पेट्रोल ओतून महिलेला पेटवले; दोघांचाही मृत्यू

देवघट येथील हृदयद्रावक घटना

प्रतिनिधी : मालेगाव
वादातून महिलेच्या अंगावर पेट्रोल ओतून तिला पेटवून दिल्याच्या घटनेत गंभीर भाजलेल्या सुनंदा मोरे (45) आणि संशयित अनिल सोनवणे (50) या दोघांचाही गुरुवारी (दि. 8) रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला. तालुक्यातील देवघट येथील इंदिरानगर वस्तीवर बुधवारी (दि. 7) मध्यरात्री घडलेल्या या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे. दोघांवरही शुक्रवारी (दि. 9) रात्री देवघट येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार होते.
सुनंदा मोरे या आई, बहीण आणि मुलांसह झोपडीबाहेरील अंगणात झोपल्या होत्या. त्यावेळी संशयित अनिल सोनवणे हा पेट्रोलने भरलेली कॅन घेऊन तेथे आला. त्याने झोपलेल्या सुनंदा यांच्या अंगावर पेट्रोल ओतून त्यांना पेटवून दिले. आगीच्या ज्वाळांनी होरपळत असताना सुनंदा यांनी आरडाओरड केली. यावेळी झालेल्या झटापटीत अनिलदेखील गंभीर भाजला.
घटनेनंतर अनिलने घटनास्थळावरून पळ काढत जवळच असलेल्या पाण्याच्या डबक्यात उडी घेतली. आरडाओरड ऐकून परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. दोघांनाही तातडीने मालेगाव येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांना धुळे येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच गुरुवारी रात्री दोघांचाही मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच मालेगाव तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रघुनाथ शेगर यांनी पथकासह घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. सुनंदा यांचा मुलगा सोमनाथ मोरे यांच्या फिर्यादीवरून तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुनंदा मोरे यांच्या पश्चात चार मुली, एक मुलगा, आई आणि बहीण असा परिवार आहे. तर अनिल सोनवणे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले आणि दोन मुली असा परिवार आहे. या दुर्दैवी घटनेत दोघांचाही मृत्यू झाल्याने दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Woman set on fire after being doused with petrol; both died.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *