अमली पदार्थांच्या नेटवर्कमुळे तरुणाई दिशाहीन होण्याच्या मार्गावर

नशेच्या साम्राज्यातील खरे आका समोर येण्याची गरज

सटाणा : तालुका प्रतिनिधी
शहरासह तालुक्यात वाढत असलेल्या अमली पदार्थांच्या नेटवर्कमुळे तरुणाई दिशाहीन होण्याची चिन्हे असून, यामुळे कौटुंबिक पातळीवर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रामुख्याने युवकवर्ग गेल्या काही दिवसांपासून अमली पदार्थांच्या विळख्यात सापडत असल्याची गंभीर बाब समोर येत आहे.
सटाणा पोलिसांनी नुकतेच शहरातील काही युवकांना ताब्यात घेऊन चौकशी केली असली तरी, या नशेच्या साम्राज्यातील खरे आका समोर येण्याची गरज निर्माण झाली आहे. नशिल्या पदार्थांबरोबर सर्वसामान्यांमध्ये दबक्या आवाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून शहरासह परिसरात गांजा, एमडी, ब्राउन शुगरसारख्या अमली पदार्थांची उपलब्धता वाढल्याची चर्चा आहे. विशेषतः कॉलेजचे विद्यार्थी, बेरोजगार युवक आणि काही अल्पवयीन मुलांपर्यंत अमली पदार्थ पोहोचत असल्याचे बोलले जात आहे. अमली पदार्थांच्या पुरवठ्यामागे काही तरुण माध्यम म्हणून वापरले जात असल्याची शक्यता आहे. दरम्यान, पोलिसांनी शहरातील काही युवकांना ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर पडद्यामागचे सूत्रधार कोण? असा प्रश्न उपस्थित होत असून, मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे. यासंदर्भात सटाणा पोलीस सूत्रांशी संपर्क साधला असता, पोलिसांच्या वतीने तपास सुरू असून, तपासात आढळलेली बाटली प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले. सविस्तर माहितीबाबत पोलिसांच्या असलेल्या मौनामुळे संभ्रम निर्माण झाला आहे.
अमली पदार्थांच्या विळख्यात अडकणारा युवकवर्ग सटाण्यासाठी धोक्याची घंटा मानली जात असून, पालकवर्गात भीती व चिंतेचे वातावरण आहे. पालकांनीदेखील जबाबदारीने आपल्या मुलांवर लक्ष ठेवण्याची गरज व्यक्त होत आहे. केवळ पोलिस कारवाई पुरेशी नसून, समाज, शाळा-महाविद्यालये, सामाजिक संस्था यांनी एकत्र येऊन जनजागृती करणे अत्यावश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे. प्रशासनाने ठोस पावले उचलण्याची गरज असून, या पार्श्वभूमीवर अमली पदार्थविरोधी विशेष मोहीम, गुप्त माहिती यंत्रणा मजबूत करणे, सीसीटीव्हीचा वापर आणि समुपदेशन शिबिरांचे आयोजन करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. अन्यथा सटाण्यातील भावी पिढीचे भविष्य अंधाराकडे जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *