मराठीचे संवर्धन व्रत बनू दे!

मराठीच्या संस्कृती, परंपरा आणि भाषेचा उत्सव विश्व मराठी संमेलनाच्या निमित्ताने करण्यात आला. मात्र, मराठीचा उत्सव एक दिवसापुरता नको, तर तो कायमस्वरूपी असायला हवा. मराठी भाषिकांनी मराठीचा जास्तीत जास्त वापर करत मराठी टिकेल, रुजेल आणि तिचे संवर्धन होईल यासाठी प्रयत्न करायला हवेत, अन्यथा विश्व मराठी संमेलनात ज्येष्ठ लेखक कोसलाकार भालचंद्र नेमाडे म्हणाले त्याप्रमाणे आपल्याच राज्यात मराठी भाषा अल्पसंख्याक व्हायला उशीर लागणार नाही. प्रत्येक मराठी माणसाने मातृभाषेसाठी तत्पर राहायला हवे, तरच मराठीचा भाषेचा, मराठी संस्कृतीचा खरा सन्मान होईल.

नाशिकनगरीत (कुसुमाग्रजनगरी) भरलेल्या विश्व मराठी संमेलनाने मराठी भाषा, संस्कृती आणि परंपरेचा भव्य उत्सव साकारला आहे. मराठी भाषा दिनाच्या
निमित्ताने झालेल्या या संमेलनामुळे उत्साह द्विगुणित झाला. व्याख्याने, परिसंवाद, पुस्तक प्रदर्शन, सांस्कृतिक कार्यक्रम, संतसाहित्याचा गजर आणि आधुनिक तंत्रज्ञानावरील चर्चा, अशा विविध उपक्रमांतून मराठीचे वैभव अधोरेखित झाले. मात्र, या उत्सवाच्या जल्लोेषात एक मूलभूत प्रश्न पुन्हा समोर येतो, मराठीचा उत्सव वर्षातून एकदाच साजरा करण्याऐवजी मराठीचे जतन करणे, हे आपले दैनंदिन व्रत असायला हवे. मराठी ही केवळ संवादाची भाषा नाही, ती संस्कारांची, इतिहासाची आणि ओळखीची भाषा आहे. अनेक शतकांची परंपरा लाभलेल्या या भाषेने संतसाहित्य, शाहिरी परंपरा, सामाजिक सुधारणांचा विचार आणि आधुनिक साहित्याचा प्रवाह घडवला. वर्षभरापूर्वीच मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने प्रत्येक मराठी माणसासाठी ती अभिमानाची बाब आहे. हा दर्जा केवळ सन्मानच नाही, तर जबाबदारीही आहे. भाषेचे संवर्धन, संशोधन आणि अभ्यासासाठी नवे दालन खुले झाले आहे. पण केवळ सरकारी मान्यता पुरेशी नाही, समाजाचा सक्रिय सहभाग तितकाच आवश्यक आहे, हेही तितकेच खरे!
आजच्या जागतिकीकरणाच्या काळात इंग्रजीचा प्रभाव सर्वत्र वाढत आहे. शिक्षण, उद्योग, तंत्रज्ञान, प्रशासन या सर्व क्षेत्रांत इंग्रजीचे वर्चस्व दिसते. यातून मराठीचा वापर कमी होत चालल्याची खंत व्यक्त होते. शहरांमध्ये मराठी शाळांची संख्या घटत आहे. पालक इंग्रजी माध्यमाकडे वळत आहेत, तर दैनंदिन व्यवहारातही मराठीऐवजी इंग्रजी किंवा मिश्र भाषा वापरण्याची प्रवृत्ती वाढते आहे. या वास्तवाकडे डोळसपणे पाहणे गरजेचे आहे. भालचंद्र नेमाडे यांनी व्यक्त केलेली चिंता निश्चितच विचार करायला लावणारी आहे. आपल्याच राज्यात मराठी भाषा अल्पसंख्याक होऊ नये, यासाठी सजग राहावे लागेल. ही केवळ भावनिक प्रतिक्रिया नाही, ती सामाजिक संकेत आहे. भाषा टिकते ती तिच्या वापरातून. आपण घरात, बाजारात, कार्यालयात, सामाजिक माध्यमांवर मराठीचा वापर वाढवला तरच ती बळकट राहील.
संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून मराठीच्या संवर्धनाचा मानस व्यक्त केला. डिजिटल युगात भाषेचे जतन करण्यासाठी तंत्रज्ञानाचा उपयोग अपरिहार्य आहे. ई-पुस्तके, ऑडिओ बुक्स, भाषांतर साधने, मराठीतील एआय मॉडेल्स, डिजिटल शब्दकोश या सर्व माध्यमांतून मराठी अधिक व्यापक पातळीवर पोहोचू शकते. मात्र, तंत्रज्ञान हे साधन आहे. त्यामागे भाषाप्रेमी मनाची बांधिलकी असावी लागते. मराठीच्या संवर्धनासाठी शासनस्तरावर विविध योजना राबवल्या जात आहेत; परंतु भाषेचे खरे रक्षण हे समाजाच्या सहभागातूनच घडते. पालकांनी मुलांशी मराठीत संवाद साधणे, शाळांनी मराठी वाचनसंस्कृती वाढवणे, लेखक-प्रकाशकांनी दर्जेदार साहित्यनिर्मिती करणे, माध्यमांनी मराठीचा सन्मान राखणे, या सर्वांचा एकत्रित परिणामच भाषेचे
भविष्य ठरवतो.
वाचनसंस्कृती हा भाषा टिकण्याचा महत्त्वाचा आधार आहे. संमेलनात पुस्तक प्रदर्शनाला मिळणारा प्रतिसाद उत्साहवर्धक असला, तरी तो सातत्याने वाढायला हवा. मराठी साहित्य, विज्ञानलेखन, चरित्रग्रंथ, बालसाहित्य, संशोधनपर लेखन यांचा विस्तार झाला पाहिजे. मराठीतील नव्या तांत्रिक शब्दांची निर्मिती, संशोधनाची परंपरा आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर संवाद साधण्याची क्षमता वाढवणे आवश्यक आहे. मराठी ही समृद्ध, लवचिक आणि समावेशक भाषा आहे. तिने काळानुसार बदल स्वीकारले, नव्या शब्दांना स्थान दिले आणि विविध संस्कृतींचे घटक आत्मसात केले. त्यामुळे तिच्या भवितव्याबद्दल निराश होण्याचे कारण नाही; परंतु मराठी संस्कृती व मातृभाषा वापराकडे दुर्लक्ष केल्यास त्याचे दूरगामी परिणाम होतील, हे निश्चित. विश्व मराठी संमेलनाने मराठीचा अभिमान जागवला आहे. पण, हा अभिमान केवळ घोषणांपुरता मर्यादित राहू नये. प्रत्येक मराठी माणसाने मातृभाषेसाठी जागृत राहून तिचा जाणीवपूर्वक वापर केला तरच मराठीचा खरा सन्मान होईल. मराठीचा जयघोष सभागृहापुरता न राहता तो घराघरांत, मनामनांत आणि व्यवहारात रुजला तरच मराठीचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत अभिमानाने पोहोचेल.

Let the preservation of Marathi become a vow!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *