जिल्ह्यात पावसाने हाहाकार!

गोदेला महापूर, अनेक गावांचा संपर्क तुटला

नाशिक : प्रतिनिधी
मराठवाड्यात पावसाने हाहाकार उडवून दिला असतानाच कालपासून शहर आणि जिल्ह्यातही संततधार पाऊस सुरू आहे. धरण पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे गंगापूरमधून करण्यात आलेल्या विसर्गामुळे गोदावरीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. गोदावरीला तब्बल पाच वषार्ंनंतर महापूर आला. दुतोंड्या मारूती पूर्ण बुडाला. जिल्ह्यातही चोवीस तासांपासून धो धो पाऊस कोसळत असल्याने संपूर्ण पिके पाण्याखाली गेली आहेत. सायखेडा- चांदोरी मार्गावरील पुलावरील वाहतूक खबरदारी म्हणून बंद करण्यात आली होती. सुरगाणा, बागलाण, येवला, चांदवड तालुक्यातही पावसाने कहर केल्यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी चांदोरी सायखेडा भागात पाहणी करुन दुकानदारांशी संवाद साधला.
जिल्ह्यांमध्ये एकाच दिवसात तब्बल 97 मंडलात अतीवृष्टी झाली. 18 धरणांतून विसर्ग सुरू असल्याने जिल्ह्यातील नद्या दुथडी भरून वाहत आहेत. ओल्या दुष्काळाचे सावट गडद झाले आहे. शनिवारी सायकाळी सातपासून पावसाला सुरुवात झाली. सकाळपर्यंत जिल्ह्यात सरासरी 77 मिलिमीटर पावसाची नोंंद झाली. नाशिक, त्र्यंबकेश्वरमध्ये सुरू असलेल्या संंततधारेमुळे शहरातील रस्त्यांना नदी-नाल्याचे स्वरूप आले.
हवामान खात्याने संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार कोसळण्याची शक्यता वर्तवली होती. त्यानुसार शनिवारी (दि. 27) पावसाने हजेरी लावली होती. शनिवारी रात्री सुरू झालेल्या पावसाने रात्रभर हजेरी लावली असल्याने धरणातून विसर्ग करण्यात आला होता. त्यामुळे रविवारी (दि. 28) गंगाघाट परिसरात राहणार्‍या नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले होते. पावसाची रिपरिप व दुसरीकडे गोदावरीला पूर त्यामुळे नदीकाठ परिसरात राहणार्‍या नागरिकांना दिवसभर घरात बसून राहावे
लागले.
रविवारी दुपारनंतरही पाऊस सुरू असल्याने गंगाघाट परिसरातील व्यवसाय ठप्प झाले होते. पुराच्या पाण्याने कपालेश्वर मंदिराच्या पायर्‍यांपर्यंत व पोलिस चौकीसमोर पाणी आले होते. म्हसोबा महाराज पटांगण, गौरी परांगण, रामकुंडाबाहेरील रस्ता याठिकाणी मोठ्या प्रमाणात पुराचे पाणी वाहत असल्याने गंगाघाटाकडे जाणारा व गंगाघाटाकडून संत गाडगे महाराज पुलाकडे जाणारा रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला होता. गोदावरीला आलेल्या पुराच्या पाण्याचा फटका

आज, उद्या रेड अलर्ट

हवामान खात्याने नाशिक जिल्ह्याला आज (दि. 29) व उद्या (दि. 30) रेड अलर्ट जारी केला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सर्व आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. नागरिकांनीही सतर्क राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी केले आहे. महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपंचायत, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार तसेच तलाठी, ग्रामसेवक आणि पोलीसपाटील यांच्यासह सर्व अधिकारी, कर्मचार्‍यांनी सतर्क राहावे, असे सांगण्यात आले आहे.

धरणांतून विसर्ग याप्रमाणे
गौतमी गोदावरी- 2026, कश्यपी-1280, गंगापूर- 10998, आळंदी- 3571, भावली-822, भाम- 2093, वाकी-630, दारणा- 9552, मुकणे-1950, वालदेवी- 1306, कडवा- 4204, वाघाड-2804, पुनेगाव-3840, करंजगाव-14570, ओझरखेड- 4050, पालखेड-30498, तिसगाव- 310, नांदूरमध्यमेश्वर-87549

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *