सहा लाखांच्या लाभाचे आमिष दाखवून तरुणाची लूट

मित्रानेच रचला बनाव; आठ जणांविरुद्ध गुन्हा

दिंडोरी : प्रतिनिधी
पैशांचे प्रलोभन दाखवून शालेय मित्रानेच केलेल्या विश्वासाघातातून एका व्यावसायिकाला लुटल्याची खळबळजनक घटना वणी-फोफशी रस्त्यावर घडली. एक लाखाचे सहा लाख रुपये करून देण्याचे सांगून बोलावून घेतल्यानंतर चाकूचा धाक दाखवून मारहाण करत 3 लाख 87 हजार रुपयांचा मुद्देमाल लुटण्यात आला. याप्रकरणी वणी पोलिसांत आठ जणांच्या टोळीविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
कल्याण पूर्व (जि. ठाणे) येथील रहिवासी व पेस्ट कंट्रोल व्यावसायिक जेकब निकलस फर्नांडिस (39) यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे. फिर्यादी फर्नांडिस यांचा शालेय मित्र विजय आहेर याने त्यांना पैशांचे आमिष दाखवून वणी येथे बोलावले होते. 9 ऑक्टोबरला दुपारी तीन ते चारच्या दरम्यान, वणी ते फोफशी जाणार्‍या रस्त्यावरील एका निर्जनस्थळी संशयित विजय आहेर, संदीप शिंदे, प्रदीप गावित व त्यांच्या इतर पाच अनोळखी साथीदारांनी फर्नांडिस यांना गाठले. आरोपींनी त्यांना चाकूचा धाक दाखवून मारहाण केली आणि नंबरप्लेट नसलेल्या पांढर्‍या रंगाच्या तवेरा गाडीत बळजबरीने बसवले. गाडीतही त्यांना मारहाण सुरूच ठेवत त्यांच्याजवळील 2 लाख रुपये रोख, 1 लाख 50 हजार रुपयांचा आयफोन 15 प्रो मॅक्स, 35 हजार रुपयांचा वनप्लस मोबाइल, विविध बँकांचे आठ क्रेडिट कार्ड, चार डेबिट कार्ड आणि लॅपटॉप बॅग असा एकूण 3 लाख 87 हजार रुपयांचा मुद्देमाल बळकावून आरोपींनी पोबारा केला. या गंभीर घटनेप्रकरणी 11 ऑक्टोबर रोजी वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, फरार संशयितांचा शोध पोलीस यंत्रणेकडून घेतला जात आहे.

Young man swindled with the lure of a six-lakh-rupee benefit.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *