कामगारनगरमध्ये पोत्यात आढळला तरुणाचा मृतदेह

सिडको : प्रतिनिधी
सातपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महात्मानगर परिसरात असलेल्या कामगारनगरातील एका इमारतीच्या टेरेसवर पोत्यामध्ये भरलेला एका 25 वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने रविवारी रात्री परिसरात एकच खळबळ उडाली. प्राथमिक तपासात हत्या करून मृतदेह पोत्यात भरून टेरेसवर ठेवण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात असून, पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
कामगारनगर परिसरातील काही नागरिकांना रविवारी सायंकाळपासून तीव्र दुर्गंधी येत होती. सुरुवातीला दुर्गंधीचा उगम नेमका कुठून होत आहे हे समजू शकले नाही. मात्र, नागरिकांनी शोध घेतल्यानंतर एका इमारतीच्या टेरेसवर ठेवलेल्या पोत्यातून दुर्गंधी येत असल्याचे लक्षात आले. पोते उघडून पाहिल्यानंतर त्यामध्ये एका 25 वर्षीय तरुणाचा मृतदेह असल्याचे दिसून आले. यानंतर नागरिकांनी तातडीने सातपूर पोलिसांना
माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिसराची पाहणी करून मृतदेह ताब्यात घेतला आणि पुढील तपास सुरू केला. मृतदेह काही दिवसांपूर्वीच तेथे ठेवण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, याच परिसरातील एक तरुण गेल्या तीन दिवसांपासून बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आढळलेला मृतदेह त्या बेपत्ता तरुणाचा आहे की अन्य कोणाचा, याबाबत पोलिसांकडून ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला असून, त्याचा अहवाल आल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू केली असून, त्याआधारे संशयित म्हणून तीन ते चार जणांना ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली आहे. हत्येमागील कारण, मृताची ओळख व आरोपींची भूमिका याबाबत तपास सुरू आहे.

Young man’s body found in a sack in Kamgarnagar.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *