्यावर उतरेल त्या दिवशी सरकारलाही भुकेची
किंमत कळेल.

“Who will determine the value of the farmer’s sweat?”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *