सिन्नरच्या 100 ग्रामपंचायतींना मिळणार 5 हजार लिटर क्षमतेचा टँकर

आमदार माणिकराव कोकाटे यांचा पुढाकार; 2 कोटींची तरतूद, पहिल्या टप्प्यात 20 गावांना आठवड्यातच लाभ

सिन्नर : प्रतिनिधी
तालुक्यातील पाणीटंचाईचा प्रश्न लक्षात घेऊन 100 ग्रामपंचायतींना पाच हजार लिटर क्षमतेचे पाण्याचे टँकर उपलब्ध करून देण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेण्यात आला आहे. माजी मंत्री तथा आमदार माणिकराव कोकाटे यांच्या प्रयत्नातून स्थानिक विकास निधी आणि जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून तब्बल दोन कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
तालुक्यातील एकूण 114 ग्रामपंचायतींपैकी सुमारे 100 ग्रामपंचायतींना हे टँकर टप्प्याटप्प्याने देण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यात 20 टँकर तयार झाले आहेत. येत्या आठवडाभरात आमदार कोकाटे यांच्या हस्ते त्यांचे वितरण होणार आहे. विशेषतः पाणीटंचाईग्रस्त गावांना याचा प्राधान्याने लाभ दिला जाणार आहे.
सार्वजनिक कार्यक्रम, आपत्कालीन परिस्थिती किंवा उन्हाळ्यातील तीव्र पाणीटंचाईच्या काळात गावांना खाजगी टँकरवर अवलंबून राहावे लागू नये, हा या योजनेमागील मुख्य उद्देश आहे. अनेकदा खाजगी टँकर चालकांची मनधरणी करावी लागते किंवा जास्त दर मोजावे लागतात. या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत स्तरावर स्वतःचा टँकर उपलब्ध असणे ही मोठी दिलासा देणारी बाब ठरणार आहे.
प्रत्येक टँकरची क्षमता पाच हजार लिटर असून, त्याची अंदाजे किंमत सुमारे दोन लाख रुपये आहे. हे टँकर ट्रॉलीच्या सांगाड्यावर तयार करण्यात येत असून, त्यांचे उत्पादन स्थानिक कारखान्यात सुरू आहे.
ग्रामपंचायतींना थेट निधी देण्याऐवजी वस्तुरूपात सुविधा देण्याच्या या निर्णयामुळे निधीचा योग्य वापर होऊन त्याचा थेट फायदा नागरिकांपर्यंत पोहोचणार असल्याचे मानले जात आहे.
या उपक्रमामुळे सिन्नर तालुक्यातील ग्रामीण भागातील पाणीपुरवठा व्यवस्थेला बळकटी मिळण्यास मदत होणार असून, भविष्यातील टंचाईच्या संकटावर प्रभावी उपाय ठरण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
टँकरची देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी संबंधित ग्रामपंचायतीवर राहणार आहे. ग्रामपंचायत नागरिकांना नाममात्र शुल्क आकारून टँकर उपलब्ध करून देऊ शकते. सध्या खाजगी पाच हजार लिटर टँकरसाठी सुमारे एक हजार रुपये खर्च येतो. मात्र, ग्रामपंचायत टँकरमुळे हा खर्च निम्म्यावर येण्याची शक्यता आहे. यामुळे नागरिकांना दिलासा मिळण्याबरोबरच ग्रामपंचायतीसाठीही उत्पन्नाचा एक नवीन स्रोत निर्माण होणार आहे.

100 Gram Panchayats of Sinnar will get 5 thousand liter capacity tankers

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *