मुंबई नाका पोलीस ठाण्यात दोन अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा
सिडको : विशेष प्रतिनिधी
गोविंदनगर परिसरातील एका वाइन शॉपमध्ये मध्यरात्री चोरी करत चोरट्यांनी रोख रक्कम आणि महागड्या विदेशी मद्याच्या बाटल्या असा एकूण 4 लाख 64 हजार 905 रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली. या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात दोन अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी समीर अशोक गणोरे (वय 54, रा. टिळकवाडी, नाशिक) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 31 जुलै रोजी पहाटे दोनच्या सुमारास तिडके कॉलनी-जुना कॅनॉल रोड परिसरातील अशोक ब्रदर्स वाइन शॉप येथे दोन अज्ञात चोरटे आले. त्यांनी सुरुवातीला दुकानाच्या मुख्य प्रवेशद्वाराचे कुलूप कटरने तोडण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यात अपयश आल्याने दुकानाच्या मागील बाजूच्या बाथरूमची लोखंडी खिडकी तोडून एका चोरट्याने दुकानात प्रवेश केला. चोरट्यांनी दुकानातील 3 लाख 75 हजार रुपयांची रोख रक्कम तसेच जॉनी वॉकर ब्ल्यू लेबल, सिंगलटन, ग्लेन मॉरेंजी, रामपूर विरासत, मंकी शोल्डर, ग्लेनलिव्हेट, डिवार्स आदी महागड्या विदेशी मद्याच्या बाटल्या असा 89 हजार 905 रुपयांचा माल चोरून नेला. चोरी गेलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत 4 लाख 64 हजार 905 रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात दोन अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हवालदार म्हैसधुणे करीत आहेत.
Wine shop broken into; goods stolen.