संपादकीय

‘व्हॅलेंटाइन डे’ भारतात हवा कशाला?

व्हॅलेंटाइन डेची तयारी तरुणवर्गामध्ये एक आठवडा आधीपासूनच सुरू आहे. गेल्या काही वर्षांत व्हॅलेंटाइन डेचे स्तोम भारतात भलतेच माजले आहे. चॉकलेट, भेटवस्तू यांची निर्मिती करणार्‍या कंपन्या आपली उत्पादने खपवण्यासाठी या दिवसांत नाना शक्कल लढवताना दिसतात. टीव्ही मालिकांमध्येसुद्धा व्हॅलेंटाइन डेचाच फिवर असतो.
वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधीही यानिमित्ताने तरुणांशी याच विषयावर हितगुज साधताना दिसतात. चित्रपट आणि मालिकांत काम करणारे अभिनेते आणि अभिनेत्री यंदाचा व्हॅलेंटाइन कसा साजरा करणार, याबाबतचे सविस्तर वर्णन आपल्या सामाजिक माध्यमाच्या अकाउंटवरून प्रसारित करतात. प्रेमकथेवर आधारित असलेल्या चित्रपट निर्मात्यांकडून खास या दिवसांत प्रदर्शित केले जातात. मित्रपरिवारामध्ये आपल्या प्रियकराला किंवा प्रेयसीला काय भेटवस्तू द्यावी, व्हॅलेंटाइन दिनानिमित्त कुठे फिरायला जायचे याचे नियोजन सुरू असते. हे सर्व पाहिल्यावर आपल्यालाही एखादी गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंड असावा, असे अन्य तरुण-तरुणींनाही वाटू लागते आणि त्यादृष्टीने त्यांची विचारप्रक्रिया सुरू होते. ‘प्यार किया नही जाता, हो जाता हैं’; मात्र व्हॅलेंटाइन दिनानिमित्त तयार करण्यात आलेला गुलाबी माहोल कुणाच्या तरी प्रेमात पडण्यासाठी प्रवृत्त करू लागतो. परिणामी, या एक दिवसाच्या निमित्ताने निर्माण झालेली भावनासुद्धा काही काळासाठीच टिकते. व्हॅलेंटाइन फिवर उतरला की वास्तवाचे भान होते. व्हॅलेंटाइन दिनाच्या निमित्ताने मुलींच्या भावनांचा गैरफायदा घेणारे महाभागही गल्लोगल्ली टपलेले असतात. दरवर्षी कितीतरी मुली या वासनांधांना बळी पडतात. क्षणिक सुखाला भुलून चुकीचे निर्णय घेतात आणि स्वतःचे आयुष्य उद्ध्वस्त करतात. यामध्ये आई-वडिलांची बदनामी होते ती वेगळीच.
तिसर्‍या शतकात रोम येथे व्हॅलेंटाइन नावाचा एक पाद्री (प्रिस्ट) होता. त्या काळातील क्लॉडीयस दोन नावाच्या राजाने एक नियम लागू केला की, बायका-मुले असलेल्या पुरुषांपेक्षा अविवाहित पुरुष कुशल सैनिक असतात. त्यामुळे युवा मुलांनी विवाह करू नये. व्हॅलेंटाइनला हे अयोग्य वाटले आणि त्याने राजाच्या नियमाचे पालन न करता लपूनछपून जोडप्यांची लग्न लावणे सुरू ठेवले. व्हॅलेंटाइनने राजाचा आदेश न पाळल्याने तो क्रोधीत झाला आणि त्याने व्हॅलेंटाइनला ठार मारण्याचा आदेश दिला. रोमच्या कारागृहात असताना व्हॅलेंटाइन कारागृहातील तुरुंगाधिकार्‍याच्या तरुण मुलीच्या प्रेमात पडला. मृत्यूपूर्वी त्याने तिला एक पत्र पाठवले आणि त्यात शेवटी तुझ्या व्हॅलेंटाइनकडून असे लिहिले. तेव्हापासून 14 फेब्रुवारीला प्रेयसीला पत्र लिहून शेवटी ‘तुझा व्हॅलेंटाइन’ लिहिण्याची प्रथा तरुण वर्गात पडली. काहींच्या मते 14 फेब्रुवारी हा व्हॅलेंटाइनचा मृत्यूदिन आहे, तर काहींच्या मते पाचव्या शतकाच्या शेवटी पोप जिलेसियसने 14 फेब्रुवारी या दिवसाला सेंट व्हॅलेंटाइन डे म्हणून घोषित केला. ज्याचा संबंध पुढे बर्‍याच वर्षांनी प्रेमाशी जोडण्यात आला. ज्या देशांमध्ये कुटुंबव्यवस्था मोडकळीस आली आहे, नात्यांतील दुरावा वाढला आहे, अशा देशांमध्ये डे संस्कृती रुजवली गेली.
‘मदर्स डे’, ‘फादर्स डे’, ‘सिस्टर्स डे’, ‘ब्रदर्स डे’ ही त्याचीच काही उदाहरणे आहेत. वर्षभर शक्य नाही तर निदान या एका दिवसाच्या निमित्ताने तरी त्या त्या नात्यांचा मान राखला जावा. नात्याप्रति प्रेम व्यज्ञवत केले जावे, हा त्यामागील मुख्य हेतू होता. भारतात मात्र कुटुंबव्यवस्थाच केंद्रस्थानी असल्यामुळे अशा प्रकारच्या एक दिवसाच्या समारंभाची इथे काहीच गरज नाही. कोणाच्या शरीरावर नव्हे तर आत्म्यावर प्रेम करायला भारतीय संस्कृती शिकवते. भगवंत चराचरात वसला असल्याने प्राणी, पशू, पक्षी, वृक्ष, लतासह निर्जीवांवरही भारतीय संस्कृती प्रेम करण्याची शिकवण देते. व्हॅलेंटाइन डेच्या निमित्ताने हल्ली पाहायला मिळतो तो केवळ शारीरिक आकर्षणाचा देखावा.
मध्यंतरीच्या काळात व्हॅलेंटाइन डेच्या निमित्ताने शाळा-महाविद्यालयांतील नवोदित प्रेमी युगुले बागांमध्ये, तळी, नद्या आणि समुद्रकिनारी, रस्त्यालगतच्या बाकड्यांवर, बस आणि रेल्वे स्थानकांवर गळ्यात गळे घालून प्रेमाच्या आणाभाका खाताना दिसून येत, पुढे पुढे तर यांचे धाडस वाढत गेले आणि नको नको ते प्रकार घडत गेले. याबाबतची तक्रार काही सामाजिक संघटनांना मिळाल्यावर त्यांनी या प्रेमाच्या एकदिवसीय चाळ्यांच्या विरोधात थेट मोहीम हाती घेतली. याला जसा काही मंडळींकडून विरोध झाला तसा काहींकडून सकारात्मक
प्रतिसादही मिळाला.
सलग चार-पाच वर्षे ही मोहीम राबवल्याचा चांगलाच परिणाम होऊन आजमितीला हे प्रमाण बर्‍यापैकी घटलेले दिसते. एका सर्वेक्षणानुसार सुमारे 30 टक्क्यांहून अधिक मुले मुलींशी लैंगिक संबंध ठेवण्यासाठी हा दिवस साजरा करतात. गर्भनिरोधक साधने बनवणार्‍या आस्थापनांच्या मतानुसार इतर दिवसांच्या तुलनेत या दिवशी गर्भनिरोधकांची विक्री अधिक होते. अर्थातच, अविवाहित मुले-मुली या दिवशी लैंगिक संबंध ठेवतात. याचा परिणाम म्हणून पुढे अनेक अविवाहित मुलींना गर्भपात करावा लागतो. व्हॅलेंटाइन दिनानिमित्त खास डिस्काउंट देणार्‍या ऑनलाइन साइट्सवर चॉकलेट आणि भेटवस्तूंसोबत दरवर्षी गर्भनिरोधक साधनांवरसुद्धा डिस्काउंट दिले जात आहेत.
किशोरवयीन मुले-मुली आपल्या प्रिय व्यक्तीला महागड्या भेटवस्तू देण्यासाठी पैसे कुठून आणतात हे कुणी विचारात घेते का? मैत्रिणीला व्हॅलेंटाइन गिफ्ट देण्यासाठी वडिलांच्या पाकिटातून पैसे चोरल्याच्या, आईचे दागिने किंवा घरातील महागडी वस्तू परस्पर विकल्याच्या बातम्या या दिवसांत छापून येतात. गुन्हेगारी कृत्य करण्यास प्रवृत्त करणार्‍या, अनैतिक कृत्यास प्रोत्साहन देणार्‍या आणि तरुणांना क्षणाचे सुख देऊन दीर्घकाळाचा भ्रमनिरास देणार्‍या व्हॅलेंटाइन डेची भारतात गरज तरी आहे का?

Why is Valentine’s Day needed in India?

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

सातपूरला गॅसचा काळाबाजार उघडकीस

पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…

9 hours ago

गुढीपाडव्याच्या निमित्ताने बाजारात उत्साह

मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…

10 hours ago

कचरा करताना कुणीच कचरत नाही…

आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…

10 hours ago

शहरात 12 कोटींचा टीडीआर घोटाळा

स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…

10 hours ago

उन्हाच्या झळांनी धरणांच्या पाणीपातळीत घट

धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…

10 hours ago

चंदुकाका सराफ प्रस्तुत “विवाह तस्मै” कलेक्शन!

पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…

10 hours ago