एनडीएसटी सोसायटी विक्रमी 203 अर्ज

नाशिक : प्रतिनिधी
जिल्ह्यातील सर्वांत मोठया समजल्या जाणार्‍या माध्यमिक शिक्षक पतसंस्था एनडीएसटीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी21 जागांसाठी 203 इतके विक्रमी अर्ज दाखल झाले आहेत. विक्रमी अर्जांमुळे तीन पॅनल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सत्ताधारी विरोधात तयार होणार्‍या एका पॅनल मधून जास्त उमेदवार इच्छुक असल्याने उमेदवारी न मिळालेल्यांचा तिसरा पॅनल होण्याची शक्यता आहे.
आज नामनिर्देशन पत्रांची छाननी होणार असून, किती अर्ज वैध ठरतात यावर पॅनलचे भवितव्य अवलंबून असणार आहे. बरेच उमेदवार नेमकं कोणत्या पॅनल मधून उमेदवारी करावी याचा विचार करत असून तळ्यात मळ्यात असणारे अनेक उमेदवार आहेत. तूर्तास सत्ताधारी विरोधात माजी शिक्षक आमदार अपूर्व हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक भारती, शिक्षक परिषद, कास्ट्राइब, क्रीडा शिक्षक संघटना, महाराष्ट्र राज्य विकास संघटना, महाराष्ट राज्य संघटना, अनुदानित आश्रमशाळा संघटना, शासकीय आश्रमशाळा संघटना, इस्तू, प्रयोगशाळा कर्मचारी संघटना, शिक्षकेतर संघटना एकवटल्या आहेत. शाम पाटील, के.के अहिरे, साहेबराव कुटे, डी.यू.अहिरे, पुरुषोत्तम रकीबे, विजय पाटील, भगवान पानपाटील, रामदास गडकरी, प्र.दा पगार, इ पॅनलचे नेतृत्व करत असून, सत्ताधारी टी डी एफच्याच विरोधात आर.डी. निकम यांनी टीडीएफचेच पॅनल निर्मितीचे संकेत दिले आहेत. त्याचे नेतृत्व आर.डी. निकम, एस.बी. देशमुख करत आहेत. सत्ताधारी संचालक मंडळाच्या एसीबी कारवाईमुळे अनेक उमेदवार त्यांच्या विरोधातील पॅनल मधून निवडणूक लढवण्यास उत्सुक आहेत. काही संस्थांनी आपल्याच संस्थेतले उमेदवार तिन्ही पॅनलला दिले असल्याने मतदारांत चर्चेचा विषय झाला आहे.
या निवडणुकीसाठी, कळवण- सुरगाणा- देवळा दोन, मालेगाव-दोन , त्र्यंबक-पेठ एक, नाशिक तीन उमेदवार वगळता इतर प्रत्येक तालुक्यातून प्रत्येकी एक उमेदवार निवडून द्यावयाचा असून, महिला प्रतिनिधी दोन, ओबीसी एक आणि एससी-एसटी मधून एक तर एनटीमधून एक असे 21 उमेदवार निवडून द्यावयाचे असून 10,019 मतदार आहेत.एसीबी कार्यवाहीमुळे ही निवडणूक भ्रष्टाचार या मुद्द्यावर गाजण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *