आठ बंबांच्या सहाय्याने आग आटोक्यात; आठ लाखांचे नुकसान
मालेगाव : प्रतिनिधी
शहरातील खड्डाजीन परिसरात दुपारच्या सुमारास गोदाम परिसरात भीषण आग लागली.
आगीने काही क्षणांतच विक्राळ रूप धारण केले असले, तरी मालेगाव महापालिकेच्या अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न करत आठ बंबांच्या सहाय्याने आग आटोक्यात आणली. यामुळे संभाव्य मोठा अनर्थ टळला.
घटनास्थळी मिळालेल्या माहितीनुसार, येथील एका ऑइल मिल परिसरात मोकळ्या जागेत साचलेल्या कचर्याला आग लागली. सुरुवातीला किरकोळ वाटणारी ही आग काही वेळातच वेगाने पसरत जवळच असलेल्या पाइप गोदामापर्यंत पोहचली. यात पाइपचे तीन मोठे गठ्ठे खाक झाले. यानंतर ही आग जवळच असलेल्या गोठा आणि मक्याच्या कुट्टी चार्यापर्यंत पसरली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाचे चार बंब तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. मात्र, आगीचे वाढते स्वरूप लक्षात घेता आणखी बंब मागवण्यात आले. एकूण आठ अग्निशमन बंबांनी दोन-दोन फेर्या मारत अथक प्रयत्न केल्यानंतर अखेर आग पूर्णपणे विझवण्यात यश आले.
या आगीत अंदाजे आठ लाख रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. काही प्रमाणात मक्याच्या कुट्टी चार्याचेही नुकसान झाले आहे. मात्र, अग्निशमन दलाने वेळेवर केलेल्या कार्यवाहीमुळे इतर पाइप साठा, परिसरातील मालमत्ता आणि सुमारे 15 गायींना सुरक्षित स्थळी हलवण्यात यश आले. त्यामुळे मोठी हानी टळली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. ही संपूर्ण बचाव मोहीम अग्निशमन अधिकारी संजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
फायरमन शकील, जालिंदर जाधव, रफिक खान, शाहबा, राकेश पगारे, बॉबी आहिरे, अमोल आदींच्या पथकाने धाडसाने काम करत आग नियंत्रणात आणली.
Massive fire breaks out in Khaddajin area of Malegaon