आता एनसीआरटीच्या धर्तीवर अभ्यासक्रम
नाशिक : प्रतिनिधी
जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांना सीबीएसईच्या धर्तीवर दर्जेदार शिक्षण देण्यासाठी प्रस्तावित करण्यात आलेला सीबीएसई पॅटर्नचा उपक्रम अखेर रद्द करण्यात आला आहे.
राज्य शिक्षण मंडळाचा सुधारित अभ्यासक्रम एनसीआरटीच्या धर्तीवर तयार झाल्याने स्टेट बोर्ड आणि सीबीएसईमधील अभ्यासक्रमाचे अंतर कमी झाले आहे. तसेच जिल्हा परिषद शाळांमध्येच स्टेट बोर्ड आणि मसीबीएसईफ असा अंतर्गत भेद निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन शिक्षण विभागाने हा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा व प्रवेश परीक्षांसाठी अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने काही निवडक शाळांमध्ये सीबीएसई पॅटर्न लागू करण्याचा प्रस्ताव मांडला होता. त्यानुसार प्रत्येक तालुक्यातील दोन ते तीन शाळांची निवड करून त्यांना विशेष शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्याची तयारी सुरू होती. यासाठी गटशिक्षणाधिकार्यांकडून शाळांची नावेही मागविण्यात आली होती. मात्र, निवड प्रक्रिया अंतिम टप्प्यात असतानाच हा प्रस्ताव स्थगित करून अखेर रद्द करण्यात आला. राज्य शासनाने अलीकडेच राज्य शिक्षण मंडळाचा अभ्यासक्रम एनसीआरटीच्या धर्तीवर अद्ययावत केल्यामुळे राज्य बोर्ड आणि सीबीएसई अभ्यासक्रमातील अंतर मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना अधिक दर्जेदार आणि कठीण पातळीचा अभ्यासक्रम राज्य मंडळातूनच उपलब्ध होत असल्याने स्वतंत्र सीबीएसई पॅटर्न राबविण्याची आवश्यकता नसल्याचे मत शिक्षण विभागाने व्यक्त केले.
सध्या नाशिक जिल्हा परिषदेच्या 4,238 शाळांमध्ये सुमारे 4 लाख 66 हजार विद्यार्थी राज्य मंडळाच्या अभ्यासक्रमानुसार शिक्षण घेत आहेत. अशा परिस्थितीत काही मोजक्याच शाळांमध्ये सीबीएसई पॅटर्न लागू केल्यास जिल्हा परिषद शाळांमध्येच स्टेट बोर्ड आणि सीबीएसई असा अंतर्गत भेद निर्माण होण्याची शक्यता असल्याचेही प्रशासनाच्या निदर्शनास आले.
याच पार्श्वभूमीवर सर्व विद्यार्थ्यांना समान दर्जाचे शिक्षण उपलब्ध करून देण्याच्या भूमिकेतून सीबीएसई पॅटर्नचा प्रस्ताव रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे शिक्षण विभागातील सूत्रांनी सांगितले.
सीबीएसई अभ्यासक्रम एनसीआरटीमार्फत ठरविला जातो. स्टेट बोर्डानेही आपल्या अभ्यासक्रमात बदल करून त्याची काठिण्यपातळी वाढविली आहे. त्यामुळे आता सीबीएसई व स्टेट बोर्डाच्या अभ्यासक्रमातील अंतर कमी झाले आहे. या पॅटर्ननुसार शाळा निमिर्तीचा हेतू साध्य झाल्यामुळे आता हा उपक्रम थांबविला आहे. – साईलता सामलेटी, शिक्षणाधिकारी, नाशिक जिल्हा परिषद
Zilla Parishad’s CBSE pattern scrapped.