विश्व मराठी संमेलनाने साहित्य-सांस्कृतिक क्षेत्रात घडले चिंतन

नाशिकमध्ये आयोजित चौथ्या विश्व मराठी संमेलनाचे शानदार उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 27) झाले. यावेळी भाषणात मराठी साहित्य किती समृद्ध आहे, या विषयावर त्यांनी विचार मांडले. मराठी साहित्याची फार मोठी परंपरा असून, ती नाशिक जिल्ह्याने जोपासली आहे. त्याच नाशिकमध्ये विश्व मराठी संमेलन होत असल्याने आपल्याकरिता अभिमानाची गोष्ट असल्याचे त्यांनी म्हटले.
कृत्रिम बुद्धिमत्तेने (एआय) जगात अनेक आव्हाने व संधी निर्माण केल्या आहेत. त्यात भाषा सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी या माध्यमाचा उपयोग करून घ्यायचा आहे, असेही त्यांनी सांगितले. व्यासपीठावर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, मंत्री उदय सामंत, छगन भुजबळ, गिरीश महाजन, महापौर हिमगौरी आहेर-आडके आदी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते मराठी भाषा गौरव दिनानिमित्त 2025 चे मानाचे पुरस्कार, तसेच 2024 चे स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. साहित्य, भाषा अभ्यास, प्रकाशन आणि भाषासंवर्धन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या व्यक्ती व संस्थांचा या सोहळ्यात गौरव करण्यात आला. दरम्यान, चार दिवसीय या संमेलनात अनेक परिसंवाद, कविसंमेलन, चर्चासत्र तसेच सांस्कृतिक कार्यक्रम होत आहेत. यामुळे
कुसुमाग्रजनगरीतील साहित्य क्षेत्रातील एकप्रकारे चिंतन व मंथनच घडून आले आहे.
शोभायात्रेने संमेलनाला आली रंगत
विश्व मराठी संमेलनानिमित्त पहिल्या दिवशी अभूतपूर्व शोभायात्रेतील कलाकारांनी लक्ष वेधले. संत गाडगेबाबा, महाबली वीर हनुमान, विठ्ठल-रुक्मिणी, सप्तशृंगी माता यांसह विविध पौराणिक व धार्मिक देखाव्यांसह महापुरुषांच्या वेशभूषा केलेले कलाकार तसेच मयूर नृत्य, आदिवासी नृत्य, तारफावादन, लेझीमपथक यांनी विश्व मराठी संमेलनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या भव्य शोभायात्रा रंगत आणली. मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या विविध शाळा, महाविद्यालयांतील विद्यार्थी, तसेच शहरातील अन्य शाळांतील विद्यार्थीही या शोभायात्रेत सहभागी झाले होते. मराठी भाषा-अभिजात मराठीचा जागर करीत निघालेल्या या शोभायात्रेने नाशिक शहर दुमदुमून गेले होते.
साराभाई अंतराळ प्रदर्शनाला हजारो विद्यार्थ्यांनी दिली भेट
अशोका ग्रुप ऑफ स्कूल्समध्ये इस्रोच्या वतीने आयोजित विक्रम साराभाई अंतराळ प्रदर्शनाला तीन दिवसांत 12 हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी भेट दिली. नाशिकसह जिल्हाभरातील विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनाचा लाभ घेतला. अंतराळ व त्या निगडित क्षेत्रांबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनात सहभागी झालेल्या 47 शैक्षणिक संस्थांपैकी 25 शाळा या जिल्हा परिषद व महापालिकेच्या होत्या. यामुळे अंतराळ विज्ञानाचे शिक्षण तळागाळातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यास मदत झाल्याचे संस्थेतर्फे सांगण्यात आले. या प्रदर्शनात भारताचा अंतराळ प्रवास, उपग्रह आणि आगामी प्रकल्पांबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले संविधान रक्षक पुरस्कार वितरण
कविवर्य नारायण सुर्वे सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने दिला जाणारा क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले संविधान रक्षक पुरस्कार उत्साहात प्रदान करण्यात आला. संविधान मूल्य जपण्यासाठी व सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी योगदान देणार्‍या कांताबाई रमेश अहिरे (छत्रपती संभाजीनगर), शीलाबाई मुरलीधर पवार (छत्रपती संभाजीनगर), माधवी मनोहर जाधव (नाशिक) आणि दर्शना भरत सौपुरे (नाशिक) यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. पुरस्काराचे स्वरूप प्रत्येकी 11 हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह व मानपत्र असे आहे. हा पुरस्कार वितरण समारंभ गंजमाळ येथील रोटरी क्लब सभागृहात झाला. ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे अध्यक्षस्थानी होते.
प्रौढ मित्रमंडळातर्फे पाठांतर स्पर्धेचे पारितोषिक वितरण
प्रौढ मित्रमंडळातर्फे आयोजित पाठांतर आणि चित्रकला स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रमुख पाहुणे प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ प्रा. डॉ. किशोर पवार उपस्थित होते. डॉ. पवार म्हणाले की, यश हे कोणत्याही स्वरूपातील असो, ते यशच असते. या स्पर्धेत 25 शाळांमधील 31 यशस्वी विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. विजेत्यांना भेटवस्तू आणि प्रमाणपत्रे देऊन सन्मानित करण्यात आले. सुरेश कादी यांनी विजेत्यांची नावे घोषित केली. या सोहळ्यात आराध्या शिंदे, अनुवेद कोठावदे, देवांशी लोहोकरे आणि पूर्वा जोशी या विद्यार्थ्यांनी पाठांतराचे प्रात्यक्षिक सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
कामगार कल्याण नाट्य स्पर्धेला प्रारंभ
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या 71 व्या नाट्यमहोत्सवाच्या प्राथमिक
फेरीचे मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन झाले. आश्रित या पहिल्या नाटकातून पालकांच्या मुलांकडून असणार्‍या अपेक्षा व त्यांना मिळणारा प्रतिसाद या विषयावर भाष्य करण्यात आले. परशुराम साईखेडकर नाट्यगृहात 23 मार्चपर्यंत हा महोत्सव सुरू राहील. मेंदूविकारतज्ज्ञ डॉ. संजय वराडे, एसटी महामंडळाचे विभाग नियंत्रक सचिन क्षीरसागर, सुनील चव्हाण, कुणाल घोटेकर, नाट्य परिषदेचे प्रमुख कार्यवाह सुनील ढगे यांची उद्घाटनप्रसंगी उपस्थिती होती. डॉ. वराडे म्हणाले की, नाटकांतून कलावंतांच्या भावना व वास्तव मांडले जाते.
अभिजाततर्फे रंगला नृत्य महोत्सव
प्राचीन भारतीय नृत्यशैलींचा मिलाप असलेले दशावतार, गोदावरीच्या प्रवासावर नृत्यातून भाष्य करणारे युगाचा प्रवाहो चालला यांसारख्या आगळ्या कार्यक्रमांनी अभिजात नृत्य-नाट्य-संगीत अकादमीतर्फे आयोजित दोनदिवसीय नृत्य महोत्सवात रंगत आली. महाकवी कालिदास कलामंदिरात हा महोत्सव झाला. अकादमीच्या संचालिका विद्या देशपांडे व सचिव सुनील देशपांडे यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन झाले. महंत महेश वैष्णव प्रमुख पाहुणे होते. प्रथम सत्रात गुरुजनांना वंदन, सरगम अलंकार, झपताल, कविता सादर करण्यात आल्या. त्यानंतर युगांचा प्रवाहो चालला ही गोदावरी नदीच्या प्रवासावर आधारित नृत्यनाटिका रंगली.
ग्रामीण साहित्य संमेलनात रंगला परिसंवाद
इगतपुरी साहित्य मंडळाच्या वतीने नाशिक शहरात आयोजित 26 व्या ग्रामीण साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानी नाटककार दत्ता पाटील उपस्थित होते. व्यासपीठावर माजी आमदार नानासाहेब बोरस्ते, ज्येष्ठ साहित्यिक पुंजाजी मालुंजकर, अलका दराडे, वैजयंती सिन्नरकर, चंद्रकांत खाडे, सुभाष सबनीस, प्रमोद ठाकरे उपस्थित होते. दत्ता पाटील म्हणाले की, मुळात ग्रामीण व शहरी साहित्य असा दुजाभाव मला मान्य नाही. यावेळी वाचन चळवळ समृद्ध करण्यासाठी कोणते उपाय? यावर परिसंवाद झाला. यात प्रा. राज शेळके, सप्तर्षी माळी, प्रा. हेमंत चोपडे, पुंजाजी मालुंजकर, दत्ता पाटील, अलका दराडे यांनी सहभाग घेतला. त्यानंतर उत्कृष्ट वाङ्मयीन पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. खुल्या काव्यसंमेलनात अनेक मान्यवर कवींनी सहभाग घेत रंगत आणली.
पर्यावरण संवर्धनाबाबत जागरूकता
रोटरॅक्ट क्लब ऑफ नाशिक नाइन हिल्सतर्फे आणि महापालिकेच्या सहकार्याने आयोजित नाशिक ग्रीन रन-2026 ही भव्य धाव स्पर्धा उत्साहपूर्ण, शिस्तबद्ध व पर्यावरणपूरक वातावरणात यशस्वीरीत्या झाली. माझी वसुंधरा अभियानांतर्गत हा उपक्रम आयोजित केला होता. नागरिकांमध्ये निरोगी जीवनशैली, शारीरिक तंदुरुस्ती आणि पर्यावरण संवर्धनाबाबत जागरूकता निर्माण करणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. हा उपक्रम पर्यावरणपूरक नियोजन, प्लास्टिकमुक्त व स्वच्छ हरित सोहळा ठरला.

World Marathi Conference sparked reflection in the field of literature and culture

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *