अपघात की घातपात याबाबत उलटसुलट चर्चेला उधाण
सिडको : प्रतिनिधी
कंपनीच्या कामानिमित्त मित्रासोबत वाडीवर्हे परिसरात गेलेल्या सिडकोतील 34 वर्षीय विवाहित महिलेचा रिसॉर्टच्या प्रवेशद्वाराजवळ वाहनाच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (दि. 18) दुपारी घडली. रूपाली नीलेश पाटील (वय 34, रा. शिव नारायण अपार्टमेंट, एकदंतनगर, अंबड) असे मृत महिलेचे नाव आहे. हा अपघात होता की घातपात, याबाबत संशय व्यक्त होत असून, वाडीवर्हे पोलिसांकडून सर्व शक्यता तपासल्या जात आहेत.
रूपाली पाटील या सिडको परिसरातील एका डायग्नोस्टिक सेंटरमध्ये लॅब असिस्टंट म्हणून कार्यरत होत्या. मंगळवारी त्या नेहमीप्रमाणे कामानिमित्त पवननगर येथील उमा हॉस्पिटलमधील ओमकार लॅबमध्ये गेल्या होत्या. त्यानंतर त्या मित्र दीपक सौंदाणे याच्यासोबत सांजेगाव येथील मिर्ची रिसॉर्टमध्ये गेल्याची माहिती नातेवाइकांनी दिली.
दुपारी सुमारे 1.30 वाजता दोघे रिसॉर्टमधून बाहेर पडत असताना प्रवेशद्वाराजवळ वाहन मागे घेताना वाहनावरील नियंत्रण सुटल्याने रूपाली यांना वाहनाची धडक बसल्याचे प्रथमदर्शनी पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. या धडकेत त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना रुग्णवाहिकेतून नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकार्यांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले.
घटनेनंतर रूपाली यांच्यासोबत असलेला दीपक सौंदाणे याला वाडीवर्हे पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याची चौकशी सुरू आहे. अपघात नेमका कशामुळे झाला, तसेच या घटनेमागे अन्य काही कारण आहे का, याची पोलिसांकडून पडताळणी केली जात आहे. प्रथमदर्शनी हा अपघात असल्याचे दिसून येत आहे. मात्र, अपघात की घातपात, याबाबत सर्व बाजूंनी तपास सुरू आहे, अशी माहिती वाडीवर्हे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक धीरज महाजन यांनी दिली. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. पोलिसांच्या तपासानंतरच घटनेमागील नेमके कारण स्पष्ट होणार आहे. दरम्यान, मयत रूपाली पाटील यांच्या पश्चात पती, सात वर्षांची मुलगी, सासू-सासरे असा परिवार आहे. या घटनेमुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, सिडको परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
Woman from CIDCO dies near resort entrance