गेल्या तीन वर्षांत 45,963 महिलांच्या, तर केवळ 1,851 पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया
नाशिक : प्रतिनिधी
जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव मोहिमेंतर्गत जिल्हा परिषद आरोग्य विभागाने 11 ते 18 जुलैदरम्यान विशेष कुटुंबनियोजन सप्ताह सुरू केला आहे. जिल्ह्यात कुटुंब नियोजनाबाबत जनजागृती व सेवांना वाढता प्रतिसाद मिळत आहे. गेल्या तीन वर्षांत 45 हजार 963 महिला व एक हजार851 पुरुष, अशा एकूण 47 हजार 814 नसबंदी शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.
मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. सुधाकर मोरे यांच्या नेतृत्वाखाली ’दोन जन्मात अंतर, कुटुंब सुदृढ निरंतर’ या ब्रीदवाक्यासह जिल्हाभर विशेष जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव मोहिमेंतर्गत 11 ते 18 जुलै या कालावधीत कुटुंबनियोजन सप्ताह साजरा केला जात आहे. ग्रामीण व शहरी भागातील पात्र दाम्पत्यांना कुटुंब नियोजनाच्या कायमस्वरूपी व तात्पुरत्या साधनांची माहिती, समुपदेशन आणि मोफत सेवा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
या सप्ताहात विशेष कुटुंब नियोजन शिबिरे, नसबंदी शस्त्रक्रिया शिबिरे, माता बैठका, महिला बचत गट सभा, ग्रामसभा, शालेय विद्यार्थ्यांच्या प्रभातफेर्या, आरोग्य मेळावे आणि समुदायाच्या सहभागातून विविध जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.
आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, 2023-24 मध्ये 16,890 महिला व 728 पुरुष (एकूण 17,618), 2024-25 मध्ये 15,958 महिला व 657 पुरुष (एकूण 16,615), तर 2025-26 मध्ये 13,115 महिला व 466 पुरुष (एकूण 13,581) नसबंदी शस्त्रक्रिया करण्यात आल्या. तीन वर्षांत 45,963 महिला व 1,851 पुरुष, अशा एकूण 47,814 नसबंदी शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडल्या आहेत.
प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे, ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये, जिल्हा रुग्णालय तसेच आयुष्मान आरोग्य मंदिरे येथे कुटुंब नियोजनाच्या सर्व सेवा मोफत उपलब्ध आहेत. आशा स्वयंसेविकांमार्फत पात्र दाम्पत्यांची ठउक 2.0 प्रणालीमध्ये ऑनलाइन नोंदणी करून नियमित पाठपुरावा केला जात आहे. प्रसूतीनंतरच्या कुटुंबनियोजन सेवांवर विशेष भर दिला जात आहे.
महिला नसबंदीच्या तुलनेत पुरुष नसबंदीचे प्रमाण कमी असल्याने पुरुषांनीही कुटुंब नियोजनात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
योग्य वयात विवाह, पहिल्या अपत्याचे नियोजन, दोन अपत्यांमध्ये किमान तीन वर्षांचे अंतर आणि सुरक्षित मातृत्वासाठी शासनाच्या सेवांचा लाभ घेऊन ’छोटे कुटुंब- सुखी कुटुंब’ आणि ’दोन जन्मात अंतर, कुटुंब सुदृढ निरंतर’ हा संदेश प्रत्येक घरापर्यंत पोहोचविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Women play a major role in family planning.