ये तो सिर्फ ट्रेलर हैं!

– अश्विनी पांडे

पुढील वर्षी सर्वांत मोठ्या धार्मिक सोहळ्यांपैकी एक असलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याचे आयोजन नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे होणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून हजारो कोटी रुपयांची विकासकामे सुरू आहेत. सिंहस्थाचे बजेट वाढता वाढता वाढे याप्रमाणे अजून वाढणारच आहे. सिंहस्थाच्या तयारीला वेग आलेला असतानाच, निसर्गाने दिलेला इशारा दुर्लक्षून चालणार नाही. पहिल्याच पावसाने नाशिक शहरातील दैनावस्था उघड झाली. नाशिककरांसाठी हा केवळ ट्रेलर होता. अजून पावसाची दोन महिने बाकी आहेत. त्यामुळे अजून काय काय पहावे लागेल. याचे उत्तर आगामी काळातच मिळणार आहे.

सलग दोन दिवस झालेल्या अतिवृष्टीने नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत केले. अवघ्या 48 तासांत तब्बल नाशिक शहरात 249 मिमी पावसाची नोंद झाली. विशेष म्हणजे, गंगापूर धरणातून एक थेंबही पाण्याचा विसर्ग न करता गोदावरी नदीला पूरस्थिती निर्माण झाली. ही घटना केवळ मुसळधार पावसाचा परिणाम नसून, शहराच्या जलनिस्सारण व्यवस्थेतील त्रुटी, अनियोजित शहरीकरण आणि पूर व्यवस्थापनातील कमतरतेचे वास्तव समोर आणणारी ठरली. नाशिक शहरातील अनेक भाग पाण्याखाली गेले. सखल वस्त्यांमध्ये पाणी शिरले, रस्ते बंद झाले, वाहतूक ठप्प झाली आणि पाऊस थांबल्यानंतर शहरभर चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले. व्यापार्‍यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले, नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आणि महापालिका तसेच प्रशासनाला परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मोठी कसरत करावी लागली.
मात्र, परिस्थिती सर्वाधिक गंभीर होती ती त्र्यंबकेश्वरमध्ये. डोंगररांगांमधून मोठ्या वेगाने आलेल्या पाण्यामुळे मुख्य बाजारपेठ, कुशावर्त परिसर आणि अनेक रस्ते जलमय झाले. विशेष म्हणजे, सिंहस्थसाठी उभारण्यात आलेले आणि विकसित करण्यात आलेले घाटही पाण्याखाली गेले. सिंहस्थासाठी उभारण्यात येणार्‍या पायाभूत सुविधांची ही पहिली मोठी परीक्षा होती. घाट पाण्याखाली गेल्याने त्यांच्या रचनेची, उंचीची, सुरक्षिततेची आणि पूरस्थितीतील वापरक्षमतेची फेरतपासणी करण्याची गरज अधोरेखित झाली आहे.
सध्या घाटांचे सुशोभीकरण आणि विकासकामे सुरू आहेत; मात्र त्या घाटांची पूरसहनक्षमता किती आहे, याचा अभ्यास तितक्याच गांभीर्याने होणे आवश्यक आहे. नदीची पाणीपातळी वाढल्यास घाट किती वेळात पाण्याखाली जातील, भाविकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी पर्यायी मार्ग कोणते असतील, आपत्कालीन परिस्थितीत गर्दीचे व्यवस्थापन कसे करायचे, याचे नियोजन तयार करावे लागेल. याच पार्श्वभूमीवर पुढील वर्षी होणारा सिंहस्थ कुंभमेळा अधिक महत्त्वपूर्ण आहे. 2 ऑगस्ट 2027 रोजी प्रथम शाही स्नान त्यानंतर 31 ऑगस्ट 2027 रोजी द्वितीय शाही स्नान, तर 12 सप्टेंबर 2027 रोजी तृतीय शाही स्नान होणार आहे. या प्रत्येक पर्वणीला लाखो भाविक उपस्थित राहतील. अशा वेळी अतिवृष्टी झाली आणि गंगापूर धरणातून विसर्ग करावा लागला तर परिस्थिती किती गंभीर होऊ शकते, याचा अंदाज यंदाच्या पावसाने दिला आहे.
गेल्या काही वर्षांत नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणावर काँक्रिटीकरण झाले. नैसर्गिक नाले अरुंद झाले, काही ठिकाणी अतिक्रमणे झाली आणि पावसाच्या पाण्याचा निचरा करणारी व्यवस्था अपुरी पडली. परिणामी, अल्पावधीत झालेल्या मुसळधार पावसानेही शहर जलमय झाले. हवामान बदलामुळे अतिवृष्टीच्या घटनांची तीव्रता वाढत असताना, पारंपरिक नियोजन आता पुरेसे ठरणार नाही.
सिंहस्थासाठी हजारो कोटी रुपयांची विकासकामे सुरू आहेत. मात्र, या कामांची खरी परीक्षा अशाच मुसळधार पावसात होणार आहे. विकासकामे पूरपाण्यात टिकली, घाट सुरक्षित राहिले, भाविकांचे संरक्षण झाले आणि प्रशासनाने परिस्थिती प्रभावीपणे हाताळली तरच या कामांचे खरे यश मानले जाईल.
दरम्यान, यंदाच्या अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा सखोल अभ्यास करून त्याआधारे सिंहस्थासाठी आवश्यक नियोजन करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगितले जात आहे. मात्र, केवळ नियोजनाची घोषणा करून चालणार नाही, ते प्रत्यक्षात सक्षम आणि प्रभावी असणे तितकेच आवश्यक आहे. पूरस्थिती, गंगापूर धरणाचा संभाव्य विसर्ग, भाविकांची प्रचंड गर्दी, वाहतूक व्यवस्था, आपत्कालीन बचावकार्य, आरोग्य सेवा आणि सुरक्षित स्थलांतर या सर्व बाबींचा सखोल विचार करून कृती आराखडा तयार करावा लागेल. त्यासाठी प्रत्यक्ष मॉकड्रिल, पूरपूर्व इशारा प्रणाली, हवामान विभागाशी रिअल-टाइम समन्वय, एनडीआरएफ-एसडीआरएफची पूर्वतयारी आणि पर्यायी वाहतूक मार्ग यांचे नियोजनही तितकेच महत्त्वाचे आहे. यंदाची अतिवृष्टी ही केवळ हवामानाची घटना नव्हती, तर सिंहस्थपूर्वी निसर्गाने दिलेली पूर्वसूचना होती. हा इशारा गांभीर्याने घेतला तर सिंहस्थ सुरक्षित, सुयोजित आणि आदर्श ठरू शकतो. मात्र, या अनुभवाकडे दुर्लक्ष झाले किंवा नियोजनात त्रुटी राहिल्या तर भविष्यात मोठी दुर्घटना किंवा अप्रिय प्रसंग घडण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे विकासकामांइतकेच महत्त्व पूर व्यवस्थापन, आपत्ती नियोजन आणि भाविकांच्या सुरक्षिततेला देणे हीच खरी गरज आहे.

Yeh To Sirp Trailer Hain!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *