पंडित जवाहरलाल नेहरू, स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान. आपल्या सर्वांनाच सुपरिचित आहेत. त्यांना कौतुकाने चाचा नेहरू म्हणत असे. त्या काळातले एक उमदे नेतृत्व. केवळ भारतीयच नव्हे तर जागतिक पातळीवर प्रभावी नेता म्हणून त्यांच्याकडे बघितले जायचे. त्यांचे विचार, दूरदृष्टी आणि कार्यशैली त्यांना तत्कालीन नेत्यांपासून वेगळेपण बहाल करते. मागील दहाएक वर्षांपासून त्यांच्याबद्दल बदनामीकारक वक्तव्य करणे, ही एक फॅशन झाली आहे. काहींना त्यात धन्यता वाटते, विशेषतः सत्ताधारी लोक तर त्यांच्याबद्दल बोलण्याची एकही संधी सोडत नाही. आजवर देशात जे काही झाले आहे, जे काही होत आहे आणि भविष्यातही जे काही होणार आहे, ते पंडित नेहरूंमुळेच झाले आहे, होत आहे आणि होणार आहे, असे छाती बडवत बडवत सांगितले जाते. बरोबर आहे, सर्वच गोष्टींसाठी नेहरू जबाबदार आहेत. आज त्यांच्या 136 व्या जयंतीनिमित्त त्यांच्याबद्दल जे काही चालले आहे, त्यावर एक नजर टाकूया, असे वाटले म्हणून हा लेख.
खरं तर नेहरू आणि गांधी घराण्याची परंपराच वेगळी आहे. त्यात त्याग, संघर्ष, बलिदान, देशप्रेम, देशसेवा कुटून कुटून भरलेली आहे. आजच्या काळातील एकही नेत्याला त्याची सर नाही. जीवनाचा दहा वर्षांचा काळ जेलमध्ये काढला. त्यांची आई इंग्रजांच्या लाठी हल्ल्यात जखमी होऊन शहीद झाल्या होत्या. वडील त्या काळातील एक प्रतिष्ठित आणि यशस्वी वकील, राजेशाही थाट आणि नेहरूंचे परदेशात झालेले शिक्षण बघता त्यांच्यापुढे अनेक चांगले पर्याय असताना स्वातंत्र्यलढ्यात अग्रेसर राहण्याचा निर्णय घेणे सोपे नव्हते.
सत्तेत असताना त्यांनी
स्वतःच्या मुलीला राजकीय पद किंवा सत्तेत सामील केले नाही. हेच संस्कार पुढे तसेच सुरू राहिल्याने इंदिरा गांधींच्या काळात संजय गांधी किंवा राजीव गांधी कधी मंत्री झाले नाही. इंदिराजींच्या हत्येनंतर राजीव गांधी पंतप्रधान झाले जरूर, परंतु त्यांच्या हत्येनंतर सोनिया गांधी पंतप्रधान बनू शकल्या असत्या, पण नाही झाल्या. 1991 आणि 2004 अशा दोनदा संधी असूनही त्यांनी पंतप्रधानपद स्वीकारले नाही. ही त्यागाची आणि बलिदानाची परंपरा असलेला दुसरा परिवार शोधून सापडणार नाही. बोलणार्यांना बोलायला खूप सोप्पं असतं, करताना फाटते.
दुसरी बाब म्हणजे, त्यांची तुलना नेहमी सरदार वल्लभभाई पटेलांशी करण्यात येते. त्यांनी पटेल आणि त्यांच्या कुटुंबीयांवर कसा अन्याय केला हेदेखील आवर्जून सांगितले जाते. असा खोटा प्रचार करून पटेल कसे आमचे होते आणि आम्हाला त्यांचा किती पुळका आहे, हे सिद्ध करण्याचा केविलवाणा प्रयत्न होताना आपण बघतोय. वास्तव असे आहे की, गांधीजींच्या हत्येनंतर संघावर कायमस्वरूपी बंदी आणण्यावर पटेल ठाम होते. केवळ नेहरूंच्या मानवतावादी आणि समतावादी विचारांमुळे ही बंदी टाळली, हे रेकॉर्डवर आहे. खरंच, नेहरूंनी चूकच केली म्हणायला हरकत नाही, कारण त्यांनी ज्यांना तारले, त्यांनीच आज बदनामी चालवली आहे. पंतप्रधानपदाच्या निवडणुकीत जरी पटेलांना अधिक पसंती होती, परंतु प्रमुख नेत्यांच्या विचारविनिमयांतून नेहरूंच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. पटेलांचे वय, प्रकृती आणि नेतृत्वगुण बघता त्यांना गृह खाते देण्यात आले. त्यावेळी असे मतदान वगैरे काही झाले नाही. कारण 1950 मध्ये पटेल गेले आणि 1952 मध्ये पहिल्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या होत्या. पटेल गेल्यानंतर त्यांची कन्या मणिबेन पटेल 1952 आणि 1957 च्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या तिकिटावर खासदार म्हणून निवडून आल्या. 1962 मध्ये दुर्दैवाने त्या पराभूत झाल्यानंतरदेखील नेहरूंनी त्यांना 1964 मध्ये राज्यसभेवर खासदार केले. त्यामुळे नेहरूंनी पटेलांच्या कुटुंबीयांवर अन्याय केला हा अगदी खोटा प्रचार आहे.पटेलांची मणिबेन यांच्याकडे
स्वतःची इच्छा व्यक्त केली होती की, माझ्या मृत्यूनंतर माझे कुठलेही स्मारक बांधू नये. म्हणून आजवर त्यांचे स्मारक कुठे नव्हते. परंतु, सध्याच्या सत्ताधारी पक्षाला चोरीची सवय पहिल्यापासूनच असावी म्हणून त्यांनी काँग्रेसचे नेतेसुद्धा चोरले. सुरुवातीला गांधी गांधी केले, मध्ये पटेल पटेल केले, नंतर नेताजी, टागोर, असे अनेक नेत्यांवर अधिकार गाजवला. महाराष्ट्रातदेखील त्यांनी शिवाजी महाराज चोरले, अन्यथा त्यांना महाराजांबद्दल फारशी आत्मीयता नाही. त्यांच्या छाव्याला किती बदनाम केले हे काही वेगळे सांगायला नको. नेहरू आणि सध्याच्या नेतृत्वात खूप मोठा फरक आहे. नेहरूंवर कुठल्याही बाबा, बुवा, मांत्रिक तांत्रिकाचे संस्कार नव्हते. ते धार्मिक होते, परंतु विचार धर्मनिरपेक्षवादी होते. त्यांच्या विचारांत वैज्ञानिक दृष्टिकोन होता. त्यांची विकासाची परिभाषा शास्त्राधारित होती. जेलमध्ये असताना पुस्तकं लिहिली, लेख लिहिले. लोकांना आपल्या विचारांनी प्रेरित केले. जे टीका करतात त्यांना लिहिणे तर दूरच, नेहरूंनी लिहिलेले कळणेसुद्धा जमणार नाही, अशी अवस्था आहे. त्यांची चर्चा आणि विचारविनिमय करणार्या लोकांमध्ये शास्त्रज्ञ, विचारवंत, तत्त्वज्ञानी, कलाकार, जागतिक पातळीवरील नेते होते. आइन्स्टाइन, होमी भाभा, सी.व्ही. रमण, केनेडी, आयजेन्होवर, चर्चिल यांच्या विचारांनी प्रभावित नेहरू यांना काय ते कळणार?
त्यांनी देश ज्या अवस्थेत हाती घेतला, सांभाळला, उभा केला आणि चालवला, ते कुण्या ऐर्यागैर्याचे काम नक्कीच नव्हते. दरिद्य्र, भूकमारी, बेरोजगारी, दंगे चहुदिशा पसरलेली. न शेती, न उद्योग, न कुठले संसाधने. तिथून देश पुढे आणण्यास हिम्मत लागते. सत्ता स्थापन झाली तेव्हा गांधी, पटेल यांच्यासारखे खंदे नेते हरपले होते. पुढील चार वर्षांत बाबासाहेबदेखील गेले. तरी, हिम्मत न हारता, भक्कमपणे देश चालवला. देशात धरणे, कालवे बांधून जमीन सिंचनाखाली आणली. कारखाने, उद्योग निर्मिती करून रोजगार उपलब्ध केले. स्टील, खादी उद्योगाला चालना दिली. शिक्षण आणि विज्ञान क्षेत्रात एम्स, आयआयटी, आयआयएम, इस्त्रो, केंद्रीय विद्यालये, विविध कॉलेजेस, विद्यापीठं आणि बरेच काही केले. आज तुम्ही आणि तुमची मुलं जे काही आहात, त्यात नेहरूंचे योगदान नाकारता येण्यासारखे नाही. देशातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवरदेखील नेहरूंचा प्रभाव होता. थर्ड वर्ल्ड कंट्रीज (विकसनशील देश)चे नवे, उमदा आणि प्रभावी नेता म्हणून त्यांच्याकडे बघितले जायचे.
सर्वपक्षीयांकडून जड अंतःकरणाने श्रद्धांजली; कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला नाशिक ः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख…
टेंडर सेलकडून कार्यवाही होईना... नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिका शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी…
बांगलादेशने दुराग्रही भूमिका घेऊन भारतात होणार्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशचा हा…
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन वेदनादायी आहे. राज्याचे सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून व दीर्घकाळ…
महाराष्ट्रात ज्यांना जाणता राजा म्हटले जाते, त्या शरद पवारांच्या सावलीत वाढलेले एक बोलके, दिलखुलास राजकीय…
सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील मीठसागरे शिवारात बुधवारी (दि. 28) सकाळी चार वर्षे वयाची बिबट्याची मादी…