पारंपरिक उत्साह : महिलांकडून रील्स, शूटचा ट्रेंड
नाशिक : प्रतिनिधी
शहरासह जिल्हाभरात वटपौर्णिमा सोमवारी (दि. 29) पारंपरिक उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरी झाली. पतीला दीर्घायुष्य लाभावे, अखंड सौभाग्य प्राप्त व्हावे आणि सात जन्म हाच पती मिळावा, या श्रद्धेने सुवासिनींनी वटवृक्षाची मनोभावे पूजा करून व्रताचे पालन केले. पहाटेपासूनच शहरातील मंदिर परिसर, सार्वजनिक ठिकाणे व वटवृक्ष असलेल्या भागांत महिलांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.
महिलांनी पारंपरिक साड्या, नथ, हिरवा चुडा, मंगळसूत्र आणि इतर सौभाग्य अलंकार परिधान करून वटवृक्षाला हळद-कुंकू, फुले, अक्षता, वाण आणि पाणी अर्पण केले. त्यानंतर वडाभोवती प्रदक्षिणा घालत पतीच्या दीर्घायुष्यासाठी, कुटुंबाच्या सुख-समृद्धी व अखंड सौभाग्याची प्रार्थना केली. गंगापूर रोड, कॉलेज रोड, पंचवटी, सिडको, सातपूर, इंदिरानगर, अशोक स्तंभ, नाशिकरोड आदी भागांतील वटवृक्षांजवळ महिलांची वर्दळ होती. यंदा अनेक महिला नोकरी व इतर कारणांमुळे प्रत्यक्ष वटवृक्षापर्यंत येऊ शकल्या नाहीत, त्यांनी घरीच वडाच्या फांदीची पूजा केली.
पूजेला पतींचीही हजेरी
यंदा वटपौर्णिमेला अनेक ठिकाणी महिलांसोबत त्यांच्या पतींचीही उपस्थिती लक्षवेधी ठरली. पत्नी वटवृक्षाची पूजा करत असताना अनेक पती त्यांच्यासोबत उभे राहून पूजेचे साहित्य देणे, मोबाइलवर छायाचित्रे व व्हिडिओ,े तसेच पूजेनंतर एकत्र फोटो काढण्यात व्यस्त असल्याचे चित्र दिसले. काही ठिकाणी पती-पत्नींनी पूजेनंतर सेल्फी आणि रील्स तयार करून सोशल मीडियावर शेअर केल्याने पारंपरिक विधींसह आधुनिकतेची झलकही अनुभवायला मिळाली.
पूजेचे शूटिंग करण्याचा ट्रेंड
यंदा वटपौर्णिमेला पारंपरिक पूजेसोबत पूजेचे शूटिंग करण्याचा ट्रेंड विशेष पाहायला मिळाला. अनेक महिलांनी वटवृक्षाची पूजा, प्रदक्षिणा आणि धार्मिक विधींचे मोबाइलवर चित्रीकरण करत रील्स, शॉर्ट व्हिडिओ आणि छायाचित्रे तयार केली. काही ठिकाणी पूजेनंतर खास कॅमेर्यासमोर उभे राहून विविध पोझमध्ये छायाचित्रण व व्हिडिओ शूट करण्यात आले. त्यानंतर हे व्हिडिओ इन्स्टाग्राम, फेसबुक आणि व्हॉट्सअॅप स्टेटसवर शेअर करण्यात आले. पारंपरिक श्रद्धेसोबत आधुनिक सोशल मीडियाचा वापर करण्याची बदलती जीवनशैली यंदा ठळकपणे दिसली.
Worship of the banyan tree for the husband’s longevity.