नाशिक : प्रतिनिधी
येवल्याजवळील चिंचोडी एमआयडीसीमध्ये डोक्यात गोळ्या घालून खून झालेल्या झरीफ बाबाच्या मृत्यूनंतर त्याने जमविलेल्या कोटयवधींच्या मालमत्ता आणि उंची राहणीमान व महागड्या कारबाबत आता वेगवेगळ्या चर्चा झडत आहेत.
अफगाणीस्तानातून भारतात निर्वासित म्हणून आलेल्या अहमद झरीफ चिस्ती याचे सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स आहेत. अवघ्या चार वर्षातच त्याने कोट्यवधींची माया जमविली. एक्सयूव्ही-500, फॉर्च्युनर यासारख्या महागड्या गाड्या बाबाच्या दिमतीला होत्या. शिवाय वावीजवळ ज्या बंगल्यात तो राहत तेथे त्याच्यासोबत असलेली महिला ही त्याची तिसरी पत्नी असल्याचे सांगितले जात आहे.. विशिष्ट ठेवणीचा त्याचा पोषाख, उंची राहणीमान आणि यूट्यूबच्या माध्यमातून त्याचे सुरू असलेले पूजा विधी सांगण्याचे काम यामुळे हा बाबा चर्चेत आला. निर्वासित असल्याने त्याला भारतात स्वत:च्या नावावर मालमत्ता घेणे शक्य नव्हते. त्यामुळे त्याने सहकार्यांच्या नावावर मालमत्ता खरेदी करण्याबरोबरच उंची वाहनेही इतरांच्या नावावर खरेदी केलेली होती. या संपत्तीनेच बाबाचा घात केला. चिंचोडी शिवारात बाबाच्या गाडीवर चालक असलेल्या व्यक्तीनेच गोळ्या घालून हत्या केल्याचे उघड झाले आहे. निर्वासित म्हणून आलेल्या या बाबाने अल्पावधीतच कोटयवधी रुपयांची माया जमविली होती. त्याने येवला, सायाळे भागात जमिनी, प्लॉटही घेतलेले आहेत. या संपत्तीमुळेच बाबाचा खून झाल्याचे उघड झाले आहे. पोलीस अजून या प्रकरणातील बारकावे शोधत आहेत.